Wednesday, August 31, 2016

| खांदेमळणी ©

आज खांदं मळणीचा दिस, सकाळपसुनच कपाटातल्या चंगाळ्या, कंडं, माटाड्या, गळ्यातला गोगर, झुली, पायातलं तोडं ही बैलांची समदी आभुषणं भाहीर काढली. चंगाळ्या पितांबरीनं धुताना व्हणारा आवाज डायरेक्ट दावणीलाच घिऊन गेला. म्या पाचवीत असताना उन्हाळ्याच्या दिसात आमच्या रानातल्या हिरीजवळच्या चिचंखाली झोपल्यावर; शेजारीच बांधलेल्या सोन्या आन् सावळ्या ह्या बैलांच्या; वैरण खाताना व्हणारा चंगाळ्यांचा आवाज आजुनबी कानत जस्सान तस्सा घुमतुया. हाल्ली आसलं आवाज कदीमदीच ऐकायला मिळत्यात. आज कालेजवुन आल्या आल्या आमच्या आण्णां, आबा आन् आजिनाथ भऊ सोबत लोणी, हळद, मोळ (हराळीचा प्रकार) सोनं, दुध आन् नैवेद्य म्हणुन भाजी भाकरी घिऊन आज सांच्याला रानात गेलो. आमच्या आण्णा आन् आबांसोबत खांदमळणीला जाणं हि माझी लई जुनी परंपरा हाय. खांदं मळताना येणारा बैलांच्या वसवंडीचा वास कस्तुरीपेक्षा भारी वाटायला.
आजकाल बैलं सांभाळण्याची संस्कृतीच कमी व्हायलीया त्येला कारणंबी तशीच हायती म्हणा. बैलांची जागा टॅक्टरनं घितली. आमच्याबी शेतात बैलासोबत चार बैलांचं काम करणारा एक छोटा टॅक्टर हाय, आज खांदमळणीला त्येलाबी पुजलंय आणि सर्व्हीसींग पण किली. गावाकडं हाय म्हणुनशान बैलाच्या खांद्यावरून लोण्याचा आन् हाळदीचा हात फिरवायला मिळतुया न्हायतर मातीच्याच बैलांना पुजाव लागलं आसतं.
भारतीय शेती संस्कृतीतला सर्वात ईमानी घटक म्हंजी बैल हाय आसं मला वाटतय. वरीसभर खांद्यावर कुळवाचा 'जु' आन् बैलगाडीचा 'दांड' घिऊन ह्योच बैल काळ्या आईची सेवा करतो, त्याच खांद्याला एक दिवस तरी आराम मिळावा म्हणुनशान हा बैलपोळ्याचा सण साजरा केला जातुय. आता उद्या तर म्हशीच्या शिंगांला वारनेस लावायला, गाईंच्या शिंगांना गोंडं लावायला, बैलांच्या शिंगांना शेंब्या आन् बेगड लावायला, हि समदी घरची गुरंढोरं रंगवायला येगळीच मजा येणाराय. आज आमच्या शेतावर बैलांची चौथी पीढी काम करतीया. म्या जन्मायच्या आधी शिंगऱ्या-पक्षा, लहाणपणी सोन्या-सावळ्या, तारूण्यात वकील्या-परदाण्या, आन् आता प्रौढावस्थेत सर्जा-राजा अशा बैलजोडींनी मला आन् माझ्या शेताला सोबत दिली. ह्या समद्यांना आज आठवण काढणं माझं कर्तव्यच हाय. शेतात राबराब राबुन काळ्याआईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खऱ्या पाठीराख्यांस बैलपोळ्याच्या कष्टाळु शुभेच्छा !
कष्टमेव जयते !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३१ ऑगस्ट २०१६
वेळ : सायंकाळी ७ ते ८ (बैलपोळ्याची पुर्वसंध्या)

Tuesday, August 30, 2016

| भाकरीचा काला ©

गावरान गाईचं तापुन तापुन लालसर झाल्यालं दुध आन् चुलीवरच्या इस्त्यावर भाजुन गरमा गरम पापुडा आल्याल्या कडक भाकऱ्या. माझ्या आईनं रामपारीच उठुन हे तयार करून ठिवलंय. परातीत एक भाकर चुरून, त्यात दुध टाकुन, सटर बटर काला कुस्करून ताव मारल्याबीगीर ती मला कालेजात जाऊ देत नाय. त्यात ह्यो भाकरीचा काला जर आईनं तीज्या हातानं चुरला आसलं तर मग खाताना त्यिज्या हातातुन काल्यात उतरल्यालं तिजं पिरीम पष्ट जाणवतंय. शुद्ध आहारातुनच शुद्ध ईचार जल्माला येत्यात आसं ती म्हंती. कोणच्याबी आजारात चालणारा ह्यो आहार जेवढा पौष्टीक तेवढाच त्यो एकदम खमंग आन् ग्वाड लागतुय. त्यात दुधावर आल्याली साय मिसळल्यावर तर त्याची गुडी आजुनबी वाढतीया. दुधात जर भाकर लईयेळ भिजिवली तर तोंडात दात नसनाराबी दनकुन ताव मारू शकतंय. हारएक रांगड्या शेतकऱ्याचा ह्यो आवडीचा आहार हाय. काळ्या आईच्या पोटात तयार झाल्याली जवारी आन् गाईच्या कासत तयार झाल्यालं दुध ह्यंच्या संयोगातुन तयार झाल्याला भाकरीचा काला म्हंजी रानटी जेवणातली स्विट डिश हाय. आसली जबरी डिश भाहीर कोणच्याच हाटेलात भेटत नाय.
तव्यावर भाकर भाजल्यावर ती कडक व्हायला चुलीच्या म्होरं ठिवायची . त्या भाकरीला लागलेली राख सुद्धा काल्यात मिसळती. थोडासा करपल्याला पापुडा गुडीत खमंगपणा आणतंय. माझं घरं एकदम साधंच हाय, जुनाट पत्र्याचा वाडा. आधी तर मातीची भिताडं व्हती, आता कुठं पिलास्टर केलया. घराचा आकार आन् रंग बदलला आसला तरी आमच्या चुलीवर शिजणारी भाजी आन् तव्यावर भाजणारी भाकरी तीच हाय.
फुटुत चुलीम्होरं दिसणारी दरांक्षाची लाकडं आमच्याच शेतातली हायती. जित्ती आसताना दराक्षे लागायची पण मधल्या गारपीटीत बाग मोडली तवापासुन सरपण म्हणुन काम करत्यात. ह्या लाकडानं चुलीमदी आर चांगला पडतंय. घरात गॅस हाय पण फकस्त चहा करायला वापरत्यात. गॅसवरबी भाकर तयार व्हती पण तिज्या पापुड्यात खमंगपणा येण्यासाठी तिला चुलीतला आरच लागतुया. हे समदं आसलं खायला भेटतयं म्हणुनच मला मुंबईकर व्हण्याच्या लईमट्या ऑफर्स आसतानाबी पांगरीकर म्हणुन र्राह्यलाच जास्त आवडतंय.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑगस्ट २०१६
वेळ : सकाळी ८ ते ९

Monday, August 29, 2016

| शिक्षकरत्न ©

ड्रिम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिक्षकरत्न या पुरस्काराचे वितरण आज सोलापुर येथील श्री.सिद्धेश्वर सभामंडपात सोलापुर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू व जेष्ठ विचारवंत डाॅ.इरेश स्वामी,  यांच्या हस्ते पार पडले.
मी वयाच्या २१ व्या वर्षीच शिक्षक पेशा स्विकारला. गेल्या आठ वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शिकवले व लाखो लोकांचे प्रबोधन केले. चार भिंतीच्या आत बसलेल्या विद्यार्थ्यांसोबतच भिंती बाहेर असलेल्या समाज नावाच्या घटकाचेही प्रबोधन करण्यासाठी माझ्या अंगात असणाऱ्या प्रत्येक कलेचा प्रामाणिकपणे सदुपयोग केला. इतर क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांनी आजवर मी सन्मानीत झालोय परंतु माझ्या सर्व कलागुणांचं उगमस्थान असणाऱ्या शिक्षक या पदवीला मिळालेला शिक्षकरत्न हा बहुमान अभिमानास्पद आहे. हा बहुमान विशाल गरड या नावाचा नसुन त्या नावाआधी लागलेल्या प्राध्यापक या शब्दाचा आहे.
हा सन्मान फक्त माझा नसुन ज्या विद्यार्थ्यांना मी आजवर शिकवले त्यांचा आहे, ज्या लोकांचे मी प्रबोधन केले आणि ज्या लोकांनी माझे प्रबोधन केले त्यांचा आहे, ज्या संस्थेत मी कार्यरत आहे त्यांचा आहे, ज्या माणसानं मला प्राध्यापक बनवलं त्यांचा आहे आणि शाळेसोबतच शाळाबाह्य समाजप्रबोधन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे.
मी एक शिक्षक आहे. आज जरी या शिक्षकापुढे रत्न हा शब्द जोडला गेला असला तरी माझी खरी रत्न ही मी आजवर शिकवलेले विद्यार्थीच आहेत ज्यांचा मला प्रचंड अभिमान आहे. विद्यार्थ्यांकडुन शिक्षकाला मिळणारा आदर आणि सन्मान जगातल्या सर्वश्रेष्ठ सन्मानापैकी एक आहे असे मी समजतो.
आज जरी मी शिक्षकरत्न या पुरस्कारानं सन्मानीत झालो असलो तरी "मला मिळालेला हा पुरस्कार, गेल्या दहा-बारा वर्षापासुन विनापगार प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील विनाअनुदानीत शाळेवरील तमाम शिक्षकांना अर्पन करतोय" कारण त्यांच्या त्यागापुढं माझं कार्य हे एक ठिपकाच.

Thanks to  Dream foundation & All the juries who believe on my work & consider me as a deserved person for Shikshakratna award.

प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक - २७ ऑगस्ट २०१६
वेळ - सायंकाळी ५ वाजता

Wednesday, August 24, 2016

| बांडगुळ ©

काल मुक्कामी बार्शीत होतो. आज सकाळी बार्शीहुन पांगरीला येताना घारी जवळील पुरी या गावच्या फाट्यावर एका विद्युत खांबाजवळ वड, पिंपळ आणि बाभळ यांच्या सुरेल संगमातुन निर्माण झालेल्या एका झाडाचा फोटो टिपला. गेली कित्येक दिवस मी बार्शी-पांगरी प्रवासादरम्यान त्या झाडाकडे कुतुहलाने पाहत आलोय. तसं पहायला गेलं तर वड आणि पिंपळाला प्रचंड धार्मिक महत्व आहे. आणि बाभळीला मात्र तिच्या काटेरी स्वभावामुळे कुठेच पुजले जात नाही; अर्थात तिचं आयुर्वेदीक महत्व असतानाही. या झाडाचे मुख्य खोड बाभळीचे आहे. त्याखालच्या मुळ्या सुद्धा बाभळीच्याच आहेत. परंतु खोडाचा भाग मात्र अर्धा वड आणि अर्धा पिंपळ असा वाढला आहे. काही वर्षापुर्वी एखादं पाखरू उडता-उडता या बाभळीच्या खोडावर बसलं असावं आणि त्याच्याच विष्ठेतुन ह्या दोन महाकाय वृक्षांची बीजे रोवली गेली असावीत. आज या दोन्ही वृक्षांनी खोडावर स्वतःच साम्राज्य निर्माण केलं असलं तरी पाण्यासाठी मात्र बाभळीच्याच जिवावर अवलंबुन रहावे लागते. कदाचीत त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांची वाढ म्हणावी तशी बलाढ्य झाली नाही. कारण बाभळीच्या आणि वड पिंपळाच्या मुळ्यांमध्ये फरक तर असणारच.
एखाद्या झाडाच्या खोडावर दुसऱ्या प्रजातीच्या झाडाची वाढ होणे याला सायन्सच्या भाषेत 'पॅरासाईट' म्हणतात आणि मराठीत 'बांडगुळ' म्हणतात. परंतु बांडगुळ ही संज्ञा झाडांपेक्षा माणसांमध्येच जास्त आढळते. कुण्या दुसऱ्याने निर्माण केलेल्या पायावर स्वतःचे शरीर पोसण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची वृत्ती जोपर्यंत आपल्यात निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा अशाच बाभळरूपी माणसांसोबत रहावे लागते, त्यांचा स्वभाव काट्यासारखा बोचणारा असला तरी त्यांच्यातल्या प्रेमाच्या ओलाव्यावर आपला सहवास जिवंत ठेवावा लागतो.
स्वतःची मुळं विकसीत न केलेले वड आणि पिंपळ कुठपर्यंत जिवंत राहतील माहीत नाही परंतु वृक्ष संस्कृतितलं अमृत प्यालेल्या, सर्वाधिक आयुष्य असलेल्या वड आणि पिंपळाला पोसल्याचा अभिमान  बाभळीला सदैव राहील तर स्वतःच्या मुळ्यावर उभा नसल्याने वटपौर्णिमेदिवशीही उपेक्षितच राहील्याची खंत वडाला सदैव राहील.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 24 ऑगस्ट 2016
वेळ : सकाळी 10 ते 11

Sunday, August 21, 2016

| मातीतलं सोनं ©

मातीत सोनं असतं असं म्हणतात त्याची प्रचिती आज मला आली. आज काॅलेजहुन येताना मावळतीच्या सुर्याची सोनेरी किरणे एका मुरूमाच्या गढीवर पडली होती. मी एकटक त्या गढीकडं पाहत उभा होतो. जणु सोन्याचाच डोंगर असल्याचा भास झाला. उगवतीचा आणि मावळतीचा सुर्य हाच खरा परिस आहे. त्याची सोनेरी किरणे ज्याच्यावर पडतात तो सोन्यासारखाच भासतो. केवढी ही ताकद निसर्गाची. फोटोग्राफीची आवड असल्याने निसर्गाचे असे अद्भुत चमत्कार टिपण्यासाठी आणि त्यावर विचार करून ते शब्दबद्ध करण्यासाठी मी सदैव उत्सुक असतो.
माझ्या नेहमीच्या पायवाटेवर डोंगर उताराच्या कडावरच ही मुरूमाची गढी आहे. तसं तर माझ्यासाठी निसर्गाची किंमत ही सोन्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. सोनं हा तर निसर्गाच्या निर्मितीचा एक क्षुल्लक घटक आहे. जगातले बहुतांशी मौल्यवान धातु मातीतच तयार होतात. परंतु आधुनिक युगात जर मातीवर एखादी वस्तु पडली तर ती घाण होते असे म्हणतात. कुठे बसतानाही कपडे खराब होतील म्हणुन  भुईवर कोणीही बसत नाही. लहाणपणी माती खाणारे आपण; मोठ्यापणी त्याच मातीला झाकण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावतो. जुन्या घरामध्ये मातीचा आपल्या पायाशी व शरीराशी थेट संपर्क रहावा यासाठी अंगण असायचे हल्ली मात्र त्या अंगणातही फरशा पडल्यात. जेव्हा माणसाला खायला काही नसेल तेव्हा एक किलो मातीची किंमत हि नक्कीच एक किलो सोन्यापेक्षा जास्त असेल. आधुनिकीकरण आणि स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हींग च्या भंपकगिरीमुळे आपण आपल्या मातीचा स्पर्श तोडत आहोत. शेवटी प्रत्येक सजिव हा याच मातीची निर्मिती आहे, तिच्या मनात आले तर एका क्षणात ती सर्वाना पोटात घेईल कायमचीच.
हा लेखप्रपंच मला ज्या फोटोवरून सुचला त्या फोटोतली सोनेरी किरणांनी उजळुण निघालेली मुरूमाची गढी मला 'निसर्ग' नावाच्या देवाच्या मंदिराचा कळस वाटते. ज्या देवापुढं मी सदैव नतमस्तक.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 21 ऑगस्ट 2016
वेळ : सायं 7:30 ते 8:30

Saturday, August 20, 2016

| वैजियंताबाई ©

नाव ऐतिहासिक वाटतंय ना ? असंच माझ्या घरातल एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व म्हणजे आमची आज्जी वजाबाई होय. तिला लाडाने जरी सर्व 'वजा' म्हणत असले तरी प्रेम व जिव्हाळा तिने 'बेरजेत' दिलाय. अवघ्या दुसरीत असतानाच तिच्या बापानं तिचे लग्न आमचा आज्जा म्हणजेच तुकाराम गरड यांच्याशी लावलं. ईनबीन अक्षरं समजु लागली होती तोवरच नवरा पदरात पडला आणि शिकायची इच्छा असतानाही संसार उभारला. तिच्या सासर आणि माहेरात फक्त पंन्नास फुटाचे अंतर आहे. सासरच्या उंबऱ्यातुन माहेर दिसतंय एवढंच काय ते सुख म्हणायचं. बाकी आजोबा फक्त नावानेच तुकाराम स्वभाव मात्र रागीट. त्यांचा बाप बाबुराव गरड तर याहुन करारी. वजाबाईची सासु तानुबाई आशील सासु होती. उंबऱ्याच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी पंचायीत. कष्ट, माया आणि भक्ती या तिन्हीचा सुरेल संगम म्हणजेच वैजियंताबाई होय.
तोडकं मोडकं वाचत वाचत वजाबाई आज पुस्तक वाचत बसली होती. हो पण तिच्या सोईनुसार बरंका. जोडशब्द आणि मोठे शब्द वगळुन तिचे वाचन सुरू होते. अस्खलित जरी वाचता येत नसले तरी वाचन साहित्य हातात पकडण्याचेच तिला भारी कौतुक वाटते. वार्धक्यामुळे आता तिची मान व हात थरथर कापत आहेत तरी त्याच थरथरत्या हातांनी ती पुस्तक पकडते आणि जमेल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करते. "शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असतो" असे ती आम्हाला लहाणपणापासुन सांगते. माझी बातमी जर कधी पेपरात आली तर ती एक बातमी दिवसभरात वाचुन काढते. तिच्या या जिद्दीमुळंच तिने आजवर सोळा अभंग आणि सात गवळणी तोंडपाठ केल्यात. आजही प्रत्येक भजनात तिच्या सुंदर आवाजात हे अभंग ऐकले की धन्य वाटते.
मी कुठेही बाहेर चांगल्या कामाला निघालो की साखर आणि तुळशीपान हातात दिल्याशिवाय ती मला उंबरा ओलांडु देत नाही. पांगरीच्या निलकंठेश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा आहे. श्रावणातले चार सोमवार तर ती फक्त दुधावरच धरते. एवढंच नाही रमजान मधले काही रोजे पण करते. तिला आम्ही कोणतीही आनंदाची बातमी सांगीतली की "निळोबारायानं चांगलं कंलं" हे तिचे ठरलेले वाक्य. तिचा मराठी महिण्यांचा अभ्यास छान आहे. इंग्रजी महिण्यातला फरक तिला अजुनही समजत नाही. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आईतवार, निहीरी, एकादशी, अमावस्या, भजन, किर्तन, सांच्याला, अशा शब्दांच्याच माळा ती विणते. आजारपणावरचे काही गावठी ईलाज पण तिला बऱ्यापैकी माहीत आहेत. एरव्ही तर तिचा हात लागलाकीच आमचा अर्धा आजार बरा होतो कारण तेवढे प्रेम आणि सामर्थ्यच त्या स्पर्शात असते.
आमचं लाड शेत घेताना तिच्या सासऱ्याने पाच तोळ्याच्या पाटल्या मोडल्या होत्या; त्याची खंत ती अजुनही बोलुन दाखवते. तिने तिच्या लेकरांवर व नातवांवर खुप चांगले संस्कार केलेत पण आई हा शब्द लेकरांकडुन तिला कधीच ऐकायला मिळाला नाही कारण घरात तिच्या लेकरांपेक्षा ननंदाच जास्त होत्या, त्या सगळे तिला वहिणी म्हणायच्या, पुढे लेकरांनीही तोच वारसा चालवला. तिच्या लेकरांना आता नातवंड पावलीत तरी सर्व तिला वहीणेच म्हणतात. आईचे नावं बदललं तरी तिचे प्रेम आणि जिव्हाळा मात्र तोच आहे.
खरंतरं "आज्जी नावाचं विद्यापीठं ज्या घरात असतं त्या घरातील लेकरांना संस्काराची टिव्हीशन लावायची गरजच पडतं नाही." आणि असं विद्यापीठ अजुनही आमच्या घरात सर्वांना मार्गदर्शन करत उभा आहे हे आमचे भाग्यच; कारण हे विद्यापीठं बांधता येत नाही ते स्वयंभुच असावं लागतं. मला सुद्धा एक लेखक म्हणुन सुचणाऱ्या सगळ्या तत्वज्ञानाचं मुळ याच वैजियंताबाईमध्ये दडलं आहे. म्हणुनच हा लेखप्रपंच.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 20 ऑगस्ट 2016
वेळ : सायं 7 ते 7:30

Wednesday, August 17, 2016

| पाऊलवाट ©

रस्ता या शब्दाची जननी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी पाऊलवाट. या सृष्टीवर जेव्हा मानवाचा पहिला पाय चालायला लागला असेल, तेव्हाच पाऊलवाटेचाही जन्म झाला असावा. वाटसरूला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवणारी हि पाऊलवाट प्रत्येकाच्या आयुष्यात असते. कोणी निर्माण करतो तर कोणी रूळलेल्या वाटेवरूनच चालतो पण पाऊलवाटेवरचा प्रवास करतोच. तसे तर पाऊलवाटेचे बरेचशे प्रकार आहेत. डोंगरातली, बर्फातली, शेतातली, रस्त्यालगतची, नांगरटीतली, खडकावरची, नदीतली, वड्यातली, हागणदारीतली, चिखलातली आणि माझ्या काॅलेजला जाणारी; यापैकी डोंगरातली पाऊलवाट सध्या श्रावणामुळे हिरव्या शालुला सोनेरी किनार लावल्यासारखी उठुन दिसत आहे. अशा अनेक प्रकारच्या पाऊलवाटेवरून आपली पाऊले चाललेली असतात. प्रत्येक पाऊलवाट आपल्याला खुप काही शिकवते. त्या पाऊलवाटेवर चाललेल्या हजारो-लाखो पाऊलांची व्यक्तीमत्व जणु गुरूत्वाकर्षन शक्तीमुळे त्या पाऊलवाटेमध्ये झिरपलेली असावीत असाच भास होतो. विज्ञानवादी दृष्टीकोनातुन जरी हे चुक असले तरी कल्पनावादी दृष्टीकोणातुन हे खरंच वाटतंय.
आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा प्राथमिक परिचय याच वाटेवरून चालताना उमगतो. वितभर जाडी आणि अनंत लांबी असलेल्या वाटेवरून चालताना; आपल्या आधी चाललेल्या पाऊलखुणा पुसुन स्वतःच्या पाऊलखुणा उमटवत आपला प्रवास सुरू असतो. रूळलेल्या वाटेवरून प्रवास करणे सोपे परंतु काट्याकुट्यातुन नवीन वाट तयार करणे कठीन असतं. नवीन वाट तयार करणाऱ्याच्या पायाला असंख्य काटे आणि दगडं टोचतात परंतु त्याच्या रक्ताळलेल्या पायामुळेच पाऊलवाटा अधोरेखीत होतात.
पाऊलांच्या सोबतीशिवाय या वाटा लुप्त होतात. तर सततच्या चालण्याने या अधिकाधीक अधोरेखीत होत जातात. आदिवाशी, गुराखी, शेतकरी आणि ग्रामिण माणसांचा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पाऊलवाटेला कधीच खड्डे पडत नाहीत. जमिन अधिग्रहन लागत नाही, किंवा याच्या डागडुजीसाठी स्वतंत्र निधीही लागत नाही, यावर गतीरोधक नसतात, जर कधी हि वाट बंद करायची झालं तर फक्त वाळलेल्या येड्या बाभळीच्या दोन तीन फंजारी आडव्या टाकायच्या; बस्स, वाट लगेच बंद. स्वतःच्या पायावर चालणाऱ्या प्रत्येक प्राण्याला व मानवाला हि पाऊलवाट पथदर्शी असते. अशाच वाटेवरून आपणही प्रवास करत असताना फक्त खाली पाहुण चालत राहण्यापेक्षा; या वाटेवरून पहील्यांदा चाललेल्या पायांचे स्मरण करावे, ती वाट अधोरेखीत केलेल्या प्रत्येक पाऊलाचे स्मरण करावे, नक्कीच आपल्याला एक नवीन पाऊलवाट निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळेल ज्या सामर्थ्यातुन तुमची एक स्वतंत्र पाऊलवाट तयार होईल ज्यावरून भविष्यात लाखो पाऊले चालतील.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 17 ऑगस्ट 2016
वेळ : सायं 6 ते 7

Friday, August 12, 2016

| निवांत ©

| निवांत ©

आज कालेजातुन रोजच्याऊनी निघालो. मस्त केसागत श्रावणी सरी बरसुन गेलत्या. साऱ्या गवतावर पाण्याचं थेब चिटाकलं व्हतं. म्या आपलं माझ्या गाडीवर पायवाटेवरची दगडं चुकवीत-चुकवीत निघालु व्हतु. तेवढ्यात माझी नजर मानिकराव वर पडली. जवळच्याच टिकडीवर मानिकराव मुंढे हे शेतकरी त्यांच्या दोन म्हशी आन दोन शेरडं राखत निवांत गवताच्या गालीच्यावर झोपलं व्हतं. त्यंची समदी प्राॅपर्टी डोळ्यादेखतच चरत व्हती. कसलं टेंन्शन नकु ना ताण; लईच निवांत बेत व्हता एकदम. दिवसभराची ड्युटी संपुन म्या बी नेटकाच कालेजातुन निघालु व्हतो  मग म्हनलं जरा मानिकरावच्या निवांतपणात आपणबी निवांत व्हावं. बसलुकी मग गप्पा हानीत.
चार दोन शब्द बोलतुय ना बोलतुय तुच शेरडं फारीष्टात निघाली. माणिकराव उठायची गडबड करायलं म्या मनलं "आवं झोपा निवांत; यीतु मी वळती करून". एक छकाटी हातात घिऊन फारीष्टाकडं ग्याल्याल्यी ती दोन शेरडं हर्र..हर्र...करत हाकीत आणली, तेवढ्यात एक रीडी शेरडावरं तुंबायली. तिला "आ हाल्या...हा...ईऽऽऽक" मनलं की गप्प चरायली. माणिकराव मनलं "सर, चांगलं जमतंय की राव तुमालाबी" एक मैंदाळ हास्यकल्लुळ झाला. तसं तर माणिकरावची आन् माझी रोजच गाठ पडती कारण दोघांचाबी ड्युटीवर जायचा आणि ड्युटीऊन ययचा टायम सेमच हाय.
सकाळ-सकाळ निहीरीची भाकरं फडक्यात गुंडाळुन, पायात कातडी बुट, खिशात पान-सुपारी, चुना डबीचा बटवा, आन् खंद्याला छत्रीचा दांडा आडकुन दोन म्हसरं आन् दोन शेरडं घिऊन माळावर निघायचं. दिवसभर वळत्या करायच्या आन् कटाळा आला की उघड्या आभाळाखाली हिरव्या गादीवर उशाला मोठा दगड घिऊन निजायचं. दिवस मावळता पुन्हा हि जित्राबं हाकीत डोंगर उतरायचा आन् कोट्यावर वैरण पाणी करूण आन् धारा काढायच्या. दुधाची कॅण्ड सायकलला आडकुन ठरल्यालं रतीबं आण खव्याच्या भट्टीवर दुधु वाढायचं. ह्यवडं समदं केल्यावर आठवड्याला हजार रूपये पगार हातात पडतंय. पण माणिकराव ह्यवढ्या पगारीतंच सुखी आन् समाधानी हायतं हे ईशेष. ह्यंन्ला कधी सातवा वित्त आयुग लागला नाय, ना दरवर्षी कसली इंक्रीमेंट झाली नाय तरी ह्यंचं जगणं सुखी आन् समाधानी हाय. तर दुसरीकडं पिओपी केल्याल्या हाफीसात, मऊ मऊ खुडचीवर, गार-गार यीसीत बसुन महीना लाखभर पगार आसुनबी कायम टेंन्शनमदी राहणारी माणसं हायती.
तसं बगायचं झालं तरं जगणं समद्यांच सारखंच हाय, फकस्त वागण्यात फरक हाय. दोन येळच्या भाकरीची सोय करण्यासाठी हि समदी भटकंती सुरू हाय पण ह्यवढ्यातुन सुदा काय निवांत क्षण आपुन जगायलाच पायजेल तरंच जिंदगीचा खरा आर्थ समजल नायतर आपुन समदी पैशे कमीवनाऱ्या मशनी हुन बसु.
आज एका नामांकीत कालेजात प्राध्यापक असणारा मी; पाच वाजल्यापसुन दिस ढळुस्तोर चक्क एका शेतकऱ्याची गुरं राखीत व्हतो. दोन्ही कामात मला सुखचं मिळालं कारणं म्या माझी पगार आन् प्रतिष्ठा पैशात नाय आनंदात मोजतो.

| लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
| दिनांक : 12 ऑगस्ट 2016
| वेळ : सायंकाळी 6 ते 7

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...