हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तोमोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्यालग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.
आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल.
अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटल मधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला असेल बापाने. दुसऱ्याच क्षणाला हॉस्पिटलच्या अकाऊंटवर पैसे जमा केले आणि बेंगलोर मधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली.
वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचले, ICU मधे मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील अठ्ठेचाळीस तासात जर बॉडीने काही रिफ्लेक्स दिले तरच पुढील उपचार होणार होते अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले, प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मुलगा शुद्धीवर येत असल्याच्या
आनंदाने आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलवून घेतले गेले. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता.
दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला लाख सव्वालाखांचा खर्च होता. वडील डॉक्टरला म्हणाले “कितीही खर्च होवूद्या, पण माझ्या मुलाला वाचवा” २३ सप्टेंबर पासून प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली, पुढील आठवड्यात व्हेंटीलेटर काढला, त्यानंतर पाच दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती, हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्यांच्या पापन्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले आता दोन तीन दिवसात तुमचा पेशंट ICU मधून जनरल वार्ड मधे शिफ्ट होईल.
पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक १३ ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आला. गेली २२ दिवस हायर अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रेसिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हतबल होवून रडायला लागले. गेल्या वीस बावीस दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान दोनशे वेळा रडला असेल. मुलगा सिरिअस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला १५ ऑक्टोबर रोजीच घरी पाठवले.
१६ ऑक्टोबर हा काळा दिवस उजाडला आणि सकाळी १०:३० वाजता उपचारादरम्यान मुलाची प्राणज्योत मालवली आणि इथूनच सगळ्या अडचणी सुरु झाल्या. काहीही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोहचू द्यायची नव्हती. कारण तिला सावरणे सर्वांसाठीच कठीण जाणार होते. पण हळू हळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे अवाढव्य बील, पोलिस परवानग्या, पोस्ट मॉर्टेम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला चोवीस तास गेले. अखेर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मुलाचे शव घेवून त्याचे वडील काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रांसह रुग्णवाहिकेत कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले.
घरी पोहोचायला त्यांना १४ तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमधे ऍडमीट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणारा नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री ९:३० वाजता डॉक्टरच्या उपस्थितीत मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचे सांगितले. तिच्या हंबरड्याने सगळं हॉस्पिटल हादरलं, एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा टाहो फोडायली. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. त्याच्यासाठी तिने पाहिलेली स्वप्न आता फक्त दिवास्वप्न बनून राहणार होती.
१७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिक मुलाचे शव घेवून घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडाने मुलाच्या आईला सांगणार होते की मी तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारुन फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडाला. रात्री १:३० च्या सुमारास मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत विधीवत अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करवत नाही.
पोरांनो,
गाडी चालवताना ऍक्स्लेटरच्या मुठीला पीळ द्यायच्या आधी, आतडी पिळवटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्यांचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे, त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आई बाप बहुमूल्य आहेत. आपल्या शिवाय त्यांचे काय होईल याचे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येवू नये.
विशाल गरड
१८ ऑक्टोबर २०२३, बार्शी
हृदय पिळून टाकणारी घटना आहे. वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले. वाचताना आईची आठवण आली.........
ReplyDeleteवाचताना अश्रू अनावर झाले..दे🥺व त्या आई वडिलांना जगण्याचे बळ देओ..😓🙌
Deleteवाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले…अत्यंत वाईट घटना🥺
ReplyDelete😭😭
ReplyDeleteMy heart Breking for his family The sky is very grey for their family right now I hope the clouds part soon
ReplyDeleteवाचता वाचता डोळ्यात पाणी आले 🥹
ReplyDeleteअश्रू आले डोळ्यात सर,,, भावांनो कमीत कमी गाडी चालवताना हेल्मेट वापरा
ReplyDeletemiss you brother 😭
ReplyDeleteखूप दुःखत घटना घडली अशी घटना कोणा सोबत पणं घडू नये आई वडीलाना देव या दुःखातून सावरण्याच बळ देवो 🥲🙏
ReplyDeleteखूपच दुःखद घटना, वाचत असताना डोळ्यात पाणी आले, कोणाच्याच आई-वडिलांच्या वाटेला हे दुःख येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ReplyDeleteसंदेश - गाडी हळू चालवा आणि हेल्मेटचा वापर करा.
Horrible Hear Touching Story Salute to you Dear Vishal Sir
ReplyDelete