Wednesday, December 28, 2016

| लग्न ©

व.पु.काळे म्हणतात की, कलावंताशी लग्न करताना कायम त्याच्याकडे कलावंत म्हणून पहायची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं. संसारात, व्यवहारात तो सामन्यापासून निराळा वागणार आहे हे गृहीत धरूनच करावं. त्याचं वागणं विक्षिप्त वाटेल पण त्याच्या विश्वात त्याला , त्याची अशी संगती असेल. ते आकलन होणार असेल तरच करावं. कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती आणि विकार उत्कट असतात. राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कुठल्या संवेदना केव्हा उफाळून येतील याचे संकेतही सामान्या पेक्षा निराळे असतात.  अमुक एक भावना या वेळीच का ? असा प्रश्न त्या कलाकाराला रुचत नाही. त्याला त्या क्षणी फक्त साथ हवी असते....

लेखक : व. पु. काळे 👆

खरंच आहेत व.पु चे हे शब्द. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा. भविष्यकाळाची दिशा ठरवणारा सर्वात महत्वाचा निर्णय. फक्त वंश वाढवायचा, वासना मिटवायची, सोबत मिळवायची एवढंच ध्येय ठेवुन लग्न करणाऱ्यांसाठी जोडीदार निवडण्याचं एवढं टेंशन नसतं, पण एखाद्या कलाकाराला मात्र बायको घरात आणणे म्हणजे त्याच्या कलेला सवत आणल्यासारखंच असतं. शेवटी बायको सांभाळणे ही सुद्धा एक कलाच आहे. मुळात स्वतःच्या कलेवर बायकोपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्यांसाठीतर त्याहुन अवघड असतं. मुली पाहण्याचे कार्यक्रम जितके जास्त होतील तितकीच मनाची घालमेल सुद्धा जास्त वाढते; त्यातच पुन्हा लोकांचा तगादा असतोच आरं करं की एखादी पसंद, आशी काय आप्सरा मिळणाराय तुला ! त्यात मुलगी बघायला वगैरे जाणे म्हणजे खुपच फाॅरमॅलिटी असतात. अलिकडे थोडा बदल तरी झालाय नाहीतर काही वर्षापुर्वी मुली पहाण्याच्या कार्यक्रमात; तिने आपल्यावर व आपण तिच्यावर टाकलेल्या फक्त एका कटाक्षावरच ठरवावे लागायचे पसंत का नापसंत. सोबतची लोकं उंबरा ओलांडायच्या आतच विचारतात काय मग कशी वाटली मुलगी ? आयुष्यातला हा महत्वाचा निर्णय खरंच एवढ्या जलद गतीने घ्यायचा असतो का? दोन शरिरा सोबतच जेव्हा दोन मनांचही मिलन होतं तेव्हाच खरं नवरा बायकोचं नातं निर्माण होतं नाहीतर दोन्हीही अतृप्त शरिरच असतात. डोळ्यांनी एका क्षणात शारिरीक सौदर्य ठरवता येते पण मनाचे सौदर्य पाहण्यासाठी अभिव्यक्तींचा संवाद व्हावा लागतो.
वेळेत लग्न नाही केले तर लोक नावं ठेवतात. मित्र चेष्टा मस्करी करतात. पाहुणे रावळे टोमने मारतात अशा गोष्टींपासुन सुटकारा मिळवण्यासाठीही काहीजन लग्न करतात. कोणी फसतात तर कोणी यशस्वीही होतात. आयुष्यात भेटणारी माणसं लग्नाआधी विचारणार आरे लग्न कधी करणार? लग्नानंतर विचारतील अरे पाळणा कधी हालणार? पाळणा हालल्यावर विचारतील अरे पोराला कोणच्या शाळेत घालणार? शाळा झाल्यावर विचारतील कोणत्या काॅलेजला घालणार? शिक्षण संपल्यावर विचारतील अरे पोराच्या नोकरीचं कधी बघणार? मुलगी असेल तर विचारतील अरे पोरीच्या लग्नाचं कधी बघणारं? विचारणाऱ्यांचे हे असले प्रश्न अखेरच्या श्वासापर्यंत बंद नाहीत होणार ती एक रित आहे परंतु सरतेशेवटी आपलं आयुष्य कसं जगायचं याचा पुर्ण अधिकार आपल्यालाच असतो कोणी कितीही युक्तीवाद केला तरी निर्णय आपणच घ्यायचा असतो.
नवऱ्यावरच्या प्रेमापेक्षा त्याचे त्याच्या कलेवर किंवा छंदावर असलेल्या प्रेमावर प्रेम करणारी जर बायको असेल तर त्या कलाकाराकडुन समाजाला दुहेरी योगदान मिळेल हे नक्की. कारण एकापेक्षा जास्त कला एका शरिरात सांभाळणे सोपे आहे पण एका घरात सांभाळणे कठीण.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २८ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६  वाजता

Tuesday, December 13, 2016

| मेलेला बैल ©

आज सकाळी काॅलेजला निघालो होतो. माझ्या नेहमीच्या वाटेवर एक लहान मुलगा अनवाणी पायाने चालत चाललेला दिसला मी क्षणार्धात गाडी थांबवली व त्याला गाडीवर बसवुन निघालो. कुठं जायचंय असं विचारल्यावर शेतातल्या कोट्यावर निघालोय असं तो म्हणाला. डोंगरी वाटेने गाडी हालत डुलतच चालत असल्याने त्याच्या दोन्ही हातांनी त्याने माझ्या पोटाला घट्ट पकडलं होतं. चालता-चालता आमच्या गप्पा मात्र सुरूच होत्या. मी त्याला त्याचे नांव विचारले तो म्हणाला "गौरव" मग मी लगेच त्याला त्याच्या वडीलांचे नांव विचारले त्यावर तो म्हणाला "पप्पा". त्याच्या या उत्तरावर मी खुप मनमुराद हसलो. कितवीत आहेस ? तो म्हणला "आंगीणवाडीत".
थोडंसं पुढे गेल्यानंतर तो बोलला "ओऽ मामा, तुम्हाला म्याल्याला बैल दाकवु का ? मी उत्सुकतेने विचारले कुठाय? तो म्हणाला "तिकाय तिथं वड्याच्या कडला टाकलाय, कुत्री तोंड घालुन-घालुन खायल्याती बगा त्यला" मी गाडी थांबवुन ते दृष्य पाहिलं खरंच एक काळ्या रंगाचा बैल तिथे मृतावस्थेत उघड्यावर टाकला होता आणि फिरस्ती कुत्री आणि कावळे त्यावर तुटुन पडले होते. मी पाहत असतानाच गौरव म्हणाला "ह्याला बैल पोळयाला लई भारी सजीवलं व्हतं ढाल लावुन आन् मेल्यावर बगा कि कसं टाकुन दिलंय" त्याचे हे वाक्य ऐकुण मी अचंबीत झालो.
मुळात एका अंगणवाडीत शिकणाऱ्या या गौरवच्या विचारांना मी सलाम ठोकला कारण माझ्याही मनात बरोबर तोच विचार घुटमळत होता. कि एखादा बैल जिवंत असताना कसलाही रोजगार न घेता, मिळलं ती काडी वैरण खावुन या काळ्या आईची सेवा करतो आणि मेल्यानंतर मात्र त्याच मातीच्या कुशीत जाण्याचं भाग्यही त्याच्या पदरात पडंत नाही. शेवटी एवढंच वाटतं कि जे त्या अंगणवाडीतल्या गौरवला कळलं तेच जर त्या बैलाच्या मालकाला कळलं असतं तर आज तो बैल नक्कीच मातीच्या कुशीत असला असता.
त्या पडलेल्या मुक्या जिवाला श्रद्धांजली अर्पन करून गौरवला त्याच्या शेतातल्या कोट्यावर सोडलं आणि मी काॅलेजवर पोहोचलो. साडे दहा ते सव्वा अकरा  असे लेक्चर घेऊन मनातले शब्द मोबाईलवर टाइपीत बसलोय. सरतेशेवटी आजच्या या प्रसंगातुन मी एक गोष्ट शिकलो की, कृतज्ञता हि फक्त शिक्षण आणि जाणतेपणावर अवलंबुन नसुन, ती लहाणपणी मनावर झालेल्या संस्कारांवरच अवलंबुन असते.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १३ डिसेंबर २०१६
वेळ : सकाळी ११:३० ते १२

Wednesday, November 30, 2016

| पायकुट ©

एखादा प्राणी जर खुप पळत असेल तर तो पळुन दुरवर जाऊ नये म्हणुन त्याच्या दोन पायला एक दोरी बांधली जाते त्यालाच 'पायकुट' असे म्हणतात. थोडक्यात पळण्यातला अडथळाच म्हणा की. आज सकाळी लवकरच काॅलेजवर निघालो होतो. उक्कडगांवच्या आटलेल्या नदी पात्रात असेच पायकुट घातलेली चार खेचरं दिसली. पायातला ब्रेक आपोआप दबला आणि क्षणभर मी त्या खेचरांकडंच पाहत राहिलो. अंगानं धष्टषुप्ट तांबड्या रंगाची हि खेचरं कळपाबाहेर चरायला आली होती. अगदीच हळु-हळु पावलं टाकतं ती चालली होती. मला पाहुन थोडी थबकली पण घाबरली नाहीत. कारण काबाडकष्ट करणे आणि माणसानं हाकिल तसं हाकणे एवढंच त्यांच्या नशिबी असतं.
मी पाहिलेल्या या चार खेचरांपैकी तिन जन एकदम शांतपणे चालत होते परंतु काळ्या शेपटाचं एक खेचर मात्र तो घोडा असल्याची जाणिव करून देत होता. आपण घोड्यासारखं दिसत असतानाही त्याला गाढवासारखं जिणं बहुदा पटत नसावं म्हणुनच पायात पायकुट असतानाही शेपटी उडवुन आणि फुर्रऽऽ, फुर्रर्रऽऽ असा आवाज काढुन पुर्ण ताकदीने तो पळण्याचा प्रयत्न करत होता पण पायातलं पायकुट त्याला अडथळा करत होतं. त्याच्या या प्रयत्नांना पाहुन मला खुप शिकायला मिळालं. आपल्याही आयुष्यात अशी विविध प्रकारची पायकुटं जिवणाच्या विविध टप्प्यांवर बांधली जातात. त्यातली काही पतंगासारखी असतात ज्या मुळे आपण उंच उडत असतो तर काही पायात बांधलेल्या दाव्यासारखी असतात ज्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नसतो.
पायात पायकुट असणं पण चांगलं आणि नसणं पण चांगलंच फक्त ते आयुष्याच्या कोणत्या टप्यावर असावं आणि नसावं हे ज्याला कळतं तोच खरा यशस्वी माणुस होतो.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० नोव्हेंबर २०१६
वळ : सकाळी ८ ते ९ वाजता

Sunday, November 27, 2016

| नातु ©

काल काॅलेजवरून येताना डोंगर उतरल्यावर उक्कडगांवच्या थोडंसं बाहेरील रस्त्यावर हि आजी आणि नातवाची स्वारी डोक्यावर सरपन नेताना दिसली. ग्रामिण भागात आजही चुलीसाठी सरपण गोळा करणे हि दैनंदिन बाब आहे. आसलं काही दिसलं की माझ्यातला लेखक आणि छायाचित्रकार लगेच जागा होतो. न राहवुन चालत्या गाडीतच हा क्षण मोबाईलमध्ये टिपला. डोळ्याला दिसलेली अशी दृष्य माझ्या मनातले शब्द उपसायला प्रवृत्त करतात. सत्तरी ओलांडलेल्या आजीबाई आणि दहा बारा वर्षाचा त्यांचा नातु; चुलीला जळन म्हणुन डोक्यावर लाकडाचा बिंडा बांधुन चालत होते. नातवानेही शाळा सुटल्यावर आजीसोबत सरपन शोधन्यासाठी शाळेच्या गणवेशावरच धुम ठोकलेली असावी. फक्त आजीच्या पदराला धरून चालण्यापेक्षा तिच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा म्हणुन तिच्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं लाकुड त्याने स्वतःच्या डोक्यावर घेतले होते. आजीने हि एका हाताने तिचा बिंडा सावरत-सावरत नातवाच्या डोक्यावरील लाकडाला एक हात लावला होता.
आजीच्या या नातवाला भविष्यात डोक्यावर ओझं वाहण्याची वेळ येऊ नये म्हणुन शाळेत दिवसभर शिक्षणाच्या विचारांचे ओझे डोक्यात भरल्यानंतर सायंकाळी मात्र पोटात अन्नाचे ओझे टाकण्यासाठी डोक्यावर सरपणाचे ओझे वाहवेच लागते हि त्याच्या सद्यपरिस्थितिची गरज आहे. शिवाय बाप शेतात आणि आई घरात राबत असताना पोरगा मात्र शाळेत राबता राबताच लहाण वयात का होईना पण घरच्या कामात शक्य तेवढा हातभार लावणं स्वतःचे कर्तव्य समजतो. एवढ्याशा वयात त्याला कामाला जुंपने योग्य कि अयोग्य माहित नाही पण शिक्षणासोबत लहाण वयात श्रमाचाही संस्कार व्हायलाच हवा.
कष्टमेव जयते !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २७ नोव्हेंबर २०१६
सकाळी : १०:३० ते ११ वाजता

Saturday, November 26, 2016

| संविधान ©

संविधानाचा आत्मा समजलेलं भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं पान म्हणजेच प्रस्तावना होय. या पानाकडं ज्यावेळेस मी एच कलाकार म्हणुन निरखुण पाहतो तेव्हा न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या व्यतिरिक्तही मला आणखी काही शब्दांचा बोध होतो. आजवर आपण हि संविधानाची प्रस्तावना खुपवेळा वाचली असेल परंतु या प्रस्तावनेला असलेली चौकट सुद्धा तितकीच अर्थपुर्ण आहे हे बारकाईने पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. प्रस्तावनेच्या या लाल रंगाच्या कलाकुसरीतुन आपणाला सौदर्य, साहस, शक्ती आणि अखंडता पहायला मिळते राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय फुल कमळ हे भारत देशाच्या सौदर्याचं प्रतिनिधित्व करतात, राष्ट्रीय प्राणी वाघ हा आपल्या देशाच्या धैर्य आणि साहसाचं प्रतिनिधित्व करतो तर जमिनीवरचा सर्वात मोठा प्राणी हत्ती आपल्या देशाचे सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. विविध फुलांच्या वेली भारताच्या अखंडतेचे प्रतिनिधित्व करतात.
आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावना हि फक्त शब्दांनी तयार झालेली नसुन ती लेखन आणि चित्रकलेचा एक उत्तम नमुना आहे असे मला वाटते. कदाचित या कलाकुसरीचा अर्थ राज्यघटनेनुसार वेगळा असु शकतो परंतु एक सर्वसामान्य कलाकार आणि लेखक असल्याने थोडासा विचार करून सुचलेलं आज संविधान दिनाच्या निमित्तानं आपणासमोर मांडावं वाटलं म्हणुन हा अट्टाहास. कोणत्याही विषयावर विचार करण्याचे, बोलण्याचे व लिहिण्याचे मला स्वातंत्र्य दिल्याबद्दल एक वक्ता व लेखक म्हणुन मी या संविधानाचा आयुष्यभर ऋणी राहील.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २६ नोव्हेंबर २०१६ (संविधान दिन)
सकाळी : ११ ते १२ वाजता

Friday, November 25, 2016

| शेतमजुर ©

म्या हाय एक शेतमजुर, खाली दिसणारा ह्यो फुटु  माझाच हाय. म्या कोण हाय हे नाय सांगणार पर माझा ह्यो फुटु पांगरीच्या प्रा.विशाल गरड ह्यंनी काढलाय. दिसभर भटकंती करून ह्ये एक लाकडाचं ख्वाड घिऊन म्या आपलं सायकलीवर घरी निघालु व्हतु. घरात नुसतं सामान आसुन उपेग नाय त्याला शिजवायला जळानबी लागतया; म्हणुन यो आट्टाहास. आमच्या पांगरीच्या स्टॅण्डजवळ आल्यावर म्हागुन ईशाल सरांची गाडी आली आन त्यंनी माझा कधीनकाच फुटु काढला ह्ये कळलंच नाय. फकस्त पुढी गेल्यावर माझ्याकडं बगुन गालातल्या गालात हासत-हासत सलाम ठुकुन निघुन गेलं. म्या कोण हाय, काय करतो, कुठुन आलो आन् कुठं चाललोय ह्ये त्यांस्नी जराबी माहीत नाय तरीबी त्यंनी माझा फुटु काढुन माझ्यासारख्या मजुराला का बरं सलाम ठोकला आसलं ? कारण माझ्या आजवरच्या जगण्यात आसा सायकलवर सरपान न्हेताना कधीच कुणी फुटु नाय काढल्याला म्हणुन म्या जरा ईचारात पडलुया. जाऊद्या ! घरी लई कामं हायती पुन्ह्यांदा कधी भेटल्यावर ईचारिन मी त्यास्नी फुटु का काढला म्हणुन.
मित्रहो, हा संवाद जरी काल्पनिक असला तरी यातले शब्द मात्र त्या शेतमजुराच्या चेहऱ्याकडे मी क्षणभर टाकलेल्या कटाक्षातुन निर्माण झाले आहेत. नेहमीप्रमाणे आज काॅलेज सुटल्यानंतर पांगरीकडे येत असताना स्टॅण्डच्या अलीकडे, माळ्याच्या विहिरीपाशी एक शेतमजुर त्याच्या जुन्या सायकलवर एक लाकडी ओंडका आणि कुऱ्हाड घेऊन जाताना दिसला. दुपारची झोप त्याने कुठेतरी शेतात निवांत घेतली होती; हे त्याच्या पाठीला लागलेली मातीच सांगत होती. त्याच्या घरी गॅस नाही आणि ब्लॅकचे राॅकेल घ्यायला पैसेपण नाहीत हे तो लाकडाचा ओंडका सांगत होता, त्याच्याकडे मोबाईल नाही हे त्याचा फाटलेला खिसा सांगत होता, त्याच्याकडे गाडी नाही हे त्याची जुनी सायकल सांगत होती, गेल्या वर्षभरात त्याने कोणती खरेदी केली नाही हे त्याची झिजलेली चप्पल सांगत होती, सरपन गोळा करणे हेच त्याचे रोजचे जिने आहे हे त्या कुऱ्हाडीचा रूळलेला दांडा सांगत होता.
त्या शेतमजुराशी एकही शब्दाचा संवाद न साधता फक्त एका नजरेवरून मला दिसलेलं आणि ह्रदयाला भिडलेलं शब्दात उतरवलंय. खरंतर "एखाद्या व्यक्तीचे जगणे समजुन घ्यायला त्याच्याशी संवादच साधावा लागतो असे काही नाही. कधी-कधी त्याच्या कष्टाच्या निशाण्याच त्या व्यक्तीचं जिणं मांडतात फक्त त्या समजुन घेण्याची दृष्टी असली पाहीजे एवढंच."

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २५ नोव्हेंबर २०१६
सायंकाळी : ५ ते ६  वाजता

Thursday, November 17, 2016

| सायकल ते मर्सिडीज ©

लहानपणी नववीपर्यंत माझ्याकडे सायकल नव्हती, पण भाडोत्री किंवा मित्राची सायकल मिळाली की ती हातात घेऊन पळवत न्यायची आणि थोडासा उतार दिसताच तोल सावरत सायकलच्या एका पायंडलवर उभा रहायचे; हि माझ्या ड्रायव्हिंगची मुहुर्तमेढ, पुढे नळीच्या आत पाय टाकुन हाफ पायंडल मग फुल पायंडल मग नळीवरून आणि मग अखेर सिटवर बसुन फुल पायंडेल अशा शृंखलांनी मी माझ्या आयुष्यातले पहिले वाहन शिकलो. आमच्या पांगरीच्या अंबिका सायकल मार्ट, श्रीगणेश सायकल मार्ट, दिपक सायकल मार्ट, वसिम सायकल मार्ट, जय भवानी सायकल मार्ट हि त्याकाळची अग्रेसर दुकाने. घरी आलेल्या पाहुण्यांनी जाताना एक रूपया हातावर टेकवला की पहिल्यांदा सायकलचे दुकान गाठुन तिथल्या रजिस्टर मध्ये नांव व वेळ लिहुन सायकल घ्यायची. एक तासापेक्षा जास्त वेळ होऊ नये म्हणुन त्याच दुकानातले घड्याळ बघायला चारदा चकरा मारायच्या. त्यात जर चुकुन सायकल पम्चर वगैरे झाली तर धर्मसंकट आल्यासारखेच वाटायचे कारण रूपयासोबत पम्चरचे तिन रूपये भरावे लागायचे. प्रत्येक दसऱ्याला अंबिका सायकल मार्ट मध्ये नवीन सायकली दाखल व्हायच्या, त्या नविन सायकली भाड्याने न्यायची खुप उत्सुकता असायची. त्यावेळेस आपल्या जवळच्या मित्राचेही असे एखादे सायकलचे दुकान असावे असे मनोमन वाटायचे. पुढे काही वर्षांनी निळुभाऊंनी श्रीगणेश सायकल मार्टची स्थापना केली. शाळा सुटल्यानंतर भाऊ त्यांच्या दुकानातील लहाण सायकलची चक्कर आवर्जुन द्यायचे सोबत त्यांच्या टपरीच्या काऊंटरवर असलेल्या थरमाॅकाॅलच्या बाॅक्स मधली स्नेहल पेप्सी काॅम्प्लीमेन्ट म्हणुन द्यायचे. कालांतराने अॅटलास सायकल ऐवजी रेंजर सायकली आल्या. गावातुन एखादी रेंजर घेऊन कोणी चालले तर ती न दिसेपर्यंत नजर हटत नव्हती; त्यात जर तिची चक्कर मिळाली मग तर दिवस एकदम जबरीच जायचा. पुढे हिच क्रेझ महाविद्यालयीन जिवनात दुचाकी गाडीबद्दल राहिली व नोकरी लागल्यानंतर चारचाकी आणि आता ब्रॅण्डेड गाड्यांपर्यंत येऊन पोहचली आहे. आपल्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचे आपल्याला नेहमीच आप्रुप असतं त्याला मी काय कुणीचं अपवाद नाही. माझ्या ड्रायव्हिंग क्रेझचा प्रवास एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर "हातातला ब्रेक पायात आला" एवढा साधा आणि सरळ आहे. ड्रायव्हिंगची वाहने जरी बदलली असली तरी त्यातुन मिळणारा आनंद अजुनही तोच आहे. आज मर्सिडीजच्या स्टेअरींगवर बसल्यावर पहिल्यांदा हातात पकडलेला सायकलचा हॅण्डल आठवला. "वर्तमानाच्या सुखात भुतकाळातली दैना आठवणे साहजिकच आहे परंतु यातुनच प्रेरणा घेऊन भविष्यकाळ श्रीमंत करण्याचे बळ मिळते."

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १७ नोव्हेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता

Saturday, November 5, 2016

| भेट भैयासाहेबांची ©

धनेश्वरी मानव विकास मंडळाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॅ.प्रतापसिंह पाटील यांनी आज माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मनाने आणि विचाराने प्रचंड श्रीमंत असणारे भैयासाहेब हे परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री.वेदप्रकाशजी पाटील यांचे सुपुत्र तर परभणीचे आमदार राहुल पाटील यांचे थोरले बंधु आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातही भैयासाहेबांची शेकडो शैक्षणिक संकुले उभी आहेत. राजकारणाचा आणि शिक्षणाचा प्रचंड मोठा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. गतवर्षीपासुनच आमची विचारांची नाळ जुळल्याने स्वतःचा मोठेपणा बाजुला सारून आज त्यांनी माझ्यासारख्या शब्दवेड्याची आवर्जुन भेट घेतली. त्यांच्या मनाचा हाच मोठेपणा कुणालाही जिंकु शकतो.
उंचपुरं रूबाबदार व्यक्तीमत्व, दमदार आवाज, विश्लेषणात्मक बोलणं, दिलखुलास हसणं आणि टाळी देऊन दाद देणं हे भैयासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अलंकारच म्हणावे लागतील. याहुन विशेष आहे त्यांची शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबियांप्रतिची आस्था. उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल्यापासुन ते बाहेर पडेपर्यंत याच विषयावर आमची चर्चा झाली. "शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीतच परंतु युवकही जर आत्महत्या करायले तर देशाचे भविष्य धोक्यात येईल" असे ते म्हणाले. त्यांच्याच मतदार संघातील एका गावातील तब्बल दहा युवकांनी क्षुल्लक कारणावरूण आत्महत्या केली आहे. हि गोष्ट ऐकुण मन सुन्न झालं परंतु हि सगळी परिस्थिती फक्त बघत बसण्यापेक्षा त्या युवकांचे व शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समाजप्रबोधनातुन प्रयत्न व्हायला हवा अशी ईच्छाही त्यांनी व्यक्त केली. आजवर मी प्रत्येक व्याख्यानातुन ह्या गोष्टी मांडत आलोय परंतु भैयासाहेबांसारख्या व्यक्तीने दिलेल्या अशा अभिप्रायामुळे भविष्यात ते आणखीन प्रकर्षाने मांडेन हे नक्की.
त्यांच्यामधली समाजसेवी वृत्ती मला भावली. फक्त भेट देऊन न थांबता एक सुंदर सामाजिक संदेश देणारी प्रतिमा देऊन आणि फेटा बांधुन त्यांनी माझा यथोचित सन्मान केला. आजवर शेकडो ठिकाणी माझे सत्कार झाले परंतु आमच्या निवासस्थानी येऊन सर्व कुटुंबीयांसमोर माझा सत्कार करणं हे माझ्यासाठीतर अविस्मरणीय होतंच; त्यासोबतच माझे आजोबा, वडील, चुलते, भाऊ यांच्यासाठीही ते अभिमानास्पद होतं. प्रदिर्घ चर्चेनंतर भैयासाहेबांनी माझं "ह्रदयांकित" हे पुस्तक स्विकारून प्राचार्य सतिश मातने आणि दत्तात्रय घावटे यांच्यासह आमचा निरोप घेऊन बार्शीकडे प्रयान केले. भैयासाहेबांच्या समाजकार्यास माझ्या लक्ष-लक्ष शुभेच्छा !
"जयास असे आपुला अभिमान
राखलाच पाहीजे तयाचा मान"

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ०५ नोव्हेंबर २०१६
वेळ : सकाळी ११ ते १२ वाजता

Friday, November 4, 2016

| सायकलवरची ईडली ©

आज सकाळी नाष्ट्यासाठी पुणे स्टेशन जवळच्या एका रोडवर सायकलवरची ईडली खायला गेलतो. वीस रूपयाची ईडली खाता-खाता त्या आण्णाच्या निरिक्षणातुन बहुमुल्य विचार अनुभवायला मिळाला. एक सायकल, तिच्या हॅण्डलवर दोन डबे एक चटणीचा आणि एक सांबरचा. कॅरेजवर एक मोठे पातेले त्यात ईडल्या आणि मेंदुवडे, दोन पळ्या, कॅरेजच्या खाली आडकवलेली एक पिशवी; त्या पिशवीत प्लेटा आणि चमचे, सायकलच्या नळीला प्लेटा पुसायला बांधलेला एक रूमाल आणि सायकलच्या थोडे मागे प्लेटा धुण्यासाठी एक प्लॅस्टिकची बाटली. एवढ्या आयुधावर हे आण्णा सकाळी दोनच तासात दिवसभराचा धंदा करतात.
धंद्यासाठी खुप भांडवल लागते, चांगली जागा लागते, स्वच्छता लागते, सर्व्हिस लागते, मनपा ची परवाणगी लागते, गुंडांचे हफ्ते, या सर्व गोष्टींना फाट्यावर हाणुन ह्या आण्णांनी पदार्थाची गुणवत्ता आणि चव या एकाच निकषावर फाईव्ह स्टार हाॅटेलात जाणाऱ्यांना सुद्धा रस्त्यावर उभा राहुन खायला भाग पाडले. मीच नाही तर माझ्यासमवेत अनेक डाॅक्टर्स, इंजिनीअर्स, उद्योजक, नोकरदार मला इथे ईडलीवर ताव मारताना दिसले.
दहा-दहाच्या नोटांनी आण्णाचा खिसा गच्च भरलेला, तरीही त्यातच कोंबुन-कोंबुन त्या नोटा भरत होते. पैसे देणे घेणे आणि ईडली देणे घेणे या दोन्ही क्रिया जलद गतीने सुरू होत्या. "ए आण्णा सांबर डाल", "ए आण्णा थोडी चटणी डाल", "ए आण्णा कितना हुवा", "गडबड मत करो सबको मिलेगा", ए आण्णा इडली वडा मिक्स दे ना", "पार्सल बाद मे", "छुट्टे दे रे", "क्या आण्णा, आज ईडली खतम हो गया" अशा वाक्यांचा भडिमार पुन्हा पुन्हा रिपीट व्हायचा.
एकाच चमचाला शेकडो लोकांचे तोंड लागलेले असते, एकाच पाण्यात पुन्हा-पुन्हा त्या प्लेटा धुतलेल्या असतात, प्लेट पुसण्याचा टाॅवेल काळाकुट्ट पडलेला असतो, हजारो नोटा खिशात कोंबुन खिसा काळसर झालेला असतो त्यासोबतच त्या हातालाही काळपटपणा आलेला असतो, मळकट कपडे, वाढलेली दाढी, अस्वच्छ केस हे सगळं डोळ्यांना स्पष्ट दिसत असतानाही; माझा ईडलीवर ताव मारण्याचा मोह तसुभरही कमी झाला नाही. अस्वच्छतेच्या या चालत्या फिरत्या दुकानात रोज सकाळी ईडली खाऊन-खाऊन आपलं अर्ध आयुष्य काढलेली गिऱ्हाईकं आण्णाकडं आहेत. सकाळच्या नाष्ट्यासाठी लाखभर रूपये खर्च करणारी माणसे पुण्यात राहतात आणि चहाच्या किंमतीत सकाळचा नाष्टा भागवणारी माणसेही पुण्यातच राहतात फक्त सर्व्हिसचा इश्शु आहे पण दोघांची भुक मात्र एकच आहे.
मला इथे अस्वच्छतेचे समर्थन अजिबातच करायचे नाही; परंतु अस्वच्छतेच्या विळख्यात तयार झालेली आणि सर्व्ह केलेली स्वच्छ ईडली खाऊनही माणुस भुक भागवुन ताजा तवाना राहु शकतो बाकी सर्व मनाचे रोग आहेत.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : दिनांक : ०४ नोव्हेंबर २०१६
वेळ : सकाळी ८:०० वाजता (पुणे स्टेशन)

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...