Monday, September 11, 2017

| हमसफर ©

आधुनिक काळातली खरी हमसफर म्हणजे आपली टु व्हिलरच असते. धावपळीतले अनेक क्षण फक्त हिच्यामुळेच सोपे होतात. गर्दीच्या शहरात आणि वाडी वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर ही दुचाकी गाडी म्हणजे वरदानच आहे. जवळचे अंतर सहज आणि झटपट पार करण्याची सवय हिनेच आपल्याला लावली. कितीही गर्दी असुद्या हि रस्ता काढतेच. पाऊलवाटेवरून तर ही चिंगाट पळते. माझ्या काॅलेजची पाच वर्षाची सर्व्हिस हिच्याच जिवावर झाली. आजवर या गाडीने आणि तिच्या चाकाने माझ्यासाठी ज्या कष्ता खाल्यात त्या शब्दात मांडणे कठीण आहेत. ती गाडी निर्जीव असली म्हणुन काय झालं आपण तरी सजिव आहोत त्यामुळेच तिच्यावर दोन शब्द शिंपडणे आपले कर्तव्यच आहे. आजवर तीने आपली किती साथ दिली आहे हे एकदा आपला भुतकाळ आठवला की समजते. कसलीही कानकुन न करता ही गाडी आपल्यासाठी अहो रात्र झटत राहते. कित्येकांचे प्राण वाचवण्यात हिचा सिंहाचा वाटा आहे. आणि ड्रायव्हिंगमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना यमसदनात पाठवायला सुद्धा ही मागे पुढे बघत नाही.
रस्ता कसलाही असुद्या त्यावरून चालण्यास हि सदैव तयार असते. पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या तरी अधिकच्या मायलेजमुळे या टु व्हिलर नेहमीच सर्वसामान्यांची गरज भागवण्यास तत्पर राहिल्या आहेत. दुर्गम भागात तर हिच टु व्हिलर गरिबांची अॅम्बुलन्स म्हणुन काम करते. आजवर हजारो शेतकऱ्यांचे प्राण हिने वाचवले आहेत. सायकल असणाऱ्यांचे पहिलं स्वप्न हे टु व्हिलरच असते. आज फोर व्हिलरमध्ये फिरणारी माणसे सुद्धा कधी ना कधी टु व्हिलरवर फिरलेलीच असतात. हल्लीतर फोरव्हिलरचे नवनवे ब्रॅण्ड बाजारात येत असताना; या गाड्यांच्या सवारीपेक्षा बुलेटची सवारी अजुनही मानाचे स्थान टिकवून आहे. काही वर्षापुर्वी सर्वसामान्यांच्या घरापुढे हमखास एक सायकल असायची परंतु आता तिची जागा या टु व्हिलरने घेतली आहे. कित्येक शिक्षकांची आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीची नोकरी करणाऱ्यांची हि राणी आहे. हिच्या टाकीवर बसुन आरशाच्या दांड्याला धरण्याचा लहाणपणीचा आनंद हरएकाने अनुभवलेला असतोच. जेव्हा गाडी येत नसते तेव्हा उगाच गाडीची मुठ पिळत बर्रीईऽऽमम, बर्रीईऽऽमम करण्याचा प्रकार सुद्धा कसा बरे विसरता येईल.
काॅलेज जिवनात तर गाडीला खुपच महत्व असते. सध्याच्या युवापिढीची बहुतांशी काॅलेजलाईफ हिच्याच जिवावर जाते.
मला सुद्धा माझ्या नोकरीसाठी आणि गावात फिरण्यासाठी माझी हिरो होंडा खुप मदत करते. सर्व्हिसींग नाही वेळेवर झाली तरी तक्रार नाही, आहे या परिस्थितीत मला ईच्छित स्थळी पोहचवण्यात ती सतत प्ररत्नशिल असते. एका निर्जीव वस्तुचे आपल्या आयुष्यातील योगदान अधोरेखीत व्हावे याचसाठी हा अट्टाहास. आपल्या भटकंतीच्या आयुष्यातल्या या खऱ्या हमसफरला कोटी कोटी धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...