Sunday, August 7, 2016

| माळावरचा ऋषी ©

| माळावरचा ऋषी ©
ओ..s..ss.. सर थांबा !
काॅलेज सुटल्यावर माझ्या रोजच्या पायवाटेवरून आज टेकडी उतरत होतो; तोच हा आवाज माझ्या कानावर पडला. गाडी थांबवुन मागे वळुन पाहीले. गाईचा कासरा सावरत एक लहाण मुलगा माझ्याकडे पळत येताना दिसला. जवळ येताच तो म्हणाला. "आव काय सरं ? दर शनवारी शाळा सुटल्यावर तुम्हाला भेटायसाठीच मी हितं माळावर गुरं घिऊन येतोया " थोडीशी धाप टाकत-टाकत तो बोलला. मग मी त्याला भेटण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला "सर, मलाबी कवी आन् लेखक व्हयचंय, कविता लिहिण्याची मला लई आवड हाय. लई दिसापासुन तुम्हाला भेटायचं व्हतं बघा" त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहुण मी क्षणात गाडीचं स्टॅण्ड लावलं आणि खाली उतरलो. त्याच्या सोबत असलेल्या एकादशी आणि शुक्री या दोन गाईंना एका झुडपाच्या खोडाला कासऱ्याने बांधलं आणि मग एका स्वच्छ खडकावर, निरभ्र आकाशाखाली, हिरव्यागार गवताच्या आंथरूणाजवळ आणि थंडगार वाऱ्याच्या झुळुकीत दोन कवी शब्दांच्या युद्धात गुंग झाले.
फक्त माझी भेट व्हावी म्हणुन दर शनिवारी माझ्या रोजच्या पायवाटेवर हा मुलगा गाई राखायला यायचा हे कळल्यापासुनच त्याच्याबद्दलची प्रचंड आपुलकी माझ्या मनात निर्माण झाली.
उक्कडगांवच्या शाळेत शिकणारा ऋषिकेश पाटील नावाचा हा मुलगा सध्या इयत्ता दहावीत शिकत आहे. वडील शेतकरी असुन वाटेलगतच त्यांचे शेत आहे. काव्यलेखनाचा याला चांगलाच छंद आहे. त्याने त्याच्या आयुष्यातली "शेतकरी बाप" नावाची पहिली कविता गेल्या जानेवारीत लिहिली आहे. आजवर सात कविता लिहिलेल्या ऋषिकेशला कवी व्हायचंय आणि त्यासाठी त्याने माझी भेट घेऊन मार्गदर्शन घ्यायचे ठरवले होते. त्याच्या वर्गात एकुण सत्तावीस मुलं आहेत यापैकी त्यालाच फक्त कवी व्हायचंय बाकीच्यांना डाॅक्टर, इंजिनिअर आणि कलेक्टर व्हायचंय असं त्याने मला सांगीतले. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या दोन रचनाही सादर करून दाखवल्या. त्यापैकी एक अशी होती,
"असं वसलंया गांव, बालाघाटाच्या कुशीत,
सोनवणे काॅलेजनं, लई झालं सुशिक्षीत,
हिरव्या गार वनराईनं, दिसतं सुशोभित,
आई येडाई कृपेनं, लई हाय ते खुशीत..."
एवढ्या लहाण वयातच ऋषिकेशची हि रचना ऐकुण त्याने पाहीलेल्या स्वप्नांची मजबुती मला जाणवली. त्यांने पाहीलेलं स्वप्न तो खुप लवकर पुर्ण करील हे त्याच्यासोबत साधलेल्या संवादातुन स्पष्ट झालं.
आपण निर्माण केलेल्या अभिव्यक्तीच्या प्रभावातुन ईतरांनाही आपल्यासारखंच व्हावसं वाटणं हे जिंकणं या शब्दापेक्षाही श्रेष्ठ गोष्ट आहे असं मला वाटतं.
शेवटी खुप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्यावर "सर, लेखक आणि कवी होण्यासाठी मला अजुन काय करावं लागलं ?" असं ऋषीने जिज्ञासेने विचारले आणि मी फक्त त्याला एवढंच म्हटलो की " तुझ्या नजरेचे रूपांतर जोपर्यंत दृष्टीत होत नाही आणि त्या दृष्टीचे रूपांतर जोपर्यंत शब्दांत होत नाही तोपर्यंत निरीक्षण करत रहा, तु एक दिवस नक्की खुप मोठा लेखक आणि कवी होशिल"
हे त्याला सांगता सांगताच मी एका हाताने आमचा सेल्फी घेतला, ऋषीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली, शेजारी उभ्या असलेल्या एकादशी आणि शुक्रीची पाठ थोपटुन गाडीची किक मारली आणि पुन्हा लवकरच भेटुयात असं सांगुण एका भावी कवीचा निरोप घेतला.


✍| लेखक - प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
(डाॅ.चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव)

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...