Saturday, September 9, 2017

| थेंब ©

आजचं वातावरण जरा निवळल्यासारखे वाटल्याने नेहमीच्या डोंगरी वाटेने माझ्या हिरो होंडावर काॅलेजला गेलो होतो. पांगरीकडे येताना मात्र उक्कडगांवचा माळ उतरतानाच मला पावसाने गाठले. भाग दौड की जिंदगी मै आजारी पडना मना है, म्हणुनच जवळच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये पटकन आसरा घेतला. आमच्या शेताजवळ असलेल्या रघु बप्पाच्या कोट्यात त्यांचे तात्या आणि नात नंदिनी पावसाच्या थेंबांचा आनंद घेत होते. पत्र्याच्या पन्हाळीतुन पडलेले थेंब हातावर घेत आणि हातावरच्या ईवल्याशा तळ्यात पडलेल्या थेंबामुळे तोंडावर उडणारे तुषार झेलत नंदिनी रानटी पावसाची माया अनुभवत होती. परंतु तात्यांच्या चेहऱ्यावर मात्र यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने एकीकडे पडणाऱ्या पावसाने सुखावलेले तर दुसरीकडे काढायला आलेल्या सोयाबीनची चिंता वाटणारे संमिश्र भाव दिसत होते.
तात्यांची आख्खी हयात शेती करण्यात गेली. प्रचंड काबाडकष्ट करून आजही या वयात ते त्यांच्या शेती धर्माचे पालन करत आहेत. रघु बप्पांची नातवंडे शेतातच राहत असल्याने निसर्गाच्या खुप जवळ आहेत. कोंबड्या, शेरडं, गाई, म्हशी, कुत्री हि त्यांच्या रोजच्या सहवासातली आहेत. गावरान संस्काराच्या कुशीत जोपासलेली हि लेकरं आणि या निसर्गाचा जिवनदाता पाऊस यांचा संयोग पाहुन मी सुखावलो.
लहान लेकारांच्या आयुष्यातला हा आनंद फक्त शेत शिवारातच घेता येतो. परंतु चार पैसे कमवण्यासाठी शहरात स्थायिक झालेल्या कुटुंबांना अशा आनंदापासुन मुकावं लागतं.
पावासाचा थेंब काळ्या मातीत पडण्याची आणि झिरपण्याची प्रक्रिया व नंतर त्यातुन निर्माण होणारा सुगंध डिओड्रंट पेक्षा भारी असतो. नजर जाईल तिथवर डोळ्याला दिसणारी हिरवळ गालीच्यापेक्षा मऊ असते, थेट ढगातुन पडणारे पावसाचे पाणी बिसलेरीहुन स्वच्छ असते, वडाच्या झाडाखालची सावली एसी पेक्षा आल्हाददायी असते, उसाचे पाचट व तुराट्यांनी बांधलेलं घर टु बीएचके पेक्षा हवेशीर असते, आणि म्हणुनच अशा वातावरणात जगणाऱ्या लेकरांचे निसर्गज्ञान सुद्धा ईतरांपेक्षा सरस असते.
आज मात्र ग्रामिण जिवणाची हि नाळ अनेक अपरिहार्य कारणांमुळे तुटत चालली आहे. परंतु नव्या पिढीला या संस्कृतीचा वारसा सांगणे हे आपलं कर्तव्य आहे. लेकरांनो खुप खुप शिका, मोठे व्हा फक्त जिच्या जिवावर हे सारं उभारलं त्या शेतीला आणि मातीला कधीच विसरू नका; तीने साथ दिलीय जन्मापासुन आणि देईल मरणानंतरही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...