Sunday, September 17, 2017

| पिपाणीवाला ©

हे आहेत आमच्या पांगरीचे गोरख गायकवाड. आज रविवार असल्याने आमच्या पांगरी पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक व माझे मित्र धनंजयराव ढोणे साहेबांसोबत निवांत गप्पा मारत बसलो होतो. गायकवाड मामा काही कामासंदर्भात तिथे आले होते. भाया दुमडलेला एक जुनाट रेगाळा शर्ट, काळसर पॅन्ट, हातात बाजारातलं साधं घड्याळ, डोक्यावर घामाने भिजलेली गांधी टोपी आणि पायात खालुन ईगरलेली व फक्त पन्न शिल्लक राहिलेली काळी चप्पल. लहाणपणापासुन आमच्या गावात कुणाचेही लग्न असुद्या बॅण्डमध्ये ट्राम्पीट वाजवायला गायकवाड मामा फिक्स असायचे. पिपानीवाले मामा म्हणुनच मला ते जास्त माहित होते. लग्नाच्या वरातीत डान्स करण्याऐवजी मी या पिपाणीवाल्या मामांना आणि ढोल वाजवणाऱ्या सुधाकर मामांलाच बघत बसायचो. लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी यांनी तब्बल पन्नास वर्ष पिपाणी वाजवण्याचे काम केलंय. फक्त सव्वा रूपया दिवसाला रोजगार असल्यापासुन ते बॅण्ड कंपनीत काम करत होते. आज खुप दिवसांनी गायकवाड मामांना पाहुन भुतकाळ ताजा झाला.
हललीच्या युवा पिढीला मात्र कान तृप्त होण्यापेक्षा शरिर हालणारं संगीत लागतंय त्यामुळे आपसुकच गायकवाड मामांसारख्या कित्येक कलाकारांचा पारंपारिक रोजगार बुडाला आहे. आमच्या गावात डाॅल्बी आणि पियानोचा वापर व्हायच्या आधीपासुन गायकवाड मामा व सुधाकर जानराव मामा आमिन साहेबांच्या बॅण्ड कंपनीत कार्यरत होते. अंगावर चढवलेल्या लाल गणवेशात बॅण्ड वाजवतानाचा त्यांचा आवेश तर बघण्यासारखा असायचा. संगीतात एका पिपाणीचे महत्व किती असते हे सैराट चित्रपटाचे संगीत ऐकले की समजते. परंतु आमच्या गावात गेली पन्नास वर्ष बॅण्ड वाजवुन उदरनिर्वाह करणारा हा माणुस; आज वयाच्या 84 वर्षानंतरही कष्टाची कामे करून पोट भरत आहे हे समजल्यानंतर अक्षरशः पोटात कालवले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे असे नाही परंतु कष्ट करण्याची सवय बसुन खाऊ देत नाही. "शरिर कामात गुंतलं की बरं असतंय; न्हायतर एकदा का हाथरून धरलं कि थेट मसनवाटाच गाठावं लागतंय" म्हणुनच या वयातही ते मिळेल ते काम करतात.
कमवण्याचे वय झाल्यानंतरही दुसऱ्यांच्या जिवावर रेघोट्या मारणाऱ्या, बेरोजगारीच्या नावाखाली फक्त व्यवस्थेला शिव्या घालत बसणाऱ्या, ताटली बाटलीसाठी गांवभर बोंबलत फिरणाऱ्या, आणि अर्ध्यातुन शिक्षण सोडुन दोन नंबर करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच गायकवाड मामांकडे पाहुन स्वतःच्या तारूण्याची लाज वाटेल.
ईतकी वर्ष ज्या बोटांनी ती पिपाणी धरली ते थरथरते हात आज मी हातात घेऊन गायकवाड मामांना धन्यवाद बोललो आणि ज्या ओठांनी त्या पिपाणीमध्ये स्वर फुंकले त्या ओठांनी गायकवाड मामा मला धन्यवाद म्हणले. आपुलकी आणि माणुसकी अजुन काय असावी. इथुन पुढे ते जिथे कुठे भेटतील तिथे थांबुन नमस्कार करीन. दोन वेळच्या जेवणाची सोय करायची हिम्मत अजुनही त्यांच्यात खच्चुन भरलेली आहे. प्रेरणा घेण्यासाठी समाजात खुप मोठी उंची गाठलेलीच माणसे हवीत असे काही नसते ती गायकवाड मामांसारख्या ग्रामिण कलाकाराकडुनही घेता येते. अशा व्यक्तींचे भुतकाळातले योगदान स्मरण करून त्यांना वर्तमानात सन्मान देणे हेच आपले कर्तव्य आहे; जे पार पाडुन मी आज कृतार्थ झालो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...