Sunday, September 10, 2017

| मित्रत्व ©

आज बार्शीत एका कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू असतानाच एक फोन आला " हॅलो ! सर मी वालवडहुन अजिम तांबोळी बोलतोय, तुम्हाला भेटायचंय. मी म्हटले "तु आत्ता कुठे आहेस", तो म्हणला गाताचीवाडी. मग मी म्हटले की "इथलं सगळं संपलं की निघताना फोन करतो, तो पर्यंत बार्शीत येऊन थांब". कार्यक्रम संपल्या संपल्या आठवणीने मी तांबोळीला फोन केला. तोपर्यंत तो त्याच्या सचिन धुमाळ आणि ज्ञानेश्वर पाटील या दोन मित्रांसह युवराज ढगे आणि दिनेश गात यांच्याजवळ थांबला होता. मी नगरपालिकेजवळ गाडी लावुन शिवाई मेडीकलवर त्यांची वाट पाहत थांबलो. पाच दहा मिनिटांनी ते आले. या आधी कधीच आम्ही समोरा समोर भेटलो नव्हतो. फेसबुकच्या फाॅलोअर्स मधलाच तो एक; एवढीच काय ती ओळख.
त्यांनी आल्या आल्या अलिंगन देऊन भेटीचे कारण सांगीतले. "सर, आम्ही दरवर्षी शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातुन दिनदर्शिका प्रकाशित करत असतो. आजवर तिन वेगवेगळ्या थिम्सवर त्या प्रकाशित केल्या परंतु पुढील दिनदर्शिकेसाठी तुमचं मार्गदर्शन हवं" त्याच्या या माहितीवर प्रथम मी त्यांचे कौतुक केले. ऐन पंचविशीच्या आतली पोरं परंतु सामाजिक भावनेने पेटुन उठलेली. समाजात दिनदर्शिके सोबतच महत्वपुर्ण माहिती पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्नशिल. शिवरायांच्या किल्ल्यांची, मावळ्यांची माहिती तसेच सर्व महापुरूषांची माहिती त्यांनी आजवर या माध्यमातुन घराघरात पोहचवली आहे. दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेऊन गोर गरिबांचे संसार थाटण्याचे कार्यही शिवसंकल्प प्रतिष्ठान करत आहे.
मला पुढील महत्वाच्या कामानिमित्त जायचे असल्याने पोरांना जास्त वेळ देऊ शकलो नाही परंतु जेवढा दिला तेवढ्याच वेळात झालेल्या वैचारिक गप्पा गोष्टीने दोघांचे पोट भरले. निघताना ही पोरं मला गाडीपर्यंत सोडायला आली. मी गाडीत बसल्यावर तेवढ्या गडबडीत आजच्या कार्यक्रमात मला जी शाल मिळाली ती अजिम तांबोळीच्या पाठीवर पांघरली आणि पुष्पगुच्छ हातात देऊन धन्यवाद दिले. आजवर अशा शेकडो शालींचे ओझे माझ्या खांद्याने पेलले आहे आणि जर असे प्रेम करणारे दोस्त कमावले तर पुढे हजारो शाली या खांद्यावर असतील.
जिंदगी पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटलं याचा नेम नाही. तेव्हा आहे तो पर्यंत मित्र कमावणे व त्यांच्या आठवणीत कायमचे राहणे एवढंच आपल्या हातात आहे. सरतेशेवटी आपल्या सन्मानातला वाटा मित्रांना देणे हिच खरी मैत्री असते. आपण नसतानाही जिवंत राहण्याचं हेच तर सर्वोत्तम माध्यम आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...