Tuesday, September 12, 2017

| बालाघाटचं कासपठार ©

निसर्गाची चित्रकला बघायला एका ठरावीक ठिकाणीच जावे लागते असे काही नाही. ते सौदर्य शोधण्याची दृष्टी असली की अशी चित्रकाला आपल्या सभोवतालीही पाहता येते. या लेखासोबत जोडलेला फोटो सातारच्या कास पठारचा नसुन तो आमच्या उक्कडगांवच्या माळावरचा आहे. आज सकाळी काॅलेजला जाताना हे सौदर्य माझ्या डोळ्यांसह खास आपल्यासाठी मोबाईलमध्येही टिपलं. पावसाच्या सततच्या अभिषेकाने काळ्या पाषानावर सुद्धा तृण उगवली आहेत. गवताच्या शेकडो प्रजाती ईथेही फुलल्या आहेत. हिरव्यागार गालिचावर गुलाबी, पिवळ्या आणि निळ्या फुलांनी नक्षीकाम केलंय. पाऊलवाटांवर घानेरीच्या फुलांचा सडा पडलाय, इवल्याश्या वाटेवरून चालताना झाडांच्या पानावर थांबलेल्या दवबिंदुंनी कपडे ओलेचिंब होतात. केसाहुन बारीक पडणाऱ्या पावसाच्या सरी शरिरात झिरपुन जातात. पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा व किटकांचा आवाज, झऱ्यांचा खळखळाट, या मिश्रणातुन तयार झालेलं मधुर संगीत मनाला मनस्वी आनंद देते.
एखादे विशिष्ठ ठिकाण जागतिक वारसा यादित आहे म्हणनुनच त्याची काळजी घेण्यापेक्षा ज्या गोष्टी निसर्गाने खास आपल्या आनंदासाठी निर्माण केल्या त्याचे संगोपन व संरक्षण स्वयंप्रेरणेनेच व्हायला हवे. पर्यावरणाला नेस्तनाभुत करणारा एकच घटक निसर्गाने तयार केला आहे आणि तो म्हणजे 'माणुस' याच्याशिवाय उरलेल्या त्र्याऐंशी लक्ष, नव्व्यान्नव हजार, नऊशे नव्व्यान्नव जिव निसर्गाशी युद्ध खेळत नाहीत. पण माणुस मात्र विकासाच्या नावाखाली अनेक डोंगर, नद्या, पठार, जलाशय यावर अतिक्रमन करतोय, झाडे तोडतोय, हवेत विषारी वायु सोडतोय, आणि हे सगळं करत असताना स्वतःच स्वतःला मारतोय.
उन्हाळ्यात जळलेल्या स्मशानासारखे दिसणारे डोंगर पावसाळ्यात स्वर्ग बनतात. मातीच्या उदरात झोपलेली हराळी श्रावणात बहरून येते आणि भाद्रपदात फुलांची उधळण करते. त्यांच्या या निसर्गचक्रात आपण तर फक्त एक ठिपका असतो. तरी सुद्धा यांचे संरक्षण आपण करतोय असा आव आणतो, खरंतर यांचे संरक्षण आपण नाही तर उलट हेच आपले संरक्षण करत आहेत अनाधीकालापासुन. आपण आहोत म्हणुन ते आहेत; असे नसुन ते आहेत म्हणुन आपण आहोत एवढं जरी प्रत्येकाने ध्यानात ठेवले तरी पर्यावरण संवर्धनास मदत होईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ सप्टेंबर २०१७

2 comments:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...