Friday, September 8, 2017

| दैना (बार्शी कुर्डुवाडी रोड विशेष) ©

आवं ह्यो काय रोड हाय का पडल्यालं भित्ताड ? म्हागल्या काय वर्षातच आर्ध्याऊन जास्त महाराष्ट्र फिरलुय पण रस्त्याला लागलेली आसली साडेसती न्हाय बाबा बघीतली. कुठं बुठं खड्डं आसल्यालं लई रोड आजवर बघितल्यात पण थेट तेहत्तीस किलुमिटरचा नुस्ता खड्ड्यांचा रस्ता कुठं नाय बा बघीतला.
गुगल मामाच्या नियमानुसार ह्येवढं आंतर पार कराया आठ्ठावन्न मिनिटं लागत्यात पण आता मातुर कुठं नाय पडला तर दोन तास लागायल्यात. तुमच्या गाडीला कितीबी गिअर आसुद्या बार्शी कुर्डुवाडी रोडवर दुसरा गिअर म्हंजीच टाॅप आसतंय. गाड्यांच्या टायरांना जर जिव आसता तर त्यंनी म्हागंच सामुईक आत्महत्या केल्या आसत्या. इंजिनला जिव आस्ता तर त्यंनी काम बंद आंदुलन केलं आस्तं. एखाद्याची नवी कुरू गाडी जर खालुन घासली तर त्यजा वरबाडा गाडीबरूबर ह्रदयावर सुद्धा पडत आसतंय. ह्ये "ज्यंजं जळतं त्यालाच कळतं" यीस्टीच्या कंडक्टर आन् डायवर वाल्यांला तर तोंड दाबुन बुक्या हायत्या रांव. बिचारी ईवढुशा पगारीवर यमदेवाच्या रस्त्यावरून गाडी चालिवत्यात.
आमच्या बार्शीची समदी पोरं, वकिलं, प्राध्यापकं, समाजसेवकं, पुढारी, पत्रकारं, मास्तरं, डाक्टरं, इंजिनिअरं, कलाकारं आजुन राहिली साह्यली समदी रोड दुरूस्तीसाठी आता पिटुन उठल्याती. बांधकाम ईभागाला ह्यो रोड पौस संपला कि करावाच लागनाराय नायतर रोड पेक्षा डेंजर त्येंची आवस्था व्हईल ह्यात काय वाद नाय. ह्या रोडवर जाताना नेमकं गाडी थांबवावी कुठं आन् चालवावी कुठं ह्येच कळत नाय. ह्या रोडवर पडल्याल्या खड्ड्यांचं वर्णन कराया माझ्या डिक्शीनीरीत शब्दच नाय. आजपतुर शेकडो जनांचं हातपाय तुटल्यातं, शे पाचशे जणांचं मनकं गेल्यातं आन् निष्पाप जिव सुद्धा हितंच मेल्यातं. आरं ह्येंचा तळतळाट लागल लका, आडाणी माणसाला परवास करताना शिव्या देण्याशिवाय पर्याय नाय. त्येंला बिचाऱ्यांना तर हे रस्तं कोण करतंय ह्ये बी नसतंय माहित. गपगुमान रोडचं हाबाडं खात-खात "चलो या मरो" करत परवास करवा लगतंय.
ह्यो रस्ता या आधी कोणत्या कंत्राट्यानं केल्ता ह्ये जर जाहीर झालं तर शप्पथ सांगतुय त्येजं चलनं मुश्किल व्हईल. आन् तसं बी टक्केवारी काढण्याच्या नादात डांबरात आईल मिसळुन रोड तयार केल्यावर आशीच काशी व्हणार. डांबरीकरनात डांबराला आन् कांक्रिटीकरनात सिमेंटला कट मारून-मारून गावांसह आख्या राज्याच्या रस्त्यांना घोडा लागलांय (खराब झालेत या अर्थाने).
आवं, सार्वजनिक बांधकाम ईभाग तुमास्नी रोड कराया येणारा पैसा आमच्याच खिशातुन येतंय राव, आमच्या समद्या गाड्या ईकत घेतानाच त्येचा समदा टॅक्स आम्ही भरलाय आन् ईस्टीची तिकीटं कढताना, गाडीत पिट्रुल भरताना, नव्या गाड्या घेताना आजपतुर रोड टॅक्स भरत आलाव आमी; तवा तुमी आता आज्याबात हायगय न करता. व्हईल तेवढ्या लवकर ह्ये काम पुर्ण करा, नायतर आमाला आमचं काम तुमाला दाखवावं लागंल. बाकी तुमची मर्जी.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...