Monday, August 8, 2016

| दोस्त ©

| दोस्त ©

एक असा शब्द जो उच्चारला कीच अर्ध्या अडचनी दुर होतात. प्रत्येकाला जन्मापासुन मरणापर्यंत सोबत करणारी हि उपाधी सर्वात श्रेष्ठ आहे. काल या शब्दावर मी खुप विचार केला आणि आज लिहायचे ठरवले. मित्र या शब्दाचा जुळाभाऊ असलेल्या दोस्त या शब्दातच मैत्रीची व्याख्या समजते. मैत्री होण्यासाठी कुणीतरी एक दुसरा असावा लागतो. कमीत कमी दोघे एकत्र आल्याशिवाय दोस्त या शब्दाची स्थापना होऊ शकत नाही. त्याच दोन मधला "दो" हे दोस्त या शब्दातलं पहिलं अक्षर आहे आणि नंतर आहे "स" आणि "त" हि एकमेकांना जोडलेली दोन अक्षरे. यातला "स" हा सहवासाचा आहे व "त" हा ताकदीचा आहे.
कोणत्याही दोन व्यक्तीच्या ताकदीला म्हणजेच ती ताकद शारीरिक असेल किंवा वैचारीक असेल यांना जर योग्य सहवास लाभला तर दोस्त नावाची एक शक्ती तयार होते ज्या शक्तीवर आपण जग जिंकु शकतो. मुळात एकट्याने जग जिंकण्याची संकल्पना मला जरा चुकीचीच वाटते. कारण आपल्या प्रत्येक जिंकण्यात दोस्त नावाची शक्ती कळत नकळत सोबत असतेच. आजवर ज्यांनी कुणी जग जिंकले असेल मग ते कोणत्याही क्षेत्रात असुद्या दोस्तांच्या मदतीशिवाय ते केवळ अशक्य गोष्ट होती.
दोस्त हि पदवी प्रत्येकाला जन्मतःच मिळते कारण आपण प्रत्येकजण आपल्या आई वडील्यांच्या दोस्तीचं अपत्य आहोत.
जुण्या रूढी परंपरेतला सती हा शब्द सुद्धा याच दोस्ती मधल्या "स्ती" पासुन तयार झालेला असावा असे मला वाटते म्हणुनच 'जिवाला जिव देणारा दोस्त' या वाक्याचा उलगडा मला सती प्रथेतुन होतो.
'द' या अक्षराचा इंग्रजी अर्थ 'विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी' असा होतो. 'द' हे पुर्ण अक्षर, 'स - त' अर्धे-अर्धे, एक काना आणि एक मात्रा यातुन निर्माण झालेला दोस्त हा शब्द कालपासुन माझ्या प्रत्येक पेशीत भिनला होता. काल दोस्त या शब्दाची कॅलिग्राफी काढतानाच मला या शब्दाचे तत्वज्ञान समजले. प्रा.विशाल गरड याने दोस्त हा शब्द जरी कागदावर; बोटात पेन धरून काढला असला तरी या कामात त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव सहभागी होता.
होय, खरंच आहे ते. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची एकमेकांसोबत असणाऱ्या घनिष्ठ दोस्तीमुळेच तर आपण जिवंत आहोत. दोस्त नावाची शक्ती आपल्या शरीरात काम करते याचा पुरावा आपण जिवंत असणं आहे. आतली शक्ती तर जन्मजातच मिळते परंतु बाहेरची 'दोस्त' नावाची शक्ती स्वतः कमवावी लागते. या दोन्ही शक्तींच्या सहवासातुनच जगण्याची ताकद मिळते. आणि ज्याच्याकडे जगण्याची ताकद असते तो जग सुद्धा नक्कीच जिंकु शकतो.
प्रिय दोस्तांनो, माझा 'दोस्त' हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा एक जवळचा दोस्त म्हणुन प्रा.विशाल गरड हे नांव सदैव स्मरणात ठेवा. कधी कुठे भेटलोच तर एकमेकांच्या सहवासातुन नक्कीच आपली ताकद वाढवु. "फक्त एका शब्दावर विचार करून स्वतःच्या तत्वज्ञानाने त्या एका शब्दाचे रूपांतर जो शेकडो शब्दात करतो" तोच खरा लेखक असतो असे मीच म्हणतो. आणि आज ते मी केलंय याचा प्रचंड अभिमान वाटतोय.
'दोस्त' हा लेख जरी इथे संपला असला तरी आपली दोस्ती इथुन सुरू झाली आहे जग जिंकेपर्यंत......
चला जग जिंकायला

| लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
| दिनांक : 8 ऑगस्ट 2016
| वेळ : रात्री 7 ते 9
| 📞 : 8888535282

1 comment:

  1. छान ,, लिखाण वाचन असेच निरंतर चालू ठेवा,, आपली शब्द संपत्ती वाखाणण्याजोगी आहे,,

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...