Wednesday, September 13, 2017

| सहारा ©

सहारा बालगृहाच्या वतीने आयोजित केलेल्या अंजली व सुजितकुमार या एड्सग्रस्त अनाथ दांपत्याच्या विवाह सोहळ्यास आज आवर्जुन उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. कळंब जि.उस्मानाबाद येथील बालगृहाचे संस्थापक श्री.शहाजीराव चव्हाण आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या लग्नसोहळ्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सलाम. आजवर मी खुप लग्न पाहिली परंतु पोटच्या मुलीपेक्षाही सुंदर लग्न सोहळा करणाऱ्या सहारा बालगृहास भेट देऊन अनाथांसाठी व एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेबद्दलचा अभिमान आणखीनच वाढला. गेल्या दोन वर्षापासुन या संस्थेशी मी जोडलो गेलो आहे परंतु त्यांचा आजचा उपक्रम म्हणजे ते आजवर करत आलेल्या सेवेचा मानबिंदू ठरला आहे.
अनाथांना ते अनाथ असल्याची जाणिव न होऊ देणे हिच खरी आपुलकी असते जी सहारा बालगृहाने सांभाळली. अंजली नावाच्या मुलीला या बालगृहाने बालपणापासुन सांभाळलं, मातृप्रेम दिलं आज तिथली एक लेक सासुरवाशीन होत असताना माहेरचे जे काही रितीरिवाज असतात ते सर्व पुर्ण करून सहाराने एक आदर्श निर्माण केला आहे. एकीकडे आईवडील आणि सर्व जनगोत असतानाही काही मुलींची होणारी फरपट आणि एका अनाथ मुलीला सहाराने दिलेली माया हिच आजच्या समाजातली सर्वात मोठी दरी आहे.
एका उदात्त सामाजिक भावनेतुन हा विवाह सोहळा नोंदनी पद्धतीने संपन्न झाला. नवदांम्पत्यांवर फुलांचा वर्षाव करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
नवरा नवरीच्या पत्रिकेत ना आज्याचे नाव; ना पंज्याचे ना वडीलांचे. ज्या नावाने हाक मारतो तीच त्यांची ओळख. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवलेल्या आपल्यातीलच काही भल्या माणसांनी मामा आणि आई वडीलांचे कर्तव्य बजावुन त्यांचे कन्यादान केले. आजवरचे पांढरे शुभ्र आयुष्य जगलेल्या अंजलीच्या आयुष्यात विवाहानंतर मात्र सप्तरंग भरले जातील.
या लग्नसोहळ्यासाठी आमदार, खासदार आणि एस.पी, कलेक्टरसह वऱ्हाड म्हणुन सहारा एच.आय.व्हि गृहातील ४५ सवंगडी तर स्वआधार मतिमंद निवासी प्रकल्पातील ५७ मुली उपस्थित होत्या.
वधु आणि वर दोघेही एड्सग्रस्त आहेत. देवाने त्यांच्या नशिबात अजुन किती दिवस शिल्लक ठेवलेत माहित नाही पण आपल्यापेक्षा नक्कीच कमी असतील, अणि अशा परिस्थितीतही हे दांम्पत्य त्यांच्या लग्नाचा क्षण अतिशय आनंदाने जगत आहेत. खरंच मरायला ठेपलेल्या माणसाला सुद्धा जगण्याचा अंकुर फुटावा असाच हा सोहळा अनुभवण्याचे भाग्य मला लाभले त्याबद्दल सहारा बालगृहाचे मनस्वी आभार व शुभेच्छा !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...