आपल्या राज्यात अ,ब,क,ड नावाच्या जाती आहेत. ज्यातील अ जातीच्या पूर्वजांकडे भरपूर जमीन होती, मोठ मोठे वाडे होते, कुटुंब सधन होती. अ जातीच्या घरी आणि शेतात क, ड जातीचे लोक कामाला असायचे.
ब जातीच्या लोकांकडे कौशल्य होते पण स्वतःची जमीन नसल्याने शेतातली किंवा इतर उद्योग व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे.
क आणि ड जातीचे लोक उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे अ आणि ब जातीवर अवलंबून असायचे. त्यांना स्वतःची जमीन नव्हती, राहायला पक्की घरे नव्हती. खूप कष्ट करून देखील मोबदल्यात फक्त शिळ्या भाकरी किंवा कालवण मिळायचे.
अ जातीतील काहींनी ब, क आणि ड जातीतील लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही काही काळ अमानुष वागणूक दिल्याने ब, क, ड जातीतील लोकांना अ जातीबद्दल अन्यायाची भावना आहे.
देश स्वतंत्र झाला, ब, क, ड जातींना आरक्षण मिळाले. त्यामुळे शिक्षण मिळाले, नोकऱ्या मिळाल्या आणि समानता आणण्याचे क्रांतिकारक पाऊल पडले.
काही वर्ष सरली,
मग
अ जातीच्या लोकांकडील जमिनींचे विभाजन होवून होवून आता बहुतांशी लोक अल्पभूधारक झाले. नापिकी, दुष्काळ, शेतमालाचा कवडीमोल भाव त्यामुळे सर्वाधिक आत्महत्या अ जातीतील शेतकऱ्यांच्या झाल्या. त्यांच्या मुलांनाही मग नोकरी हाच उत्तम पर्याय वाटू लागला.
आता काही ब, क किंवा ड जातीच्या लोकांकडे अ जातीचे लोक कामाला असतात. काही अ जातीच्या लोकांकडे अजूनही ब, क, ड जातीचे लोक काम करतात.
अलीकडील काळात ब, क, ड जातीतील काही लोक सधन, जमीनदार झालेत. तर काही लोक अजूनही भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखाली आहेत. अ जातीचे काही लोक शेकडो, हजारो एकर जमिनीचे मालक झालेत तर बहुतांशी लोक भूमिहीन होवून शेतमजुरी करीत आहेत.
ब, क, ड जातीतील काही कुटुंब आता श्रीमंत झाली आहेत तरी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळते, अ जातीतील काही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आली आहेत पण त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही.
आता शासकीय नोकऱ्यांची जाहिरात निघते, परीक्षा होते, निकाल लागतो.
ब, क, ड जातीतील आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या काही उमेदवारांना कमी मार्क पडले तरी आरक्षणातून नोकरी मिळते. अ जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या काही उमेदवारांना जास्त मार्क पडूनही फक्त आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही. मग अशा उमेदवारांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होते.
अ आणि ब जातींची लोकसंख्या क आणि ड च्या तुलनेत जास्त असल्याने वर्षानुवर्ष अ जातीचे राजकारणावर वर्चस्व आहे. ब, क, ड जातींना आरक्षण देण्यासाठी अ जातीचेही योगदान आहे.
ब, क, ड जातींचे सामाजिक दृष्ट्या मागसलेपण सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण आहे तर अ जात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत असल्याने त्यांना आरक्षण नाही.
गेल्या सत्तर वर्षांत खूप गोष्टी बदलल्या आहेत.
नोकरी, उद्योग, शेती आणि व्यवसायाच्या माध्यमातून अ, ब, क, ड या जातीतील उच्चभ्रू लोकांची श्रीमंत नावाची एक जात तयार झाली आहे आणि त्याच सर्व जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची गरीब नावाची एक जात तयार झाली आहे. आरक्षणाची खरी गरज आता अ, ब, क, ड मधील सर्वच गरिबांना आहे.
विशाल गरड
७ सप्टेंबर २०२३, पांगरी