Thursday, September 14, 2017

| बैल ©

कसा हाय ह्यो आमच्या शिवारातला खिल्लार राजा, हिरव्यागार शालुवर कुणीतरी पांढरा गंध लावावा तसा ऊठुन दिसतोय. काल रात्रीच्या पावसामुळे नद्यांना पुर आला होता; म्हणुन हिरो होंडा घरीच ठेऊन आज माझ्या फोर्ड मध्ये काॅलेजला निघालो. बोनादेवीजवळ येताच हा खिल्लार बैल चरताना दिसला. 'व्होल वावर ईज आवर' या अविर्भावात तो गवतावर यथेच्छ ताव मारत होता. जेवणाच्या ताटात बसुन जेवण सुरू असल्याचा त्याचा आनंद मी गाडी थांबवुन मोबाईल मध्ये कैद केला. पावसाळ्यात गुरा ढोरांना खायला काही कमी नसतंय. अगदी तोंड फिरल तिकडं चरायला बक्कळ असतंय पण उन्हाळ्यात चार काड्या खायला कित्येक मैल फिरावं लागतंय. निसर्ग त्यांच्या आहाराची काळजी घेत असतो तोवर ठिक परंतु उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने याच गाई बैलांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. कुणी वैरण विकत आणुन जगवतो, कुणी छावणीत लावतो तर कुणी खाटकाला विकतो. कारण पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली जनावरं आपल्या डोळ्या देखत दावणीला मरणं कुणालाच आवडत नसतं.
फिरस्ती जनावरं कधीच उपाशी मरत नाहीत पण पाळलेली जनावरं चारा पाण्याअभावी मरतात. स्वतःला एकदा का दावणीला बांधुन घेतलं की जीवन मरणाचा कासरा मालकाच्या हातात द्यावा लागतो. आपल्याला सकाळची भाकर संध्याकाळी खायची म्हणले तरी जिवावर येते पण हि बैलं पावसाळ्यातले गवत आणि सुगीतला कडबा वाळवुन वर्षभर खातात; कसलीही तक्रार न करता. लई भेटलं म्हणुन माजत नाहीत आणि नाही भेटलं म्हणुन रडत नाहीत.
खालील फोटोत दिसणाऱ्या खिल्लारी बैलाचा रूबाब त्याच्या सभोवताली असलेल्या हिरव्यागार शिवारामुळं वाढलाय. त्यालाही माहिती आहे हे दिवस बदलनार आहेत. हिरवे डोंगर सोनेरी होतील, लुसलुशीत गवत पिवळे होईल, ओला चारा सुका होईल, पण सरतेशेवटी जिंदगीच्या सारीपाटावर टिकुन राहण्यासाठी मिळेल ते दोन घास खाऊन; पडेल ते काम करणे एवढंच त्याच्या नशिबात आहे. हा बैल जरी एकटाच दिसत असला तरी याच्या वेसणीला बांधलेला कासरा मात्र जवळच झोपलेल्या त्याच्या मालकाच्या हातात आहे. शिवारात वाटेल तिकडे फिरण्याचे स्वातंत्र्य नसले तरी आहे या परिस्थितीत रूबाबात जगण्याचे स्वातंत्र्य मात्र त्याच्याकडे नक्कीच आहे. माणुस असो वा बैल शिवार चांगला दिसला कि रूबाब तर मारणारंच !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ सप्टेंबर २०१७

1 comment:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...