ही स्वप्नीलच्या फेसबुक वॉलवरची अखेरची पोस्ट आहे ज्यात त्याने फोटोच्या कॅप्शन मधे Review, Resolve, Rebuild, Regain असे लिहिले आहे. याचा अर्थ स्वतःचे आत्मपरीक्षण करा, अडचणींचे निराकरण करा, आयुष्याची पुन्हा नव्याने बांधणी करा, हरवलेले पुन्हा परत मिळवा असा होतो. आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या युवकांना पुन्हा नव्याने उभा करण्याचा हाच तर मंत्र आहे जो स्वप्नीलला ठावूक होता. मग तरीही त्याने का आत्महत्या केली असावी ? विचारी मित्र म्हणाल तर ढिगभर होते त्याच्याकडे तो कुणाकडे काहीच बोलला नसेल का ? असे कोणते प्रबळ कारण असावे की त्याला मृत्यूला कवटाळणे सोपे वाटले ? अशा प्रश्नाची उत्तरे त्याच्यासोबत निघून गेली असली तरी एक गोष्ट नक्की की आयुष्यात अशी एक वेळ येते की नेमक्या त्या मिनिटाला समुपदेशन आणि मेंटरची गरज भासते. अशा वेळेस जेव्हा आपल्या स्वतःचे मन आपल्याला मरणाचा पर्याय देत असते तेव्हा त्याला फाट्यावर हाणुन आपल्या जवळच्या दोस्तांसोबत ती संपूर्ण वेळ घालवायला हवी. आत्महत्या कारणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या आईवडिलांचा, मित्रांचा, सख्या सोयाऱ्यांचा गुन्हेगार असतो.
युवकांनो,
ज्या आईने रक्ताच्या थेंबा थेंबानी नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवले, ज्या बापाने पोटाला खाऊ घालून मोठे केले. अरे त्यांच्यासाठी तुमचे करिअर, प्रसिद्धी, पैसा, प्रोपर्टी, प्रियसी, लग्न या सगळ्यांपेक्षा तुमचे जीवंत राहणे जास्त गरजेचे आहे. पोरांनो आत्महत्येची मोजकी कारणे आहेत पण जगण्याची हजारो कारणे असतात. स्वतः मरू नका, आत्मघाती विचारांना मारा.
विशाल गरड
२० मे २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment