समाजासाठी इतक्या उच्च कोटीचे आत्मसमर्पण, बाप रे ! अनेक उपोषणे पाहिली पण इतक्या टोकाचे उपोषण आणि दृढनिश्चय मी पहिल्यांदाच पाहतोय. आज जरांगे पाटलांचा सात दिवस विना अन्न पाण्याचा चेहरा पाहून पोटात कालवले. त्यांच्याशी बोलताना जीभ जड जात होती. प्रकृती वेगाने ढासळत आहे तरी ते कुणाचेच ऐकायला तयार नाहीत. आरक्षण हाच माझा उपचार आहे असे म्हणतायेत.
काही दिवसांपूर्वीच मी एका व्हिडीओच्या माध्यमातून पाटलांना विनंती केली होती. आज माऊली पवार, शिवाजी पाटील, ऍड.श्रीरंग लाळे, डॉ.प्रमोद पाटील यांसमवेत अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली की “पाटील, सद्यस्थिती पाहता तमाम महाराष्ट्रातील जनतेचे तुमच्या जिवाला सर्वोच्च प्राधान्य आहे. तुम्ही जिवंत राहिलात तरच ही लढाई जिंकता येईल. तुमच्यानंतर जर आत्मआहुत्या झाल्या तर हे परवडणारं नाही. गड आला पण सिंह गेला अशी इतिहासातली पुनरावृत्ती पुन्हा होवू द्यायची नाही म्हणून आमची हात जोडून विनंती आहे तुम्ही पाणी प्या.”
यावेळी उपस्थित आमच्या सर्वांच्या विनंतीस मान देवून पाटलांनी एक ग्लास पाणी पिले आणि त्यांना पाणी पिताना पाहून आमच्या हृदयाची तहान भागली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ठपणे सांगितले की “मराठ्यांनो शांततेत आंदोलने करा, उद्या संध्याकाळपर्यंत जाळपोळ, तोडफोडीची एकही घटना मला नको आहे” सात दिवस अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात नसणारा माणूस आपल्याला काहीतरी सांगतोय. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी त्यांच्या विनंतीचे पालन करावे एवढीच इच्छा.
शेवटी अंतरवालीतून निघताना तेथील स्थानिक गावकऱ्यांशी आणि पाटलांच्या निकटवर्तीयांशी चर्चा करुन तुम्ही काहीही करुन पाटलांना उपचार घ्यायला व इथून पुढे पाणी पिऊन उपोषण सुरु ठेवण्यास भाग पाडा अशी विनंती केली. कारण सर सलामत तो पगडी पचास. आज एका वादळाला भेटून आलोय, जवळून अनुभवून आलोय. खरं सांगतो लोकजनहो असे नेतृत्व शंभर वर्षात एकदाच जन्माला येते. आरक्षण तर मिळेल तेव्हा मिळेल पण तुर्तास मराठ्यांना एवढं दृढनिश्चयी नेतृत्व मिळाल्याचे समाधान आहे. काहीही होवो जरांगे जित्ते राहिलेच पाहिजे. एक मराठा, लाख मराठा
विशाल गरड
३० ऑक्टोबर २०२३, अंतरवाली सराटी.
No comments:
Post a Comment