Wednesday, December 7, 2022

ओ मांजरेकर, बस्स की राव आता

ओ मांजरेकर, काय मज्जा लावली राव तुम्हीबी, बस्स करा की आता. तो अक्षय कुमार वर्षात पाच सहा पिच्चर काढतंय. एखाद्या भूमिकेसाठी महिनो महिने मेहनत घेणारे हाय पेड अभिनेते खुद्द छत्रपतींची भूमिका साकारताना मात्र हे असे ऐनवेळी सर्वसामान्य अंगरखा चढवून आणि बहुरुप्या सारखी दाढी चिटकवून रोलसाठी तयार कसे होतात. वर्षभर ओरिजिनल दाढी वाढवणे वगैरे त्यांना परवडत नसावे कारण मग गुटख्याच्या किंवा घातक कोल्ड्रिंक्सच्या जाहिराती त्यांना करता येत नसतील.


अक्षय कुमारचे सध्याचे वय पंचावन्नच्या आसपास आहे. नेसरीची लढाई झाली तेव्हा महाराजांचे वय चौतीसच्या आसपास असेल. म्हणजे त्यावेळी महाराज किती तरुण होते बघा. चित्रपट निर्मितीचा एवढा अनुभव पाठीशी असताना तुम्हाला हा साधा अभ्यास का बरं करू वाटला नसेल आश्चर्य आहे. महाराजांचा अंगरखा म्हणजे काय पटकर वाटलं काय तुम्हाला ? तो हातातला शेला म्हणजे काय सत्काराची शाल आहे काय ? पोटाला कराटेचा ब्लॅक बेल्ट बांधलाय काय ? पायातली मोजडी लग्नातल्या नवरदेवाकडून उसने मागून आणली काय ? आणि राजदरबारात तर बल्पचे झुंबर लावलंय. अरे काय धंदा लावलाय. काहीचं काही करायलात. आर्ट डिरेक्टर आणि कॉस्च्युम डिरेक्टर नेमके कुठून उचलून आणलेत ?


काँट्रॅव्हर्सी झाली की चित्रपटाचे प्रोमोशन आपोआप होते हाच तुम्हा लोकांचा फंडा असतो हे मला चांगलं ठाऊक आहे. पण विषय आमच्या अस्मितेचा आहे तेव्हा तुमचा कोणताच फंडा इथं काम नाही करणार. आजवर छत्रपतींच्या सन्मानासाठी माझ्यासारखे अनेक विचारांचे वंशज मैदानात होते त्यात आत रक्ताचे वंशज सुद्धा शड्डू ठोकून उभारले आहेत तेव्हा आता तुम्हाला सुट्टी नाही गड्याहो. तुम्ही शिवचरित्रावर कामच करू नका असे आमचे अजिबात म्हणणे नाही फक्त जनमानसाच्या मनात जो राजा आहे तो तसाच दिसू द्या एवढंच अपेक्षित आहे. पावनखिंड चित्रपटात ज्या अभिनेत्याने शिवा काशीदची भूमिका साकारली होती तो हुबेहूब राजांची प्रतिमा भासत होता. पावनखिंड पाहताना सुद्धा सारखं वाटायचं की यालाच शिवरायांची भूमिका द्यायला हवी होती.


चित्रपटासाठी करोडो रुपयांचे बजेट असते तुमच्याकडे मग बत्तीस मनाच्या सिंहासनावर बसणाऱ्या माझ्या राजाची भूमिका साकारणाऱ्या नटाच्या कॉस्च्युमसाठी तुम्हाला भिकेचे डोहाळे का बरं लागतात. ऐश्वर्य संपन्न राजा, गळ्यात कवड्या सोबत मोत्यांच्या सुध्दा माळा असायच्या त्यांच्या. अंगरख्यावर सोनेरी नक्षीकाम असायचे तेही सोन्याच्या धाग्यांनी विणलेले. पाहताच डोळे तृप्त व्हावे असे ते तेजस्वी रूप असे मग तुम्हालाच ते दाखवताना कुठे कुत्रे चावले कळत नाही. आशुतोष गोवारीकर जर जोधा अकबर मध्ये अकबर बादशहा जसा चित्रात दिसतो त्यापेक्षा दसपट ऐश्वर्य संपन्न दाखवू शकतात तर जो राजा चित्रात सुद्धा ऐश्वर्य संपन्न दिसतो निदान तो आहे तसा तरी दाखवण्याचे प्रामाणिक कष्ट घ्या. 'देर आओ लेकीन दुरुस्त आओ'.


विशाल गरड

७ डिसेंबर २०२२, पांगरी




Wednesday, November 23, 2022

प्रेसिडेंट

मी जरी मोटिवेशन द्यायला इकडे तिकडे व्याख्यानाला जात असलो तरी आम्हाला जिथून मोटिवेशन मिळतं ते विद्यापीठ माझ्या शेजारी उभं आहे. हे आहेत आमच्या संस्थेचे अध्यक्ष सोनवणे सर. सरांनी एकसष्ठी पार केली आहे पण ते फक्त अकड्यापूरतीच, कारण माझ्यापेक्षा वयाने दुप्पट असणारे सर त्यांच्यासोबतच्या सहवासात मात्र समवयस्क वाटतात. म्हणतात ना माणसाच्या शरीराचे वय कितीही वाढले तरी मनाने नेहमी तरुण राहायला हवे अगदी तसेच आहेत माझे बॉस.

आमच्या डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या लातूर, उक्कडगाव, पुणे आणि धारशिव अशा चार शाखांना एकमेकांशी कनेक्ट ठेवायला सरांचा प्रवास सुरु असतो दिवसाकाठी आजही रोज किमान दोनशे किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतो. आमच्या शेकडो प्राध्यापकांचं आणि हजारो विद्यार्थ्यांचं हे प्रेरणास्थान याही वयात आमच्यासोबत चिरतरुण बनून राहतं मग अशा व्यक्तिमत्वाच्या छत्र छायेखाली आम्हालाही बहुआघाड्यांवर काम करण्याची शक्ती मिळते.

जगाच्या पाठीवर अनेक शिक्षण संस्था आणि संस्थापक असतील पण सोनवणे सरांनी जी तत्व बाळगून संस्था सुरू ठेवली आहे ती एकमेवाद्वितीय आहे. अनेक चाके असलेला हा कॉलेजरूपी रथ सरांच्या सारथ्यामुळे यशस्वी घोडदौड करत करत नव नवे उच्चांक प्रस्तापित करतोय. ते जेव्हाही येतात, भेटतात, खांद्यावर हात टाकतात, पाठीवर थाप टाकतात, आपुलकीने चहा पाजतात तेव्हा आमच्यात एनर्जी भरून जातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे "बस्स यही है हमरी सरकार."

प्रा.विशाल गरड
२३ नोव्हेंबर २०२२, सोनवणे कॉलेज, उक्कडगांव



Friday, November 18, 2022

लावणीवरचं अतिक्रमण गौतमी

गावा गावातल्या पोरांमधी गौतमीची क्रेझ हितकी शिगंला पोहचल्याली हाय की पर्वा एक जण म्हणाला "चार म्हशी इकीन पण गौतमीला एकदा तरी गावात आणीनच." कसली ही हवा, कसलं हे येड, कसला ह्यो जलवा, आरं.. आरं..आरं.. जाळ धुर संगटच. अंगावर लावणीचा शृंगार चढवलाय खरा पण त्यातून बिभत्स रसच जास्त ओसंडून वाहतंय म्हणूनच कार्यक्रम बघून आलेली पोरं रात रात झोपणात. जे फकस्त मम्बईतल्या डान्स बारमदी बघाया मिळत व्हतं ती आज गौतमीमुळं खेडो पाड्यातील चौकात बघायला मिळायलंय. गर्दी मोक्कार जमती, पार चेंगराचेंगरी व्हायचा वकुत येतंय म्हणल्यावर स्पॉन्सरची पण मुरकंड पडायली. त्या डॉल्बीच्या साऊंडवर कोण नाचणार ? 'ना तुम्ही ना आम्ही तिथं फक्त गौतमी.'


सध्या बेरोजगारी इतकी भयानक टोकाला गेलीये की लग्नाचं नावबी काढलं तर नोकरी, जमीन, बंगला असल्याशिवाय स्थळं येईनात. अशात गावागावात पंचवीशी, तिशीतल्या पोरांच्या फौजा तयार झाल्यात. काही आहेत विचारी, इमानी, कष्टाळू, होतकरू पण काही आहेत बापाच्या आणि नेत्याच्या जीवावर एंटरटेनमेंटची भूक भागवणारे. गौतमीनं चार भिताडाच्या आतला डान्सबार रस्त्यावर आणला. तिच्या शृंगाराला भुकेले जीव आंघोळीचे पाणी तिर्थ म्हणून प्यायला सज्ज आहेत. आधीच किशोरवयीन पोरांना मोबाइलने पॉर्नोग्राफीच्या मगरमिठीत वेढले असतानाच जर आता लावणी सारख्या नृत्याची आणि पोशाखाची मोडतोड करून त्यातून अश्लील हावभाव आणि अंगप्रदर्शनाचा खेळ खुलेआम होणार असेल तर सुसंस्कृत महाराष्ट्राला हे अभिमानानं मिरवण्यासारखं नक्कीच नाही.


तिचं ते केस उडवनं, अंगावर बाटली ओतून घेणं, पदर काढून तो आभाळात भिरकावणं, हात आणि डोळ्याचा वापर करून बिभत्स हावभाव करणं हे सोडून तिच्या नृत्यातला बाकीचा भाग कौतुकास्पद आहे. तिची अदाकारी, तिची डेरिंग, सौंदर्य अफाट आहे. सध्या ती बंदुकीतल्या गोळीच्या वेगाने गाजतेय पण जर वेळीच तिला योग्य दिशा नाही मिळाली तर या क्षेत्रातलं अमरत्व तिच्या वाट्याला येणार नाही. चेहऱ्यावर थोडया सुरकुत्या पडल्या की खेळ आपसूकच गुंडाळला जाईल. मी काही कधी गौतमीच्या शोला गेलो नाही पण मोबाईलवर सहज जरी फेसबुक इन्स्टाचे रील बघत बसलो तरी त्यात पाच पन्नास रिल्स गौतमीचंच दिसत्यात म्हणून मग व्यक्त व्हावं वाटलं.


इथं नाचणारी गुन्हेगार, का तिच्या सोबत नाचणारे गुन्हेगार, का तिला नाचायला बोलावणारे गुन्हेगार आहेत ? माहीत नाही. पण ज्या राजाने त्यांच्या दरबारात असे नाच गाण्याचे शौक फर्मावले नाहीत त्याच राजाच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या राज्यात आयोजित होत असलेले हे शौक महापुरुषांच्या विचारांना छेद देणारे आहेत. उद्या यातल्या काही पैशाने गबरगंड असलेल्या तथाकथित अनुयायांनी जयंत्यांना वगैरे असे कार्यक्रम आयोजित करू नये म्हणजे मिळवले.


डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा करंट नेमका कुठं लागतोय त्याने कोणता अवयव सुखावतो किंवा बावचळतो यावर त्या कलेचे परीक्षण होऊ शकते. हे जर चार भिंतींच्या आत होत असलं असतं तर लिहिण्याचं काही कारण नव्हतं पण हे सार्वजनिक स्थळी घडतंय म्हणून सार्वजनिक लिहावं लागतंय. बाकी पटलं तर घ्या नाहीतर वाचून सोडून द्या. गौतमीला शुभेच्छा.


विशाल गरड

१८ नोव्हेंबर २०२२, पांगरी




Wednesday, November 9, 2022

Dear Rahul Gandhi

Struggle is important in everyone's life. Now you are on the right way of success. I always like your  never give up attitude though you are criticized by your oppositions as pappu & all. But you show us your intellectual power by your behaviour & now you are showing your physical strength through the Bharat Jodo yatra. Salute to you man !

Sometimes, I didn't like your way of speech before. But we are human not God. Made mistakes, correct it & go ahead but never stop. One day a big success is waiting for you. In future if you beat Modiji then this is your biggest history. You won the people in your own way not by the parent's work. That's why now you are on the right track. Afterall your grand mother's & father's blood will never be underestimated by Indians but now it's a time to use your blood to refresh your ancestors history. 

I am not a blind supporter of Prime Minister or Rahul also. It's just an opinion as a voter of this country. 'Jo garibo ke liye ladhega wo raja banega jo raja jaisa banke rahega wo ek din garib banega' it's karma chakra. You walk on the village roads, city roads, gullys & vallys one day you will walk on red carpet if you don't return to your past then red carpet will drag from your feet by voters.

I respect our Prime Minister. It not means that I hate Rahul. Both has its own strengths I like both in different ways & that's my culture. Yet I am not in politics but I have right to choose politician so this is the most powerful thing for everyone. Leader never born in mom's womb, so Rahulji you are walking through your mom's womb called Bharat Mata. If your views & aspects are true then destiny will give you a big success ahed.

How much we study and how much we learn when we walk among people.This is what I wrote in my 'Rayari' novel which was published in February 2022. According to that when you will get success? I don't know but I am sure you will win one day definitely. All the best Rahulji. Keep struggling.

Vishal Garad
Writer & Orator | 9 Nov 2022 | Pangri

Saturday, November 5, 2022

साहेब, काळजी घ्या !

जुन्या पिढीतील राजकारणी म्हणून ज्यांनी सर्वाधिक निवडणूका अनुभवल्या असे देशात आपण एकमेव पुढारी आहात. वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी तुम्ही पक्षासाठी घेत असलेले कष्ट कुणालाही प्रेरणा देणारेच आहे. अशात आपण आजारपणातही करीत असलेले दौरे जरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत असले तरी ते तुमच्या स्वतःच्या शरीर स्वास्थासाठी दगदगीचे असतात. जिथं ऐन एकविशी पंचवीशीतली पोरं सुद्धा हल्ली थकवा येतो म्हणून रेड बुल वगैरे पिऊन एनर्जी मिळवतात तिथं तुमच्या सारखी माणसं या वयातही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट एनर्जीने उभे राहतात ही साधी गोष्ट नाही.

तुमचे कट्टर राजकिय शत्रूही खाजगीत तुम्हाला प्रचंड मानसन्मान देतात. मुळात तुमचं वलय एखाद्या पक्षापुरते मर्यादित नसून सर्वच पक्षातील लोक तुम्हाला मानतात. टिका टिपण्ण्या, विचार सरणीचे हेवे दावे, आरोप प्रत्यारोप राजकारणाचा अविभाज्य भाग आहेत. ते झालेत, होत आहेत आणि पुढेही होतच राहतील. पण खरंच सांगतो साहेब मी ना कुण्या पक्षाचा कार्यकर्ता, ना नेता आहे पण एक सामान्य माणूस म्हणून आपल्यासारख्या बुजुर्ग नेत्याला वयाच्या शंभरीहुन अधिक आयुष्य लाभावे हीच आमची इच्छा आहे. ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचनारही नाही कदाचित कारण सगळीकडे तर तुम्ही आजारी असताना शिर्डीला उपस्थित राहिल्याचा जणू विजयोत्सवच साजरा केला जात आहे आणि करावाही. मलाही तुमच्या अशा कृतीचे आजवर कौतुकच वाटत आले आहे पण साहेब, तुम्हाला असे हाताला पट्ट्या, पायाला बँडेज लावलेलं पाहिलं की आता तुम्ही प्रकृतीची काळजी घायला हवी अशी भावना आपसूकच मनात दाटते.

सुप्रियाताई, सध्या साहेबांच्या सर्वात जवळ तुम्ही आहात तेव्हा आजारपणात वगैरे साहेबांनी दौऱ्यावर जाणे, प्रवास करणे कटाक्षाने टाळायला लावण्याचा आग्रह फक्त तुम्हीच त्यांच्याकडे करू शकता. ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा वगैरे गोष्टी लिहिताना विशेषण म्हणून ठिक आहेत पण शरीराच्या अवयवांवर त्याचा प्रभाव पडत नाही. मुळात माणसांना भेटणे हेच साहेबांचे खरे टॉनिक आहे ज्याच्या जोरावर त्यांनी दुर्धर आजारांवर सुद्धा विजय मिळवलाय पण वाढत्या वयात साहेबांनी थोडी दगदग कमी करावी. राजकारण राजकारणाच्या जागी सोडा पण जर आपल्या घरातले आजोबा आजारपणातही फिरत असतील तर कुटुंबातला एक सदस्य या नात्याने त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मग महाराष्ट्र नावाच्या कुटुंबातला हा एक सदस्य आजारपणाची तमा न बाळगता याही वयात न थकता, न दमता काम करतोय म्हणून त्यांना प्रेमपूर्वक विनंती करावीशी वाटते "साहेब, काळजी घ्या"

नेते कुणा एकाचे नसतात त्यांनी त्यांच्या कार्यातून सर्वच जनतेवर प्रभाव टाकलेला असतो तेव्हा त्यांना काळजी घ्या म्हणायचा अधिकार प्रत्येकालाच प्राप्त होतो, त्याच अधिकारातून हा लेखप्रपंच केलाय. बाकी पोस्ट निव्वळ अराजकीय आहे. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राजकिय कमेंट टाळाव्या आणि या पोस्टकडे सहानुभूतीने पाहावे ही विनंती.

विशाल गरड
५ नोव्हेंबर २०२२, पांगरी

Wednesday, November 2, 2022

आरं आरं महादेव

हेडिंग वाचून कसंसं वाटलं ना, पण मी 'हर हर महादेव' पाहिल्यानंतर माझ्याही तोंडून हेच शब्द निघाले "आरं.. आरं.. महादेवा, माझ्या राजाच्या इतिहासाचं हे काय करून ठेवलंय यांनी" शिवकालीन मावळे खूप अस्सल लढले ओ पण या कमर्शिअल फिल्मच्या जमान्यात अलिकडील काही दिग्दर्शकांनी त्या मावळ्यांना पार अवेंजर्सचे रूप दिलंय. हर हर महादेव चित्रपटातल्या घोडखिंडीत झालेल्या लढाईत तर जेव्हा एक गनीम हातोडा हातात घेऊन येताना दिसला तेव्हा तर मी डोक्यालाच हात लावला. स्क्रिप्ट लिहिताना लेखकाच्या मागे काय त्या थायनॉसचं भूत लागलं होतं की काय ? का झोपताना हॉलीवूडचा रॉंग टर्न पिक्चर बघितला होता म्हणून शेवटी गनीम कमरेतून कापलेला वगैरे दाखवलाय. अरे एवढीच खुमखुमी होती हॉलिवूडचा टच द्यायची तर मग एखादे काल्पनिक पात्र रंगवायचेना, त्यासाठी ज्यांचा इतिहास आणि पराक्रम फक्त इथल्या मातीच्या कनांवरच नाही तर प्रत्येक मराठ्यांच्या मनामनांवर रुजला आहे त्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच अशा कलाकृती का ? 

अबे फायटिंग आणि युद्ध यात फरक असतो रे हे का नाही लक्ष्यात येत. आणि बाजीप्रभूंनी 'खिंड' लढवली होती 'दरी' नाही. बिग बजेट चित्रपट असतानाही खापटाची दरी उभारून त्यात पाच सहा ट्रॅक्टर वाळू ओतून त्यावर शूटिंग केलीये हे लैच नाट्यमय वाटतंय. दुसरं महत्वाचं म्हणजे मराठा हा शब्द मराठीला सिनिअर आहे. मुळात मराठा शब्दाची व्याप्ती शिवकाळात एवढी मोठी होती की त्यात मुसलमान सुद्धा गणले जायचे. मुळात तो एक समूहवाचक शब्द होता त्याचे जातीत रूपांतर अलीकडे झाले हे ध्यानात घ्या. पण महाराजांची भूमिका साकारणाऱ्या नटाच्या तोंडून 'मराठा' शब्दाला 'मराठी'ने रिप्लेस करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं होतं ? 

शस्त्र तयार करणाऱ्या लोहाराकडे महाराज संन्याशाच्या पेहरावात जायचे काय ? अफजल्याने महाराजांच्या डोक्यात कट्यार घुसवली होती काय ? शिवछत्रपतींचे डोळे, नाक, कान, दाढी मिशा याबद्दल सविस्तर वर्णन उपलब्ध असताना त्यांच्या जवळपासही न दिसणाऱ्या नटाला ही भूमिका देण्यामागची काय बरे मजबुरी असावी ? अहो आम्ही चार दोन पुस्तकं वाचलीत म्हणून एवढे तरी विचारतोय पण ज्यांना महाराजांचा इतिहास माहित नाही त्या परभाषिक लोकांवर तुम्ही चित्रपटातुन छापलेलं आता कसं पुसायचं ? का तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही कायपण करत बसायचं ?

महाराजांच्या गळ्यात जशी कवड्याची माळ तसेच कपाळी चंद्रकोर आणि शिवगंध असायचा चित्रपटात मात्र महाराजांच्या कपाळी फक्त एक नामाटी दाखवली. बाजीप्रभूंची भूमिका साकारलेल्या नटाचे डायलॉग पाठ केल्यासारखे वाटतात. काही सिन गडावर शूट केल्याने त्यात जिवंतपणा आलाय. सिनेमॅटोग्राफी आणि बिजीएम उत्तम झालंय. उपभूमीका साकारणारी सगळीच पात्र सपकल बसली आहेत त्यांची वेशभूषा आणि अभिनयही तितकाच सरस झालाय त्या सर्वांचे कौतुक पण मुख्य भूमिका साकारणारी पात्रच गंडली आहेत हे दुर्दैव.

बाजीप्रभूंच्या पराक्रमाला हर हर महादेवच्या तुलनेत पावनखिंड चित्रपटात बऱ्यापैकी न्याय दिलाय. हर हर महादेवच्या लास्ट फ्रेम पेक्षा पावनखिंड चित्रपटात दगडाला टेकून निपचित पडलेले बाजीप्रभूंची फ्रेम आणि त्यामागे हळुवारपणे उमटणारे  'श्वासात राजं रं.. ध्यासात राजं' हे बीजीएम हजार पटीने सुंदर वाटतं. इथे मला तुलना अजिबात करायची नाही पण एक श्रोता म्हणून जे अनुभवलं ते जसंच्या तसं इथं लिहावं वाटलं म्हणून ती आपसूकच झाली.

मुळात चुका दाखवण्याचा माझा स्वभाव नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना त्याच्या काय गर्भकळा असतात, किती टिम एफर्ट असतो, शूटिंग, एडिटिंग करताना किती कष्ट असतं हे मी जाणतो म्हणूनच मी कधी फारसं निगेटिव्ह लिहितही नाही. पण इथे विषय शिवछत्रपतींचा असल्याने त्यांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यात आपल्या सोयीने डायलॉग घुसवणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच विरोध झाला पाहिजे म्हणून एक शिवभक्त या नात्याने माझा हा लेखप्रपंच.

आता लगेच माझा हा लेख वाचून खरंच असं झालंय का हे बघण्यासाठी थेटरात जाऊन हा चित्रपट पाहू नका. मग यावर तुम्ही म्हणाल "आम्हाला सांगताय मग तुम्ही का पाहिला ?" तर  मीही पाहणार नव्हतोच पण आमच्या काही मित्रमंडळींनी यात भूमिका साकारल्याने त्यांच्या खातर मी हा सिनेमा पाहायला गेलो पण पाहून आल्यावर माझ्या मेंदूवर शिवरायांच्या विचारांचा पगडा असल्याने माझ्यातल्या लेखकाला जणू त्यांनीच आदेश दिला आणि हे समदं हितं टायपिलं गेलं. फिरू द्या आता हे आपल्या स्वराज्यात.

विशाल गरड
२ नोव्हेंबर २०२२, पांगरी

Saturday, October 22, 2022

टिकल्यांची डबी

बाजारात कितीबी नव्या फटाकड्या येऊ द्या पण या डब्बीला कुणीच रिप्लेस नाही करू शकत. ही टिकल्याची डब्बी म्हणजे फटाक्यांची पहिली व्याख्या आहे. फटाके उडवायची पहिली पायरी याच डब्बीपासून सुरुवात होते. बंदुकीचे खाऽऽट्, खाऽऽट् ट्रिगर दाबून फाऽऽट् , फाऽऽट् टिकल्याची माळ उडवल्यावर त्या बंदुकीतून निघणाऱ्या धुराचा वास थेट बालपणात घेऊन जातो. आज साऊला फटाके घेण्यासाठी दुकानात गेलो आणि टिकल्याचा बुरुज हातात घेताच माझं मन द्रुतगती वेगानं  लहानपणात गेलं. त्यावेळी ही डब्बी आपल्याला आजकालच्या मिठाईच्या सुबक बॉक्स पेक्षा भारी वाटायची. त्यात जर अशा डब्ब्यांचा बुरुज असला मग तर बातच और असायची. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. आता लेकरांच्या आनंदातच आपलं बालपण शोधायचं. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

विशाल गरड
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२२

कृतार्थ जाहलो

काल रात्री पावणे दोनच्या सुमारास माझा फोन वाजला. मी नुकताच झोपलो होतो. फोन उचलल्यावर समोरून आवाज आला. "सर, प्रसाद मोहिते बोलतोय, आत्ताच तुमचा बुचाड पाहिला. खरं सांगू सर मला माझा बाप आठवला." हे सांगता सांगताच त्याला हुंदका आला आणि तो हमसून हमसून रडू लागला. त्याचे दुःख मी समजू शकत असल्याने मीही त्याला मोकळे होऊ दिले. थोडा वेळाने शांत झाल्यानंतर त्याने बुचाडबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. असा एक नाही तर कालपासून शेकडो कॉल आलेत प्रतिक्रिया देण्यासाठी, मेसेजेसची तर गणतीच नाही. मी काय तयार केलंय माझी मलाच कळेनासे झालंय. मी शेतकऱ्यांचे दुःख मांडलंय इथपर्यंत ठीक पण कालपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ऐकून अक्षरशः माझंच मन हेलावून गेलंय. शेतकऱ्यांचे भयाण वास्तव मांडण्यात बुचाड यशस्वी झाल्याची ही पावती आहे.

- विशाल गरड
निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता (बुचाड)
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२२


Friday, October 21, 2022

पदार्पण

प्रत्येकाच्या आयुष्यात काही दिवस अतिमहत्वाचे येतात. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील कलागुणांमुळे नावाआधी अनेक बिरुदं लागत असतात; माझ्याही लागली. आजवर मी वक्ता म्हणून, लेखक म्हणून, कवी म्हणून, चित्रकार म्हणून, कॅलिग्राफर म्हणून तुमच्या समोर आलो पण आज मात्र बुचाडच्या निमित्ताने एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुमच्या समोर येत आहे. माझ्याकडे चित्रपट निर्मितीचे ना कोणते तांत्रिक शिक्षण होते, ना कोणता अनुभव पाठीशी होता, ना कसली अद्ययावत यंत्र सामग्री उशाशी होती. हो पण जेव्हा ही गोष्ट मला सुचली तेव्हा ती दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र माझ्याकडे होती. त्याच इच्छाशक्तीने हे सगळं घडवून आणलंय. बुचाड बद्दल लिहिण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे. पण आज फक्त एवढंच म्हणतो की माझा पहिला प्रयत्न म्हणून ही कलाकृती नक्की पाहा आणि जर भिडलंच तुमच्या काळजाला तर तुम्हीही नक्की व्यक्त व्हा. शेतकऱ्यांची गोष्ट सगळ्या जगाला ओरडून सांगण्यास मी सज्ज झालोय. आज रात्री ठीक ९:०० वाजता माझ्या यू ट्यूब चॅनेलवर बुचाडचा प्रीमिअर संपन्न होत आहे. तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांना त्याचे जाहीर निमंत्रण. नक्की या आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतोय.


Saturday, October 15, 2022

'बुचाड'च्या प्रीमिअरची घोषणा

मी वक्ता आहे, लेखक आहे, कवी आहे, चित्रकार आहे, कॅलिग्राफर आहे अजूनही बरंच काय काय आहे पण ऑक्टोबर २०२० साली अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे बुचाड वाहून जाताना पाहिले अन माझ्यातला दिग्दर्शक खडबडून जागा झाला. शेतकऱ्यांचे दुःख दृकश्राव्य माध्यमातून अधोरेखित   करून मांडण्याची कल्पना मला झोपू देईना. अखेर नोव्हेंबर २०२० मध्ये सिनेमॅटोग्राफर सचिन नलावडे, एडिटर अमोल लोहार आणि अभिनेत्री वैष्णवी जानराव या त्रिमूर्तीच्या साथीने माझ्या डोक्यातलं बुचाड यशस्वीपणे चित्रित केलं गेलं. पुढे अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये बुचाडने पुरस्कार मिळवले परंतु तेलंगणा राज्यात झालेल्या फिल्म स्क्रिनिंगवेळी जेव्हा कन्नड भाषिक श्रोत्यांच्याही डोळ्यात अश्रू आले तेव्हा मला माझ्या कलाकृतीचा अभिमान वाटला. तिथेच मग माझ्यात दडलेल्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याची पाठ थोपटली गेली. चित्रपट क्षेत्रात नवखा असल्याने वेळ, परिस्थितीनुसार निर्मितीत काही तांत्रिक उणिवा राहून गेल्या तरीही त्याचा परिणाम बुचाडवर झाला नाही हे विशेष.

बरं चला मुद्द्यावर येतो नाहीतर तुम्ही म्हणाल हे सगळं माहीत आहे कशाला रिपीट सांगायलास; पण जे पहिल्यांदाच वाचत आहेत त्यांना थोडीशी पार्श्वभूमी माहीत असावी म्हणून हा वरचा पॅरेग्राफ लिहिला. तर सध्या सगळीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. आपल्या शेतकरी राजाचा तोंडचा घास जलसमाधी घेत आहे. 'बुचाड' या लघुचित्रपटातून एकाच वेळी निसर्ग, सरकार, सावकार, व्यापारी या घटकांच्या तडाख्याने कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून माझ्या सगळ्या कलाकृती आजपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो, त्याला तुम्ही दिलेली दाद आणि प्रतिसाद माझ्यातल्या कलाकाराला उजळवत आली म्हणूनच आज बुचाडचा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मी हा निर्णय घेतलाय की बुचाड हा लघुचित्रपट कोणत्याही ओ.टी.टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध न करता ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अगदी सहज पाहता यावी यासाठी थेट माझ्या यू ट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणार आहे.

बुचाडने गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले पण आता 'प्रेक्षकांचे उदंड प्रेम आणि प्रतिसाद' हा मानाचा पुरस्कार मिळवण्यासाठी ती थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आमच्या बुचाड या लघुचित्रपटाचा प्रीमिअर येत्या दिवाळीत शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी, रात्री ठीक ९:०० वाजता माझ्या यू ट्यूब चॅनेलवर तुमच्या प्रत्येकाच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने आपल्या सर्वांना जाहीर आवतान. पुढेही मी त्याची वेळोवेळी आठवण करून देईनच पण दिवाळी शुभेच्छांच्या त्सुनामीत ही पोस्ट लांब खाली रुतून जाईल तेव्हा तारीख आणि वेळ लिहून ठेवा. बाकी मोबाईल आणि त्यातलं यु ट्यूब तर तुमच्या सोबत असेलच. आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांनी पाहणे आणि पाहून त्याचे कौतुक होणे हा ही त्या कलाकृतीला मिळाळलेला सर्वोच्च पुरस्कारंच असतो, आता मी त्याच पुरस्काराच्या प्रतिक्षेत.

विशाल गरड
दिग्दर्शक तथा अभिनेता (बुचाड)

Saturday, September 3, 2022

सोनवणे सर अभिष्टचिंतन

एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोराने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे, एका किराणा दुकानदाराच्या पोराने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो एम्स वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका विधवा माऊलीच्या पोरीने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या ती मुंबईच्या जे.जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका रिक्षाचालकाच्या पोरीने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या ती धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका गवंड्याच्या पोराने इंजिनिअर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो पुण्याच्या सी.ई.ओ.पी मध्ये शिकत आहे. एका शेतमजूराच्या पोराने इंजिनिअर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो व्ही.जे.टी.आय मध्ये शिकत आहे. अशा शेकडो यशोगाथा आहेत आमच्या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या.

टिव्हीशनला लाखभर रुपये खर्च करून शहरात खाणे पिणे आणि राहण्याला नाही म्हणलं तरी दिड दोन लाख रुपये लागतातंच त्यातही मग कपडे लत्ता, वह्या पुस्तके यासाठीचा वीस पंचवीस हजार खर्च आलाच. दोन घासाची जेमतेम सोय करणाऱ्या कुटुंबाला वर्षाकाठी अडीच पावणे तीन लाख रुपायांचा खर्च न परवडणारा असतो. अशात मग संजीव सोनवणे नावाचा एक माणूस उभा राहतो आणि बालाघाटच्या डोंगर कुशीत डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय बांधतो जिथे याच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना तो शहरात वर्षभरात होणाऱ्या खर्चात इथं दोन वर्षे निवासी सांभाळून शिकवतो आणि नीट जेईई परीक्षांना जिंकण्यासाठीचं सामर्थ्य त्यांच्यात भरतो.

डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नीट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची एन.सी.आर.टी अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारी हल्ली किती शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात करून घेतली जाते ? मग गरिबांना खाजगी क्लासेस शिवाय दुसरा कोणता पर्याय उरतो ? तेव्हा अशा परिस्थितीत आजच्या शिक्षण व्यवस्थेत सोनवणे सरांचा पर्याय 'दिपस्तंभ' म्हणून उठून दिसतो. लेकरू शिक्षण घेताना वाईट वळणाला लागू नये, खराब संगतीत हरवू नये, मोबाईल आणि टिव्हीच्या व्यसनात वाहू नये म्हणून विद्यार्थ्यांना मोबाईल आणि बाईक वापरास बंदी असणारा, नीट, सिईटी, जेईई परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारा, सर्व सोयी सुविधायुक्त कॅम्पस त्यांनी शहराच्या गर्दीतून दूर उभारलाय.

सध्याची वाहवत चाललेली युवा पिढी पाहता. डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयासारख्या निवासी संकुलाची समाजाला गरज आहे आणि म्हणूनच समाजाची ही गरज पूर्ण करण्यासाठी सोनवणे सरांसारख्या संस्था चालकांची गरज आहे. सरांनी पाहिलेल्या भव्य स्वप्नांचा एक खांब बनता आल्याचे मला नेहमीच समाधान वाटत आलंय. सोबतच पिढी घडवण्याच्या या कार्यात मी सरांसोबत मागील एक दशकापासून खंबीरपणे उभा असल्याचा अभिमानही उत्तरोत्तर वाढतच आहे. आज सोनवणे सरांचा वाढदिवस यानिमित्ताने सरांना दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या संस्थेतुन हजारो विद्यार्थी घडून यशाच्या शिखरावर विराजमान होवोत एवढेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझे अभिष्टचिंतन. 

प्रा.विशाल गरड
०३ सप्टेंबर २०२२, पांगरी

Monday, August 22, 2022

भातुकलीच्या खेळामधली माझी राजकुमारी

मोठ्यांचं अनुकरण करणं हेच लहान लेकरांचं खेळणं असतं. सध्या माझ्या साऊचे भातुकलीचे खेळ सुरू आहेत. आज नेहमीप्रमाणे मी कॉलेजवरून घरी आल्यावर विराने अद्रक इलायची वाला स्पेशल चहा करून दिला. मी बेडवर बसून चहाचा फुर्रर्रका मारत मारत कुतूहलाने साऊचा खेळ पाहत होतो. विराने मला चहा आणून दिलेला पाहून साऊची इरस वाढली आणि मग तिनेही तिच्या छोट्याशा कपात थोडे पाणी ओतून माझ्यासमोर कप धरला आणि मला म्हणाली "बाबा, आता तुम्ही माझा पण चहा प्या, मी गलम गलम केलाय आत्ताच" यावर जर मी तिला नाही किंवा नंतर वगैरे म्हणालो असतो तर तोच कप केव्हा तोंडावर धडकला असता याचा नेम नव्हता म्हणूनच प्रसंगावधान ओळखून मी हातातला कप बाजूला ठेवून साऊच्या हातातला कप घेऊन ते इवलेसे पाणी पिऊन टाकले.

मी झटकन पाणी पिऊन टाकल्याचे पाहून साऊ तातडीने बोलली "ओ बाबा, चहा फुंकून फुंकून प्या की, पोलेल ना" तिचे ते काळजीचे स्वर ऐकून मी तिला कुशीत घेऊन तिचे कोडंकौतुक करू लागलो; इतक्यात बाप लेकीच्या प्रेमात हस्तक्षेप करत विरा बेडरूममध्ये आली. तिला पाहताच साऊने दुसरे फर्मान सोडले "आई, मला तुझ्यासालखी साडी नेस ना" हा साऊचा हट्ट विरानेही तितक्याच तत्परतेने तिची ओढणी तिला साडीसारखी गुंडाळून पूर्ण केला. लेकरू काय गोड दिसायलंय म्हणून मी फोटो काढण्यासाठी मोबाईल तिच्यासमोर धरून क्लीक करणार इतक्यात ती विरा कडे पाहून खुदकन हसली आणि हा हसण्यात लाजणं मिक्स झालेला सुंदर फोटो कैद झाला.

फोटो मागचा एवढा इतिहास लिहिण्याचे काही खास कारण नव्हते पण लेखक असल्याचा एवढा इंसेंटिव्ह तरी घ्यावा लागेल की म्हणून फोटोवर नुसतं "माझं पिल्लू" वगैरे लिहून पोस्ट करण्यापेक्षा यानिमित्ताने फोटोसोबत जर सगळ्या बापांनी त्यांच्या त्यांच्या लेकरांचा अनुभवलेला भातुकलीचा खेळ शब्दातून मांडून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला तर लिहिण्याचे सार्थक होईल म्हणून हा लेख प्रपंच. बाकी ते आनंद, सुख, समाधान, स्वर्ग जे काही असेल ते सगळं आपलं लेकरू जेव्हा ताजं ताजं बोलायला शिकतं तेव्हा त्याच्याशी खेळण्यातंच आहे. प्रत्येक आईबाप ही खास गोष्ट अनुभवतातंच. तुम्ही कितीही बिझी असा पण कामाचा ताण तणाव थकवा दूर करणाऱ्या या असल्या जालीम रामबाण औषधाची मात्रा घ्यायलाच हवी. 

विशाल गरड
२२ ऑगस्ट २०२२, पांगरी

Friday, August 19, 2022

लग्नाचा चौथा वाढदिवस

आज आमच्या संसाराला चार वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मी काहितरी लिहीत आलोय. त्या त्या काळात आलेले समकालीन अनुभव लिखाणात उतरवत आलोय. पहिल्या वर्षी बाल्यावस्थेत असणारा माझा आणि विराचा संसार आता साऊ जन्माला आल्यापासून तारुण्याकडे वाटचाल करत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या संसाररूपी झाडाला लागलेल्या कादंबरी नावाच्या फळाने आम्हाला तृप्त केलंय. तिच्यासोबतचा व्यतीत होणारा प्रत्येक क्षण म्हणजे जणू भविष्यात आठवण काढून आनंद मिळवण्याची मोठी एफ.डी आहे.

साऊ जन्माला यायच्या आधी मी नवरा बायकोच्या प्रेमाबद्दल लिहायचो पण आता संसाराला चार वर्षे पूर्ण झाल्याने त्याचे नवनवीन पदर उलगडायला सुरुवात झाली आहे. लग्नानंतरचे पहिले वर्ष एकमेकांना समजून घेण्यात जातं, दुसरं वर्ष एकमेकांच्या आवडी निवडी, सवयी बऱ्यापैकी जाणून घेण्यात जातं, तिसऱ्या वर्षी न आवडणाऱ्या सवयींना बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि चौथ्या वर्षी मग जे आहे, जसे आहे तसेच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होते. मुळात दोन जीव हे भिन्न शरीराचे, मनाचे, विचारांचे परंतु संसार नावाच्या प्रक्रियेत ते घट्ट बांधले जातात. या प्रक्रियेत तयार होणारे प्रेम, राग, मत्सर, जिव्हाळा, संशय, लोभ, आदर, भीती, अपेक्षा, इभ्रत या सगळ्याच गोष्टीनी संसार उभा राहतो. या गोष्टी जशा संसार जोडायला कारणीभूत ठरतात तशाच त्या तोडायलाही कारणीभूत ठरतात. यातल्या प्रत्येक गोष्टीचे एक प्रमाण असावे लागते जर ते विसंगत झाले तर मग सांसारतले सार निघून जायला वेळ लागत नाही.

मुळात संसारातल्या नवरा बायको या व्यक्ती एक दोन वर्षात समजून घेण्याचा विषय नसून त्या आयुष्यभर शिकत राहण्याचा विषय असतो. ते दोघे एकमेकांसोबत कसे वागतात यासोबतच ती सून म्हणून आपल्या आई वडिलांशी कशी वागते आणि आपण जावई म्हणून तिच्या आई वडिलांशी कसे वागतो यावर संसाराची वीण अवलंबून असते. छोटे मोठे वाद झाले तरी दोघांनी सामोपचाराने घेतले की संसाराची वीण अधिक घट्ट विणली जाते. कधी कधी ती उसवतेही पण अशावेळी आपण प्रेमाच्या सुईत शांततेचा धागा ओवून ते शिवत राहायचं. जर असे न करता जर उगाच ताणत राहिलात तर फाटण्याची भीती वाढते. एकूणच काय तर संसार हे मुरायला घातलेले लोणचे असते ते जेवढे मुरेल तेवढेच रुचकर होईल.

संसाराच्या चार वर्षांनंतर मला माझी विरा जणू संसाररुपी रणांगणातली वीरांगना भासते. ती जेव्हा साऊला शिकवत असते तेव्हा मला तिच्यात सावित्रीमाई दिसते, ती दान धर्म करताना तिच्यात अहिल्यामाई दिसते, साऊवर संस्कार करताना तिच्यात जिजामाई दिसते, मी बाहेरगावी गेलो तरी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिच्यात रमाई दिसते आणि कधी रौद्र रूप धारण केले की लेकराला पाठीवर घेऊन लढणारी झाशीची राणीही दिसते. आपल्या समाजाला प्रचंड उंचावर घेऊन गेलेल्या या महान स्त्रियांचे विचार जर घरातल्या हरएक स्त्रीने संसारात झिरपवले तर प्रत्येक संसार सुखाचा आणि लेकरांची भविष्य घडवणारा ठरेल यात शंका नाही. मी आज समाजात बहू आघाड्यांवर काम करू शकतो यामागे माझे एकत्रित कुटुंब आणि संसाराची आघाडी समर्थपणे सांभाळणारी विरा आहे. 

विशाल गरड
१९ ऑगस्ट २०२२, पांगरी

Saturday, August 13, 2022

कष्टमेव जयते

ही आहे आमची शारदामाऊ चव्हाण, पत्र्याच्या घरातून आज टुमदार बंगल्यात प्रवेश करत आहे. आयुष्यभर मोलमजुरी करून शारदा माऊ आणि दिऊ बापूंनी संसाराचा गाडा हाकत हाकत पोरांना वाढवलं. मी लहान असल्यापासून शारदा माऊला आमच्या शेतात काम करताना पाहत आलोय. मोठा मुलगा अक्षय अवघ्या वर्षभराचा असताना सुद्धा त्याला झाडाखाली झोपवून ती कामावर यायची, मी अक्षयला खेळवत बसायचो. आज अक्षय इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून नोकरी करतोय. शारदा माऊचा दुसरा मुलगा ऋषिकेश उर्फ पिल्या जास्त शिकला नाही परंतु पडेल ते काम करून रोजगार मिळवण्याच्या वृत्तीने तो बेरोजगारही राहिला नाही. शारदा माऊची दोन्ही पोरं आई बापासारखीच होतकरू आणि मेहनती निघाली म्हणूनच तिच्या घरावरचे पत्रे निघून आज स्लॅब पडलाय. या चौघांनी त्यांच्या जीवनात प्रचंड मेहनत घेऊन पै पै साचवली आहे म्हणूनच आज कसलही गृहकर्ज वगैरे न उचलता फक्त कष्टाच्या जोरावर त्यांनी बंगला बांधलाय. 

त्याच चौकात उभा असलेला दुसरा बंगला आहे दत्ता भराडे आणि मोहन भराडे यांचा तिथेही सागर, किशोर आणि शंभू सारखी मेहनती पोरं हिंमतीने उभारली आणि छोट्याशा घराचे बंगल्यात रूपांतर केलं. आमच्या घरामागे शेळक्याच्या कोपऱ्यावर उभा असलेला बंगला सुध्दा दिपक शेळकेने मोठ्या कष्टाने उभारलाय. या सर्वांचाच मला अभिमान वाटतोय. स्वतःचं पक्कं घर उभारल्याचा जेवढा आनंद त्यांना झालाय तेवढाच आम्हालाही झालाय. ते घर जेवढं त्यांचं आहे तेवढंच ते आमचंही वाटतंय यातच काय ती आमच्यातली आपुलकी आली. परिस्थिती बदलते फक्त ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय करून दाखवलं याचेच लोकांना जास्त अप्रूप असतं. शारदा माऊने बांधलेलं घर त्याचीच निशाणी आहे. खूप खूप शुभेच्छा.

विशाल गरड
१३ ऑगस्ट २०२२, पांगरी

Monday, July 11, 2022

रॉकेटरी

'नंबी नारायणनन आणि त्यांची पत्नी मीना यांना जेव्हा रिक्षातून बाहेर ढकलून दिले जाते तेव्हा राष्ट्रध्वजाखाली पडत्या पावसात रडणारी ती माऊली आणि हतबल होऊन लुंगी सावरत मदतीची याचना करणारे नंबी नारायणनन'  हा सिन पाहताना मनातला हुंदका आणि डोळ्यातले अश्रू रोखणे केवळ अशक्य होते. जेल मधून सुटून आल्यावर जेव्हा नंबी नारायणनन त्यांच्या घरात मीनाला शोधत असतात तेव्हा प्रत्येकाचा श्वास आपसूकच रोखला जातो आणि शेवटी नंबी सर राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्विकारताना टाळ्या बजावण्यासाठी हात आपोआपच उचलले जातात. ही ताकद आहे आर.माधवन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शनासह मुख्य भूमिका साकारलेल्या "रॉकेटरी - द नंबी इफेक्ट" या चित्रपटाची. भारताच्या युवा पिढीला अशा वास्तव चित्रपटांची नितांत गरज आहे. शिक्षण, कौशल्य, परिश्रम, यश, धोका, अवहेलना, सहनशीलता आणि अतिउच्च देशप्रेम याचे जिवंत दर्शन म्हणजे 'रॉकेटरी' आहे. आर.माधवन आणि नंबी नारायणनन यांना सलाम.

विशाल गरड
११ जुलै २०२२

Friday, July 8, 2022

लेकीच्या लेखणीची मुहूर्तमेढ

आमची कादंबरी (साऊ) या जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र चालवायला शिकल्याचा आनंदोत्सव साजरा करतोय. वर वर साधी वाटणारी ही गोष्ट वाटते तेवढी साधी मुळीच नाही. हाताचा पंजा ते वहीचे पान व्हाया घराच्या भिंती आणि गादीचे बेडशीट असा तिचा लिहिण्याचा प्रवास झालाय. जेवणाची नाटकं, मोबाईलचे फॅड, खेळण्याचे वेड यातून ही दोन वर्षाचं लेकरू असं रोज अर्धा तास वहिवर उभ्या आडव्या रेषा मारत बसवणं म्हणजे मोठं दिव्यच पण रोज सराव असावा म्हणून आम्हीही तिचा कधी पिच्छा सोडला नाही. आज जेव्हा ती अशी हातात पेन धरते तेव्हा तिच्याकडं कौतुकानं नुसतं एकटक पाहत बसावसं वाटतं. कायबी म्हणा बरं का ! पोरगी सध्या वाहिवर फक्त 'एक' अंक काढायला शिकलीये; पण तिचा तो कागदावर पेनने गिरवलेला 'एक' मला जणू पृथ्वीला लटकलेल्या काठी एवढा मोठा वाटायलाय. 

महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात ज्यावेळी पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा त्या शाळेत आलेली पहिली मुलगी मुक्ताने जेव्हा वहिवर 'एक' लिहिले असावे तेव्हा त्यांनाही केवढा आनंद झाला असेल ना. आज माझ्या साऊने काढलेल्या एकच्या मुळाशी त्या एका स्त्रीचे आभाळाएवढे योगदान आहे म्हणूनच मला हा लेकीच्या कौतुकाचा आनंद उपभोगत असताना सावित्रीबाईंचे स्मरण करणे क्रमप्राप्त वाटलं. बाकी जगावर प्रभाव पाडायचा असेल तर या लेखणीच्या शस्त्र सरावात आपली लेकरं पारंगत व्हायलाच हवी. पुढे त्यांची समज जस जशी वाढेल तस तसा त्यांना पुस्तकाचा रतीब चालू करावा. एकदा का लेखणीचं आणि मेंदूचं नातं जुळलं की जगण्याच्या स्पर्धेत आपली लेकरं कधीच गाभूळी राहत नाहीत.

विशाल गरड
८ जुलै २०२२, पांगरी

Monday, June 27, 2022

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील

बोलताना भाषेचा बाज किती महत्वाचा आसतोय हे शहाजीबापूंच्या ऑडिओ रेकॉर्डिंग वरून समजलं आसलंच. मुळात झाडी, डोंगर, हॉटेल हे शब्द काय कुणाला नवं न्हाईत पण ते ज्या टोन मध्ये बोलले गेले त्येज्यामुळं त्ये व्हायरल झाल्यात. लोकासनी काय वाटल म्हणून आईनं शिकीवलेल्या आपल्या गावाकडच्या मातृभाषेची आज्याबत लाज न बाळगता बोलणारी माणसं आपल्याला आवडत्यात. म्या सुदा आजपस्तोर हजारो व्याख्यानं दिली, सहा पुस्तकं लिव्हली पण बोलताना आन् लिव्हताना माझ्या गावरान मराठीचा बाज न्हाई सोडला. आरं लका त्ये आपुन न्हाय मग कुणी जपायचं ?

आमदार शहाजी बापूंची समदिच भाषणं आशी इरसाल रांगड्या भाषेतली आस्त्यात. आमच्या जिल्ह्यातलं आमदार आसल्यामुळं आम्हाला ते आदीपसुनच माहीत हाय पण त्या गुवाहाटीतल्या एका क्लिपमुळं आमचं सांगोल्याचं बापू महाराष्ट्रातल्या घरा घरात पोहोचलं की राव. बापूंनी आजून दोन टर्म जरी हाणल्या असत्या तरी अख्या महाराष्ट्रानं त्येंला वळकलं नसतं कारण आजबी कितीतरी मंत्री सुद्धा आपल्याला ठाऊक नसत्यात पण 'कला' ही गोष्टच आशी हाय की जी तुम्हाला लांबपस्तोर पोहचिवती. महाराष्ट्रात आजूनबी अशे लै आमदार, खासदार, मंत्री हायतं जे त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीमुळं प्रसिद्ध हैत. पुढल्या खेपंला बापू आमदार आस्त्याल का नस्त्याल हे सांगोलाकरंच ठरवतील पण झाडी, डोंगार आन् हाटील मातर बापूंसोबत कायम राहतील हे नक्की.

बापू क्लिपमदी जे बोललं त्येजं ना समर्थन, ना निषेध पण ट्रेंड सोबत वाहता वाहता ते ज्या स्टाईलमधी बोललं त्येजं मातर कौतुक व्हावं म्हणून एव्हडा लेखप्रपंच केलाय. शेवटी कुणाचंबी बोलणं म्हंजी शब्दांची जुळवा जुळव आसती पण त्ये शब्द उच्चारण्याचा बाज ज्यजा त्येजा येगळा असतोय त्यो तेव्हढा जपता आला की बोलायचं आज्याबात भ्याव वाटत न्हाई. बाकी आपली भाषा आन् तिचा बाज पिढ्यान पिढ्या चालत आलाय त्येला तसंच वाहू द्या. मऱ्हाटी भाषेचा अभिमान तर समद्यांनीच बाळगावा पण त्येज्या सोबत आपापल्या भागातला भाषा बोलतानाचा बाज सुद्धा जपावा म्हंजी आयुष्य कसं एकदम ओक्केमध्ये जगता येतंय.

विशाल गरड
२७ जून २०२२

Monday, May 23, 2022

आक्रोश

आता पहिल्यासारखं फारसं लिहू वाटत नाय, आन् फक्त टि.आर.पी साठी लिहिणं माझ्या बुद्धीला पटत नाय तरीबी सध्याचं वातावरणंच झालंय इतकं गढूळ की निवळी फिरीवल्याशिवायबी दम निघत नाय म्हणून हा काव्यप्रपंच. नेते मंडळींच्या उधो उधोतून मिळालाच थोडा येळ तर हेबी नक्की वाचा दोस्तहो शेवटी बाप आणि मातीच जास्त महत्वाची ओ.

Saturday, April 16, 2022

सरडे गुरुजी

आज सरडे गुरुजींचा त्र्यांनव्वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सरडे गुरुजींनीच मला बाराखडी शिकवली आहे. इयत्ता पहिली दुसरीला ते मला शिकवायला होते. त्यांचे संस्कृत भाषेचे ज्ञान अगाध आहे. सहज जरी गप्पा मारत बसलो तरी आजची पिढी संस्कृत साहित्यापासून वंचित राहिल्याची ते खंत व्यक्त करतात. वयाची ब्यान्नव वर्ष पूर्ण होऊनही गुरुजींची नजर चांगली आहे, दात बळकट आहेत आणि गुडघे सुस्थितीत आहेत. वेदांचा आणि उपनिषधांचा दांडगा अभ्यास असल्याने ते त्यांच्या निरोगी शरीरयष्टीचे श्रेय योग आणि प्राणायामला देतात. गुरुजी याही वयात रोज तीन तास योगासने करतात हे विशेष.

आज गप्पा मारता मारता गुरुजींनी आमच्या पांगरी गावच्या नद्या, मंदिरे आणि मठांच्या इतिहासाबद्दल अनेक नवीन गोष्टी सांगीतल्या. अशा जुन्या जाणत्या माणुसरूपी पुस्तकांना वाचले की शेकडो वर्षांच्या इतिहासाची जणू अवघ्या तासाभरात उजळणीच होते. माझे आजोबा बापू सुद्धा अशाच जुन्या गोष्टी सांगून मला समृद्ध करीत होते. इतिहासाचे ज्ञान असेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाही होत राहायला हवे त्यासाठी नव्या पिढीनेही या बुजुर्ग विद्यापीठांजवळ काही वेळ घालवायला हवा. आजच्या टच स्क्रिनच्या युगात ज्यांच्या पायांना डोक्याने स्पर्श करता यावा अशी सरडे गुरुजींसारखी माणसं माझ्याजवळ असणे हे माझे भाग्य. प्रिय गुरुजी आपण शतायुषी व्हा !

विशाल गरड
१५ एप्रिल २०२२

Tuesday, April 5, 2022

साऊचा दुसरा वाढदिवस

आज साऊचा दुसरा वाढदिवस. मातृभाषेचे सॉफ्टवेअर तिच्या मेंदूत व्यवस्थित इन्स्टॉल झाल्यामुळे गप्पा मारायला घरात अजून एक हक्काचं माणूस तयार झालंय. पहिल्या वाढदिवसाला तिच्या रांगण्याचे, बसण्याचे आणि भिंतीला धरून चालण्याचे सुद्धा कौतुक वाटायचे आणि आज तिच्या दुसऱ्या वाढदिसाला तिच्या हसण्याचे, पळण्याचे, उडया मारण्याचे, बोलण्याचे कौतुक वाटतंय. आपल्याच रक्तातून तयार झालेल्या रक्तात जेव्हा आपले गुण दिसायला लागतात तेव्हा निसर्गाने बनवलेल्या या आरशाचे आश्चर्य वाटायला लागते. जगातल्या सगळ्या बापांचा थकवा, राग, दुःख कमी करण्याची क्षमता त्यांच्या मुलीत असते.

तिच्या फक्त एका नजरेत, स्मित हास्यात आणि हाकेत प्रचंड ऊर्जा असते. बाहेरून कितीही थकून आलो आणि ती पळत येऊन बिलगली की सगळा थकवा पळून जातो. राग कसलाही असू द्या, कुणावरही असुद्या फक्त तिने एकदा आपल्याकडे पाहून स्मित केले की तो शांत होतो. आपण कोणत्याही कामात कितीही व्यस्त असोत तिने 'बाबाऽऽऽ' अशी हाक मारली की नजर तिलाच शोधत धावते. लेकराला जन्म दिला की आपण बाप बनतो पण लेकरू जसं जसं मोठं होत राहतं तसच आपल्यातला बापही मोठा होत जातो म्हणूनच साऊसोबत माझ्यातल्या बापाचा आणि विरा मधल्या आईचाही आज दुसरा वाढदिवस आहे.

प्रिय साऊ तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्यातल्या आई बाबाला तू तुझ्या जगण्यातून, वागण्यातून असंच समृद्ध करीत राहा. 

विशाल गरड
५ एप्रिल २०२२

Monday, March 28, 2022

सायकल मार्ट

उन्हाळ्याचं दिवस व्हतं. आम्ही दवाखान्यातल्या वडाखाली खेळत व्हताव. एवढ्यात धनगरवाडीचं सुरेश मामा आमच्या घराकडं जाताना दिसलं म्हणून म्या लगीच घराकडं धुम ठुकली. चहा पाणी करून मामा घरा बाहीर पडताच त्येज्या म्हागं मीबी बाहीर आलो, लंय वाडुळ म्हागं फिरल्यावर गावाकडं जाताना सुरेश मामानं माज्या हातावर एक रुपायाचा मोठ्ठा ठोकळा टिकीवला. रुपाया हातात पडताच म्या पळतच अंबिका सायकल मार्टकडं निघालो. तिकडं जाता जाताच वडाखाली खेळत बसल्याल्या राहुल्या, सच्या, ईनुद्या, म्हाद्या, शऱ्या ह्येन्ला वरडून सांगितलं की "म्या बारकी सायकल भाड्यानं आणायला चाललोय" तीबी मग वाट बघत बसली.

तिकडं सायकलच्या दुकानात बाळासाहेब हातात रजिस्टर घिऊन बसलं व्हतं. तिथं जाऊस्तोर कुणी दुसऱ्यानं सायकल न्हिऊनी म्हणून पळतच दुकान गाठलं. लांबूनच बारकी सायकल बघून मला जाम आनंद झाला. ल्हाकत ल्हाकत पहिलं सायकल हातात घितली. बाळासाहेबांनी लगीच रजिस्टर उघडलं आन् घड्याळाकडं बघत रजिस्टरमदी विशाल गरड १२:१० लिहिलं. म्या बी घड्याळाकडं नजर टाकली आन् लगीच सायकलचा पायेंडेल मारलान दुसऱ्याच मिनटात वडाखाली पोचलो. तिथं गेल्या गेल्या पोरं सायकलची चक्कर मागायली पण म्या तेन्ला म्हणलं "थांबाय लका, मला तरी खिळू दया आधी" पोरांना तिथंच सुडून म्या तालमीपसून थेट दऱ्याबुवा पर्यंत जाऊन आलो. तिकडून आलो की दिवीच्या चौकातून एक चक्कर आणली मग गोडसे गल्लीतुन ईशीत आन् ईशीतुन पुन्हा वडाखाली आलो. आल्यावर राहुल्या मला म्हणला "ईसल्या, चल निळोबाला जाऊन यिऊ" पण लंय येळ लागलं म्हणून मी त्येला नकु म्हणलो.

दवाखान्यातल्या वडाखालीच राहुल्या, ईनुद्या आन् सच्याला सायकलची एक एक चक्कर दिली. लंय येळ झाल्यासारखं वाटलं त्येज्यामुळं पुन्हा अंबिका सायकल मार्ट मधल्या घड्याळात येळ बघायला गेलो. तास संपून जाईल हेज्या भेनं भेनं दून तीन चक्रा तर दुकानाकडंच झाल्या. आखीर बाळासाहेब म्हणलं "आजून पाच मिनिटं राहिल्यात, लांब जाऊ नकु न्हायतर दोन तासाचं पैशे द्यावं लागत्याल" हे ऐकून म्या शेवटची चक्कर मारायची म्हणून पुन्हा तालमीपशी जाऊन आलो. सायकल जमा करताना बाळासाहेबानं दुनी टायरची हवा हातानं दाबून चेक किली. म्या खिशातला ईकुलता येक रूपाया बाळासाहेबाच्या हातावर टिकीवला आन् त्येंनीबी पटमन रजिस्टरमदी माज्या नावापुढं १:१० लिहून जमेचा शेरा मारला. 

एक रूपायात एक तास सायकल खिळून माझं मन भरलं नव्हतं. आता पुन्हा कवातरी दोन रुपये साचलं की दोन तास सायकल खेळायची आसं ठरवून झपझप पावलं टाकून म्या घर गाठलं. दसऱ्याला आणि पाडव्याला अंबिका सायकल मार्टमदी येणाऱ्या नवीन सायकली बघून लंय भारी वाटायचं. पुढं निळूभाऊनं श्री गणेश सायकल मार्ट टाकलं आन् त्येज्या दुकानातल्या बारक्या सायकली फुकट चक्कर मारायला मिळायल्या. भऊच्या बँकीजवळच्या टपरीवर तास दोन तास बसलं की थर्माकॉलच्या डबड्यातली एक स्नेहल पेप्सी आन् सायकलची चक्कर हमखास मिळायची. गावात कुणी नवीन सायकल मार्टचं दुकान टाकलं की आमाला लंय अप्रूप वाटायचं. 

माझ्या बारक्यापणी रूपाया दोन रूपायात आभाळाएवढा आनंद दिल्याली आमच्या पांगरीतली अंबिका सायकल मार्ट, श्री गणेश सायकल मार्ट, दिपक सायकल मार्ट, जय भवानी सायकल मार्ट, वसीम सायकल मार्ट, मुन्ना सायकल मार्ट ही समदी दुकानं आज फकस्त आठवण म्हणून राहिल्याती. आज मी माझ्या दारात उभा आसलेल्या फोर्डमदी बसून शंभर किलोमीटर जरी फिरून आलो तरी एक रूपाया तासानं सायकल घिऊन मारलेल्या चक्करांची सर त्याला येणार न्हाई. हल्ली समद्या लेकरांच्या वाढदिसालाच त्येंचे मायबाप भारी भारी सायकली आणत्यात त्येज्यामुळं म्या वरी ल्हिवलेला ह्यो अनुभव आता तेंच्या वाट्याला कधीच येणार न्हाय पण त्येंला आपल्या येळच्या आनंदाची कथाबी ठाऊक आसावी म्हणून ही ईस पंचवीस वर्षाम्हागटल्या डोसक्यातलं शबुद मोबाईलवर टायपिलं. लेख आवडला तर द्या लेकरासनी वाचायला. गावरान भाषेत ल्हिवल्यामुळं तेंन्ला थोडा आवघड जाईन वाचायला पण काय करणार आईची भाषाबी जित्ती ठिवावीच लागल की म्हणुनशान ह्यो आट्टास.

विशाल गरड
२८ मार्च २०२२

Tuesday, March 22, 2022

बरमगावचा बालाजी

हा आहे उस्मानाबाद तालुक्यातील बरमगाव बुद्रुक या गावचा युवक बालाजी ढवळे. पर्वा त्याच्या गावच्या इतिहासातले पहिलेच व्याख्यान मी पार पाडले. गोष्ट सहा सात वर्षा पूर्वीची आहे. बालाजी हा शिक्षणनिमित्त सोलापूर जिल्हा वसतिगृहात राहत होता. तिथेच रहाणारा बालाजीचा मित्र व आत्ताच्या प्रार्थना बालग्रामचा संस्थापक युवा समाजसेवक प्रसाद मोहिते याने वसतिगृहात माझे व्याख्यान आयोजित केले होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सभागृह तुडूंब भरून गेले होते त्याच गर्दीत बसून माझे व्याख्यान ऐकलेल्या बालाजीने तेव्हाच  ठरवले होते की सरांना आपल्या गावाकडे व्याख्यानासाठी न्यायचे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेला, तिथेच संसार थाटला पण तरीही गावाची ओढ होतीच.

काही दिवसांपूर्वी इकडे गावात जेव्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक झाली तेव्हा त्याने व्याख्यानासाठी माझ्या नावाची शिफारस केली. याआधी गावात कधीच व्याख्यानाचा कार्यक्रम झाला नसल्याने गावकऱ्यांनाही व्याख्यानाचा फारसा अनुभव नव्हता. वक्त्याची तारीख मिळेल का ? कार्यक्रमाला लोक जमतील का ? वक्ता चांगला बोलेल का ? नियोजन होईल का ? हे सारे प्रश्न त्यांना पडले पण बालाजी म्हणाला माझ्या गॅरंटी वर तुम्ही सरांना बोलवा. आपल्या गावाला ज्या विचारांची खरी गरज आहे ते विचार सर खूप प्रभावी मांडतील यावर माझा विश्वास आहे. बालाजीच्या विचारांना समितीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आणि अवघ्या चार पाच दिवसात कार्यक्रमाचे देखणे नियोजन केले.

दिनांक २० मार्च रोजी, संध्याकाळी बरमगावात माझे व्याख्यान पार पडले. ग्रामस्थांना शिवचरित्रातले आजपर्यंत न ऐकलेले पैलू उलगडून सांगितले एवढेच नाही तर गावच्या आणि गावातील नव्या पिढीच्या भविष्यासाठी मौलिक विचार मांडले. व्याखान संपल्यावर सुमारे अर्धा तास माझ्या सभोवतालची गर्दी हटली नाही. प्रत्येकजण हातात हात घेऊन व्याख्यानाबद्दल प्रतिक्रिया देत होता. सेल्फीसाठी पोरांची झुंबड उडाली होती. लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बालाजीच्या चेहऱ्यावर उमटलेले विजयी हास्य माझ्यासाठीही जिंकल्याची निशाणी होती.

हे सगळं मी का सांगतोय ? तर बालाजीने सुमारे सात वर्ष मला त्याच्या डोक्यात ठेवले, माझा विचार पोसला आणि संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आज गावातील प्रत्येक नागरिक बालाजीजवळ व्याख्यानाचे कौतुक करतोय. गावाला  चांगले विचार मिळाल्याने गावकरी समाधानी आहेत याचे सारे श्रेय बालाजीला जाते. जोवर अशा एका विचारशील युवकांच्या मेंदूत आमचं वास्तव्य आहे तोवर हजारो मेंदूत शिवचरित्र रुजवण्याची प्रक्रिया सुरूच राहील.

विशाल गरड
२२ मार्च २०२२


Friday, March 18, 2022

आज भेटलो रायरीला

कादंबरी १९ फेब्रुवारीपासूनच वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे तरीही अजूनपर्यंत माझ्या हातात माझ्या हक्काची प्रत आली नव्हती. फेब्रुवारीमध्ये व्याख्यानामुळे व्यस्त तर मार्च मध्ये बोर्ड परिक्षेमुळे व्यस्त त्यामुळे कादंबरी आणायला जायलाही वेळ नाही मिळाला. या साहित्यरूपी लेकराला जन्म दिल्यापासून ना त्याला कवटाळले, ना कोड कौतुक केले. पण आज अखेर ती इच्छा पूर्ण झालीच. न्यू एरा पब्लिशिंग हाऊसच्या ऑफिसमधून लेखकासाठीच्या प्रती आज घरपोच मिळाल्या.

तसं तर सर्व वयोगटाला वाचण्यासारखी ही कादंबरी आहे पण नुकतंच तारुण्यात पाऊल ठेवलेल्या, राजकिय महत्वकांक्षा बाळगणाऱ्या शिवभक्तांना ही कादंबरी वाचण्याचा माझा आग्रह असेल. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला सामोरे जाताना या कादंबरीतला कंटेंट डोक्यात असायला हवा. कादंबरीच्या नावावरून आणि मुखपृष्ठावरून जरी 'रायरी' ऐतिहासिक वाटत असली तरी यात गावकुसातील सामान्य शिवभक्तांची गोष्ट सांगितली आहे.

रायरीचे प्रोमोशन अजून सुरू केले नाही पण आता कादंबरी हातात आल्याने त्याला बळ मिळेल. कादंबरी जनमानसात पोहोचण्याची प्रक्रिया तशी लांबच असते हे मी जाणतो तरीही अल्पवधित तिने शेकडो घरांच्या कपाटात स्थान मिळवल्याने मी समाधानी आहे. यापुढेही 'रायरी' जास्तीत जास्त लोकांनी वाचावी यासाठी एक लेखक म्हणून मी प्रयत्न करीत राहील  बाकी जोपर्यंत महापुरुषांना विचारांतून जिवंत ठेवण्याचा विषय येत राहील तोपर्यंत रायरीचा उल्लेख होत राहील.

कादंबरी : 'रायरी'
लेखक : विशाल गरड
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ चित्र : रत्नदीप बारबोले
पृष्ठे: २४३
मूल्य : २५० ₹
कादंबरीसाठी संपर्क : 8999360416, 8888535282


Saturday, March 5, 2022

मग 'रायरी' वाचायलाच हवी

तुम्ही शिवरायांच्या विचारांवर प्रेम करणारे शिवभक्त आहात मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्हाला जडलेले वाईट व्यसन काही केल्या सुटत नाही मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्हाला राजकारणात यायचंय, चांगलं काम उभा करायचंय मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुमचा विरोधक बलाढ्य आहे तरीही त्याला पराभूत करण्याची तुमची इच्छा आहे मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही कार्यकर्ता आहात पण कार्यकर्त्याची कात टाकून तुम्हाला नेता बनायचंय मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही रायगडाचे शिलेदार आहात, मग त्या दुर्गराजची शक्ती अनुभवण्यासाठी तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही आजवर खूप काही वाचलं असेल किंवा काहीच वाचलं नसेल तरीही तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
कारण
आजच्या आधुनिक शिवभक्तांच्या जगण्याला शिवचरित्राचा स्पर्श देऊन नुसती वेळ नाही तर काळ बदलण्याचे सामर्थ्य वाचकाला बहाल करण्याचा प्रयत्न रायरीतून झालाय. या प्रयत्नांना तुमचं पाठबळ मिळावं हीच अपेक्षा.

कादंबरी : 'रायरी'
लेखक : विशाल गरड
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ चित्र : रत्नदीप बारबोले
पृष्ठे: २४३
मूल्य : २५० ₹

रायगड हा कादंबरीचा आत्मा आहे म्हणूनच रायरीची पहिली प्रत महाराजांच्या पायावर ठेवून 'रायरी' तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. कादंबरी घरपोच मागवण्यासाठी खालील नंबरवर अवश्य संपर्क साधा.
न्यू एरा ऑफिस -📱8999360416

फोटो सौजन्य : किताबवाला


Wednesday, March 2, 2022

माझं इरकलीतलं विद्यापीठ

माझ्यावर आईहून जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आज्जी होती. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सोमवारी पहाटे ५:०० च्या सुमारास ती मला पोरकं करून गेली. मायेचा समुद्र जणू तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखा चर्रर्र करून आटून जावा तशी ती निघून गेलीये पुन्हा कधीच न परत येण्यासाठी. पांगरीच्या निलकंठेश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा होती, जोवर पायात त्राण होता तोवर प्रत्येक सोमवारी ती निलकंठेश्वराला जायचीच. स्वर्गाच्या दिशेने अखेरचा प्रवासही तिने सोमवारीच केला हा योगायोग नसून जणू महादेवानेच तिला महाशिवरात्री साजरी करायला स्वर्गात निमंत्रित केलं असावं एवढी ती विलक्षण घटना होती.

दिड वर्षापूर्वी बापू गेले तेव्हापासूनच आज्जीची तब्बेत कमी जास्त होत होती. तेव्हाही तिने बापू गेल्याचे दुःख पोटात ठेवून आम्हाला धीर दिला पण आतून ती खचली होती कारण सकाळी लवकर आंघोळ झाल्यावर जेव्हा ती कपाळाला मेन लावून त्यावर कुंकू लावायला बसायची तेव्हा पाच दहा मिनिटे तरी लागायची पण बापू गेल्यापासून तिजी तिलाच आरशात बघायला नकोसं व्हायचं. कपाळाचे भारदस्त कुंकू हे जुन्या बायांचा सर्वोच्च दागिना असायचा तोच हरवला तर त्यांचे मनही हरवून जातं असंच काहीसं आज्जीचं झालं आणि गेल्या दिड वर्षात ती पुरती थकून गेली. तरूण वयात शेतात प्रचंड कष्ट केलेली आज्जी वयाची ऐंशी पार करुस्तोवर तंदुरुस्त होती आमच्या जन्मापासून ती कधी आम्हाला म्हातारी वाटलीच नाही, अंगावर इरकल होती बस्स एवढीच तिच्या म्हातारपणाची काय ती निशाणी. कामाला म्हणलं तर आईच्या खांद्याला खांदा लावून राबायची. 

आज्जीच्या हातचे पिठलं, आंब्याची चटणी, टोमॅटोची चटणी, कडी, ताक या माझ्या प्रचंड आवडीच्या गोष्टी. घरी केलेली एखादी भाजी कधी नाही आवडली की आज्जी लगेच मला काहीतरी करून खाऊ घालायची. घरातल्या लहान लेकरांची काळजी घेणारं ती एक विद्यापीठ होती. इनबिन दुसरी पर्यंत शिकून अडाणी राहिलेली आज्जी नंतर मात्र स्वयंप्रयत्नातून साक्षर झाली, वाचायला शिकली. भजनाची आवड असल्याने तिने बरेच अभंग आणि गवळणी तोंडपाठ केल्या. किर्तन, भजन, हरिपाठात ती रमायची. देवपूजा आणि तुळशी माळेचा जप तिने अखंड ठेवला. घरातल्या कुणीही घराचा उंबरा ओलांडला की तो परत येईस्तोवर आज्जीचा जीवात जीव नाही राहायचा. तिचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात आणि लेकरांना, नातवांना जीव लावण्यातच गेलं.

वैजियंताबाई नावाचं आमचं इरकलीतलं विद्यापीठ जरी आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरी तिच्या संस्काराची शिदोरी आम्हाला टिकवून टिकवून खायची आहे. गरड घराण्याच्या तीन पिढ्यांवर संस्कार केलेल्या या स्त्रीच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. माझ्या कादंबरीला तिचा दोन वर्षांचा सहवास लाभला हे माझ्या पोरीचं भाग्यच. आता तिच्या आठवणी ह्याच  ठेवा आहेत ज्या जपल्या जातील आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत. आज्जे तुझी लै आठवण येते, साश्रु नयनांनी तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

विशाल गरड (वैजियंताबाईचा नातू)
२ मार्च २०२२, पांगरी

Sunday, February 27, 2022

व्याख्यानाच्या मानधनातून ट्रामा सेंटरला मदत

काही दिवसांपूर्वी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय यादव साहेबांनी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांना जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उभा राहत असलेल्या ट्रामा केअर सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवजयंतीदिनी झालेल्या व्याख्यानातुन मिळालेले मानधन मी आज ट्रामा सेंटरला मदत म्हणून संस्थेचे विश्वस्थ जयकुमार बापू शितोळे यांचेकडे सुपूर्द केले. अर्थात फुलांच्या बागे एवढ्या मोठ्या या प्रकल्पास मी केलेली मदत म्हणजे फुलाच्या पाकळीएवढीच पण उद्या जेव्हा तिथे एखाद्या गोरगरीब अपघातातग्रस्त रुग्णाचा जीव वाचेल तेव्हा ती भव्य वास्तू उभारलेल्या हातांना मिळणाऱ्या समुद्राएवढ्या विशाल समाधानात आपलाही एका थेंबाचा वाटा आहे ही जाणीव सुखावणारी असेल.

अपघातग्रस्त रुग्णाला एकाच छताखाली सर्व उपचार देणाऱ्या ट्रामा सेंटरच्या अद्ययावत इमारतीचा खर्च सुमारे चाळीस कोटींच्या घरात आहे. बार्शी तालुक्यासह आसपासच्या दहा तालुक्यात जगदाळे मामा हॉस्पिटल आरोग्य देवतेचे काम करतंय. आता सुसज्ज ट्रामा केअर सेंटरने बार्शीच्या वैद्यकीय वैभवात आणखीनच भर पडेल. आजवर करोडो रुपये खर्चून गावात, शहरात उभारलेल्या समाजमंदिरांनी आणि सभागृहांनी कोरोना काळात किती लोकांचा जीव वाचवला ? आणि रुग्णालयांमुळे किती लोकांचा जीव वाचला याचा विचार केला की लक्षात येतं भविष्यात आपल्याला कशाची जास्त गरज आहे. म्हणूनच अशा आरोग्यमंदिरांस आपणही जमेल तेवढी मदत करावी याचसाठी हा शब्द प्रपंच.

विशाल गरड
२७ फेब्रुवारी २०२२, बार्शी

Thursday, February 24, 2022

पावनखिंड

वीरगती मिळाल्यानंतर हातात तलवार धरून दगडाला टेकलेला बाजीप्रभूंचा देह पाहताना अक्षरशः शरीराच्या पेशी पेशीत स्फोट झाला, कानशिला गरम झाल्या एक मोठा श्वास फुफ्फुसात भरला गेला त्यासरशी डोळ्याच्या कडा आपसूक पणावल्या. स्वराज्याचे रक्तदाते बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि बांदल सेनेतील प्रत्येक मावळ्यास विनम्र अभिवादन.

चित्रपट पाहताना वरती उल्लेख केलेल्या फ्रेमचा फोटो काढण्याचा मोह झाला होता पण तो तुम्ही थेटर मध्ये जाऊनच अनुभवावा म्हणून नाही काढला. "अभिनेते अजय पुरकर सर, भविष्यात तुम्ही अनेक भूमिका वटवाल पण जणू याच भूमिकेसाठी तुमचा जन्म झालेला असावा आणि तुम्हाला तो बलदंड देह मिळाला असावा इतकी अजरामर भूमिका आपण साकरलीत."

आजवर मी माझ्या व्याख्यानातून या प्रसंगातली पराकोटीची आत्माहुती सांगत आलो पण आज प्रत्यक्ष पाहताना कमरेची समशेर उपसून आपणही बांधल सेनेच्या मदतीस जावे असे वाटले. हा अविस्मरणीय क्षण अनुभवायला दिल्याबद्दल आणि एक अप्रतिम कलाकृती निर्माण केल्याबद्दल दिग्पाल सरांसोबत पावनखिंडीच्या सर्व टिमचे आभार.

विशाल गरड
२४ फेब्रुवारी २०२२



Sunday, February 20, 2022

रायरीची घोषणा

'रायरी' या माझ्या पहिल्या कादंबरीची पहिली आवृत्ती आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर छापून पूर्ण झाली आहे. शिवभक्तांची ही गोष्ट १९ फेब्रुवारी या शुभमुहूर्तावर सज्ज व्हावी अशी माझी इच्छा होती त्याप्रमाणे न्यू एरा प्रकाशनने युद्ध पातळीवर प्रयत्न करून आज अखेर रायरी वाचकांसाठी सज्ज केली त्याबद्दल त्यांस मनस्वी धन्यवाद.

सध्याच्या काळाची गरज असलेला कंटेंट कादंबरीत असल्याने शहरातील, गावातील आणि वाड्या वस्त्यावरील सर्वच शिवभक्तांना मी रायरी वाचण्याचे आवाहन करतो. काल्पनिक कथेचा आधार घेऊन समाजातील जळजळीत वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी रायरीच्या माध्यमातून केला आहे. विचारांची शिवजयंती तर मी दरवर्षीच साजरी करीत आलोय पण यावर्षी मात्र शिवरायांना कादंबरी लिहून अभिवादन करू शकल्याचे प्रचंड मानसिक समाधान पदरी पडलंय. रायरी बद्दल अजून खूप काही सांगायचंय पण आजच्या पवित्र दिनी फक्त एवढंच सांगतो की "आजच्या युवकांना पथदर्शी ठरणारी ही कादंबरी भविष्यात नक्कीच प्रत्येक शिवभक्तांच्या पुस्तकांच्या कपाटात जागा मिळवेल"

खरं तर कादंबरीला साजेसा भव्य दिव्य प्रकाशन सोहळा आयोजित करण्याचा मानस आहे पण सध्या शिवजयंती व्याख्यानमालेत व्यस्त असल्याने त्याचे नियोजन लगेच करणे शक्य होणार नाही म्हणूनच प्रकाशनाची औपचारिकता बाजुला ठेवून रायरीची पहिली आवृत्ती थेट तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देत आहोत. अर्थात प्रकाशन सोहळाही होणारच तोही रायरीला शोभेल असाच पण जरा सवडीने. तोपर्यंत वाचून प्रतिक्रिया कळवत राहा.

कादंबरी : 'रायरी'
लेखक : विशाल गरड
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ चित्र : रत्नदीप बारबोले
पृष्ठे: २४३
मूल्य : २५० ₹
कादंबरी साठी संपर्क 👇🏽
न्यू एरा पब्लिशिंग हाऊस : 8798202020

विशाल गरड
१९ फेब्रुवारी २०२२ (शिवजयंती)



Monday, January 31, 2022

ऑफलाइन परीक्षा व्हायलाच पायजे

अरे येडे का खुळे लका तुम्ही. उलट ऑनलाइन परीक्षेचं तोटं सांगून ऑफलाइनच परीक्षा घ्या म्हणून तुम्ही मोर्चे काढाया पायजे व्हते पण तुम्ही तर परीक्षा नकु म्हणून रस्त्यावर आलाव. तुम्हाला शिकणारी पोरं म्हणावं का ? तुमची तरी काय चुकी म्हणा दोन वर्षे शाळेतल्या शिक्षकांची ऑनलाइन लेक्चर्स सुडून बरेचजण मोबाईलवर भलतंच कायतरी बघत बसली. शिकण्याच्या नावाखाली तुमची बोटं नकु तिथं टच करीत बसली आन् त्येज्या मुळंच मेंदूत नकु ती कंटेंट घुसला म्हणूनच आता परिक्षेचीबी भिती वाटायली तुम्हाला. काळजी घ्या पण परीक्षा द्या बाबांनो.

आरं, आधीच तुमची पासिंग सोप्पी करून तुम्हाला अधू करून ठिवलंय. जागतिक स्पर्धेच्या तुलनेत लका तुमचा सध्याचा सिल्याबस सावलीला सुदा उभा राहू शकत न्हाय. तुमची बोर्डाची पेपरं तपासताना सुधा वडून ताणून का व्हईना पण पस्तीस मार्कापर्यंत आणून ठिवाव म्हणत्यात. प्रॅक्टिकलची फुल्ल मार्क दिवून लेखी परीक्षेत जर पंधरा वीसबी मार्क पाडायला जमणार नसत्याल तर आता काय हाणून घ्यावं का ? ठिक हाय एवढं वर्ष निघूनबी जाईल रं पण कवर असं लांब लांब पळणार हाव ? नीट आन् जेईईबी असंच घरी बसून देणार हाव का ?

शाळेत गुरुजींनी मारलं, कॉलेजात सरांनी अपमान केला, वर्गात पोराकडून पुरीचा आन् पुरीकडून पोराचा प्रेमभंग झाला, परीक्षेत नापास झाला/झाली, घरची खवळली असल्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही फाशी घ्यायलाव म्हणल्यावर तुमच्याकडून अपेक्षा तरी काय ठिवावी. घरात आईबापाला, शाळेत मास्तरांना आन् आता सरकारला भिडवू भिडवू तुम्ही तुमच्याच पायावर दगड नाही तरं मोठ मोठं चिरं मारून घेतल्यात. जागं व्हा मर्दांनो ! उगं भयकू नका कवळ्या वयात.

ती राष्ट्रनिर्मिती युवकांच्या हातात वगैरे हाय म्हणं. विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य वगैरे असत्यात म्हणं. युवकांनी आंदोलने किली की क्रांती ब्रिंती घडती म्हणं. ह्या समद्या वाक्यांनी हिरीत उडी टाकून जीव द्यायचा का लका. उलट सांगा सरकारला "घ्या म्हणावं पेपर. हाफ बीफ नाय तर फुल सिल्याबसवर घ्या. करताव आम्ही अभ्यास." असला कोरोना व्हता पण तुमच्या शिक्षणासाठी तुमचा बाप रक्ताचं पाणी करून काबाड कष्ट करत व्हता, आई दिसरात काम करून तुमच्या दोन घासाची सोय करत व्हती. का ? तर लेकरू शिकून मोठं कायतरी व्हईल. हितं तर ही परीक्षाच नकु म्हणायलंय.

झालं एवढं नुकसान लंय झालं. जावा गप घरी आन् लागा परीक्षेच्या तयारीला. आई बापाच्या कष्टापुढं आपला अभ्यास करायचे काम म्हंजी उगं ठिपक्या एवढं हाय आन् ती बी नसल जमत तर ती गाबुळी मार्क घिऊन मारा उडी बेरोजगारीच्या समुद्रात आन् बसा बापाच्या जीवावर तुकडं मोडीत वयाची तिशी पार हुस्तोवर. आजची माझी ही पोस्ट जरी परखड वाटत आसली तरी तुमच्याच तळमळीने लिहिली हाय. राग मानू नका आन् तरीबी आलाच तर मग हीच पोस्ट आजून चार पाच वर्षांनी वाचा मग तुम्हीच म्हणचाल राईट बोलत व्हता लका ईशाल गरड.


विशाल गरड
दिनांक ३१ डिसेंबर २०२२, पांगरी

Saturday, January 29, 2022

रायरी

प्रिय वाचकहो, तुम्हाला ही गोष्ट सांगताना मला मनस्वी आनंद होतोय की माझी 'रायरी' ही पहिली वहिली कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. शरद तांदळे यांचे न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे ती प्रकाशित करीत आहे. आजवरच्या आयुष्यात बरीच बिरुदं व्यक्तिमत्वाला चिटकलीत पण आज विविधांगी पाच पुस्तकांच्या लेखनानंतर प्रथमच कादंबरीकार म्हणून साहित्याच्या उंबरठ्यावर उभा राहिलोय. तुमच्या प्रेमाच्या आणि पाठबळाच्या जोरावर हेही पाऊल दमदार पडेल याची खात्री देतो. बाकी कादंबरी संदर्भातील पुढील अपडेट्स वेळोवेळी देत राहील, तब तक के लिए स्टे ट्यून. आणि हो माझ्या कुंचल्यातून साकारलेली 'रायरी' टायटलची ही कॅलिग्राफी कशी झालीये तेही सांगा.

विशाल गरड
२९ जानेवारी २०२२, पुणे

Monday, January 24, 2022

रस्त्यावरचं श्रीमंत दुकान

आज कामानिमित्त बार्शीच्या चंदन झेरॉक्स येथे गेलो असता श्री.शिवाजी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर पुस्तकाचा स्टॉल दिसला म्हणून थांबलो. सर्व पुस्तकांवरून नजर फिरवली आणि एक पुस्तक विकत घेतले. पुस्तकाचे पैसे देण्यासाठी मी त्यांचा क्यू आर कोड स्कॅन केला आणि पैसे ऑनलाइन पे केले. दुसऱ्याच क्षणात पुस्तक विक्रेत्याने त्यांचा मोबाईल खिशातून काढून पैसे आल्याची खात्री केली आणि सहज माझे नाव वाचले. त्यांनी लगेच माझ्याकडे पाहत विचारले "तुम्ही विशाल गरड का ?" मी म्हणले "हो".  "ते वक्ते लेखक आहेत तेच ना ?" मग मी तोंडाचा मास्क बाजूला सारत म्हणालो "हो तो मीच" मला पाहून त्यांना इतका आनंद झाला की अगदी दुसऱ्याच क्षणात ते खूप प्रेमाने माझ्या जवळ येऊन म्हणाले "चला बरं सर तुम्हाला चहा पाजतो, अहो तुमची पुस्तके असतात माझ्याकडे, ते 'व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय' हे पुस्तक मी बऱ्याच जणांना वाटली" यावर मी त्यांना म्हणालो "अहो काका,उलट आम्हीच तुम्हाला चहा पाजायला पाहिजे, आमच्या साहित्यरूपी अपत्याला तुम्ही एवढे नटवून थटवून त्याची प्रसिद्धी करता. चला चहा घेऊ" असे म्हणत शेजारच्या कॅन्टीनवर आम्ही चहा प्यायला गेलो.

तिथे चहा पीत पीत मी त्यांना त्यांचे नाव वगैरे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की "मी भगवानदास तापडिया, इथेच व्हि.के. मार्ट जवळ राहतो. पुस्तक विक्रीचा व्यवसाय मी सेवा म्हणून करतो". त्यांचा व्यवसायातला सेवाभाव पाहून छान वाटले. पिशव्यात पुस्तके भरायची, ठरलेल्या जागेवर आल्यावर तिथे तीन टेबल मांडायचे आणि त्यावर सगळी पुस्तके ठेवायची. सहज जरी कोणी तिथे पाहत उभारले तरी पुस्तकांची माहिती सांगत राहायची. खरंच लेखकाला घराघरात आणि सर्वसामान्यांत पोहोचवणारा हा पारंपरिक आऊटलेट असाच सुरू राहायला हवा. अशी जीवतोड मेहनत करून रस्त्यावरच विचारांचे दुकान थाटलेल्या माणसांचा आपल्याला मोक्कार अभिमान वाटतो. यातून ती किती श्रीमंत होतात हे माहीत नाही पण ते कित्येकांना विचारांची श्रीमंती बहाल करतात हे महत्वाचे. तापडिया काकांच्या पुस्तक व्यवसायास माझ्या शुभेच्छा

विशाल गरड
२४ जानेवारी २०२२

Saturday, January 22, 2022

डिसले गुरुजींना आडकाठी

अशा कितीतरी शिक्षण  संस्था आहेत ज्या संस्थेत संबंधित संस्थाचालकांच्या घरातील व्यक्तींच्या नियुक्त्या असतात जे फक्त महिना पगार उचलण्यापूरतेच शाळेत सही करण्यासाठी येतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत जिथल्या संस्थाचालकांच्या निवडणुकीसाठी आणि वाढदिवसासाठी शिक्षकांच्या पगारीतून पैसे कपात केले जातात अशा संस्थाचालकांवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतल्या शिक्षकांचा वापर शिकवण्याव्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठीच जास्त केला जातो अशा व्यक्तींवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतले शिपाई शाळा सोडून संस्था चालकांच्या घरची धुनी भांडी करण्यासाठी कामावर असतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली ?

असे कित्येक शिक्षक आहेत ज्यांना झूम मिटिंगद्वारे लेक्चर घेता येत नसल्याने लॉक डाऊन काळात त्यांनी ऑनलाइन शिकवलेच नाही. मग अशा शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

भारतात असे कितीतरी शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक वाचून दाखवण्यापालिकडचे शिक्षण देऊ शकत नाहीत. वर्गात जसे काही विद्यार्थी हुशार तर काही ढ असतात तसेच आपल्या देशातही काही शिक्षक हुशार तर काही ढ आहेत मग अशा 'ढ' शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

ज्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी जागतिक पातळीवर शाब्बासकी मिळवली त्यांच्या तीन वर्षाच्या कामात अनियमितता आहे असा ठपका ठेऊन त्यांना पी.एच.डी करिता अमेरिकेला जाण्यासाठी रजा मंजूर न होणे दुर्दैवी वाटते. जागतिक सन्मान मिळवणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यात जर इथली व्यवस्था पाणी आणणार असेल तर अशा व्यवस्थेला काय म्हणावे ?

दुःख याचेच जास्त वाटते की डिसले गुरुजींना अमेरिकेने संशोधनासाठी स्कॉलरशिप दिली मग तशी स्कॉलरशिप त्यांना आपल्या भारतातच का नाही दिली गेली ? शिक्षकांसाठी पण तशी एखादी स्कॉलरशिप आपल्या देशात का नाही ? बाहेरच्या कुणी आपल्यावर मोहर उमटवल्याशिवाय त्यांचे कौतुक करायचेच नसते का ?

दिसले गुरुजींचे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला जाण्याने फक्त एका शाळेला किंवा तालुक्याला नव्हे संपूर्ण देशासह जगाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. शिक्षक म्हणून प्रशासन पातळीवर काही त्रुटी असतीलही कदाचित पण माननीय शिक्षण विभागाने डिसले गुरुजींच्या प्रस्तावाचा धोरणात्मक विचार करायला हवा असे वाटते.

नियमानुसार काटेकोर चालायचे म्हणले तर चतुर्थ श्रेणी कामगारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, सह सचिवापासून मुख्य सचिवापर्यंत, पोलिस शिपायापासून महासंचालकापर्यंत आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यांमार्गे पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचीच कधीतरी कुठेतरी कर्तव्यात कसूर होतेच पण त्यातूनही नियम बाजूला सारून ते मार्ग काढतात; नव्हे तो काढवाच लागतो तसंच ग्लोबल टिचर अवॉर्ड विनर रणजितसिंह डिसले गुरुजींना देखील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. अशा हरहुन्नरी, हुशार, विद्वान, सात कोट रुपये जिंकूनही नोकरी करण्याची इच्छा दाखवणाऱ्या टेक्नॉलॉजीप्रिय शिक्षकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे. त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्या विद्वत्तेचा आदर झाला पाहिजे एवढंच.

विशाल गरड
२२ जानेवारी २०२२

Wednesday, January 12, 2022

शाळाबंदी

एक गाव आहे जिथे मोबाईलला रेंजच नाही. पालक अशिक्षित आहेत त्यांचा विद्यार्थी ऑनलाइन वर्गात कसा उपस्थित राहील ? एक पालक थ्रेशिंग मशीनवर कामगार आहे. त्याच्याकडे स्मार्ट फोन नाही त्याने त्याच्या पाल्याला कसं शिकवायचं ? पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना अनन्य साधारण महत्व असते. गेल्या दोन वर्षात एम.एस्सी केलेले, डिग्री घेतलेले किती प्रात्यक्षिक अनुभव घेऊन पास झालेत ? कित्येक विद्यार्थी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे गेमिंग आणि पॉर्नोग्राफीकडे वळले आहेत हे कसं थांबवायचं ?

समजा पालकांचा मोबाईल असेल आणि जर ते त्यांच्या मोबाईलवर अश्लील कंटेंट पाहत असतील आणि लेक्चर च्या वेळेपुरताच ते त्यांचा मोबाईल पाल्याला देत असतील तर फेसबुक, गुगल किंवा यू ट्यूब हे ऍप्स मोबाईल धारकाने जो कंटेंट सर्च केलेला असतो त्यासंबंधीचाच कंटेंट मोबाईल स्क्रिनवर सतत दाखवत राहतात. उत्सुकतेने जर आपल्या पाल्याने त्यावर क्लीक केले तर नको त्या वयात तो गुलाबी दुनियेत रंगून जातो अगदी बेमालूमपणे. हे कसं रोखायचं ?

एक ऊसतोड कामगाराची मुलगी होती. ती सातवीच्या वर्गात शिकत होती. मार्च २०२० मध्ये झालेल्या लॉकडाऊन मध्ये ती शाळाबाह्य झाली. मध्यंतरी शाळा सुरू झाल्यावर पालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण सतत मोबाईल नॉट रीचेबल लागल्याने आजतागायत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षात तिने ऑनलाइन शिक्षण घेतले असेल ?

ग्रामीण भागात ७० टक्के विद्यार्थी सर्वसामान्य घरातून येतात त्यापैकी किमान २२ टक्के विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन शिकत असतात. धनदांडग्या पालकांची लेकरं शिकली नाहीत, त्यांना नोकरी मिळाली नाही म्हणून काय भविष्यात त्यांची उपासमार होणार नाही पण रिक्षा चालक, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, अशा गरीब पालकांसाठी त्यांच्या लेकरांचे शिक्षण हीच त्यांच्या भविष्याची भाकरी असते. मग त्यांच्या लेकरांचे शिक्षण थांबवणे कितपत योग्य ?

"एकदोन वर्ष नाही शिक्षण झालं तरं कुठं बिघडतंय" या वाक्याची किंमत विद्यार्थ्यांना फार उशीरा लक्षात येईल. उदाहरण म्हणून सांगायचं झालंच तर आठवी नववी हे दोन वर्ग दहावीचा पाया असतात. आज आठवीतले विद्यार्थी ऑनलाइन शाळेतून थेट दहावीपर्यंत आलेत मग बारावी नंतर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नीट, जेईई परीक्षेला ते अर्धगाबुळ्या ऑनलाइन शिक्षणाच्या जोरावर तोंड देऊ शकतील का ?

गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग असतो त्यांची लेकरं शिकली तरच त्यांचे जीवनमान उंचावते असे पालक आज हात जोडून पाया पडून शिक्षकांना विनंती करत आहेत की  "सर, लेकरं घरी नका हो पाठवू, मी लिहून हमी देतो पण माझा पाल्य हितंच राहू द्या. घरी नाहीत ती अभ्यास करत. वाटूळं होईल ओ लेकरांचं" शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा गुन्हा नाही का याबद्दल कुणाला दोषी धरायचे ? प्रशासन थेट शाळा बंदच्या ऑर्डर काढून मोकळे होते. संबंधित अधिकारी जसे वरून आलेल्या ऑर्डर तत्परतेनं खालपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात तसेच त्यांनी पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे म्हणणे देखील खालून वरपर्यंत पोहोचवायला हवे.

आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? आणि सलग तीन वर्षे ऑनलाइन शिकून भविष्य गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? ही आकडेवारी जर अचूक काढली तर शाळा सुरू ठेवण्यास बळ मिळू शकते. असं भिऊन भिऊन कुठवर पळायचं ? ऑनलाइन शिक्षण म्हणजे रडणाऱ्याचे डोळे पुसण्यासारखं आहे. ते कधी न भरून निघणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची तात्पुरती मलमपट्टी आहे. भविष्यात नुसत्या पास झालेल्या पत्रावळ्या घेऊन जेव्हा ही ऑनलाईन पिढी नोकरीच्या मार्केट मध्ये जाईल तेव्हा त्यांच्या त्या मार्कलिस्टला केराच्या टोपल्या दाखवल्या जातील तेव्हा आता शाळा बंद करणारे प्रशासन त्यांच्या नोकरीची जबाबदारी घेईल का ?

विशाल गरड
१२ जानेवारी २०२२

Sunday, January 2, 2022

तयार राहा

प्रसार माध्यमांनो, राज्यात लॉकडाऊन ? अशा बातम्या चालवून सरकारवर दबाव टाकण्यास तयार राहा. मंत्र्यांनो, न्यूज चॅनेल्सच्या बातम्या बघून बघून लॉकडाऊनची भीती दाखवणारे स्टेटमेंट द्यायला तयार राहा. सरकार, कोरोना टेस्टची संख्या वाढवायला तयार राहा.

सरकारच्या काही कर्मचाऱ्यांनो, घरी बसून फुल्ल पगार घ्यायला तयार राहा. पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनो, आहे एवढ्याच पगारीत तिप्पट काम करायला तयार राहा. खाजगी नोकरदारांनो, पगार कपातीस तयार राहा. कामगारांनो, पुन्हा बेरोजगार व्हायला तयार राहा.

डॉक्टरांनो, दिड लाख रुपये प्रति पेशंट प्रमाणे उपचार करण्यास तयार राहा. मेडिकलवाल्यांनो, ही औषधे कोरोनावर प्रभावी आहेत का नाहीत माहीत नाही पण रेमडीसीविर, टोसिलिझुमबचा स्टॉक करायला तयार राहा.
काळा धंदा करणाऱ्यांनो, कोरोना उपचाराची औषधे दहापट किंमतीने विकायला तयार राहा.

बार वाल्यांनो, दारूच्या बॉक्सनी गोडाऊन भरायला तयार राहा. टपरिवाल्यांनो, गुटख्याचा स्टॉक करायला तयार राहा. छोट्या मोठ्या दुकानदारांनो, शटर ओढायला तयार राहा. शिक्षकांनो, ऑनलाइन शिकवायला आणि विद्यार्थ्यांनो, मोबाईलवर शिकायला तयार राहा.

कृषी कंपन्यांनो, खते, बी बियाणे आणि औषधांचे भाव वाढवायला तयार राहा. तेल कंपन्यांनो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायला तयार राहा. शेतमाल व्यापाऱ्यांनो, तुम्ही मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतीमालाचे भाव पाडायला तयार राहा. शेतकऱ्यांनो, अवकाळी पाऊस आणि गारपीठीनंतर आता सरकारी नुकसानीसही तयार राहा.

सरकारला एवढीच विनंती,
कोरोना झालाच शेतकऱ्याला तर निदान त्याला त्याचा उपचार करण्याऐवढे तरी पैसे कमवू द्या. सलग दोन वर्षे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी आता बऱ्यापैकी लसीकरण झाल्याने लॉकडाऊन होणार नाही या आशेने उरला सुरला सगळा पैसा शेतावर लावला होता पण जर आता लॉकडाऊन झाले तर मायबाप शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जाईल. लॉकडाऊन तर दूरच पण त्याच्या नुसत्या अफवेनेही शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे तेव्हा तुमचं काही ठरायच्या आधी तशा बातम्या पेरणाऱ्यांची थोडी वेसन आवळा. सुगीच्या दिवसात लॉकडाऊन कराल तर चार माणसं वाचवण्याच्या नादात हजार शेतकरी माराल.

सर्वात महत्वाचं,
सुजाण नागरिकांनो, ज्यांनी लस घेतलीच नाही त्यांनी लस घ्यायला, लक्षणे दिसणाऱ्यांनी इतरांपासून दूर राहायला, सर्वांनीच मास्क वापरायला, हात धुवायला आणि सोशल डिस्टंसींग पाळायला तयार राहा. आपण जर ही तयारी ठेवली तर सरकारही लॉकडाऊनची तयारी करणार नाही अन्यथा जिवीत आणि वित्तहानीस तयार राहा.

विशाल गरड
२ जानेवारी २०२२

Saturday, January 1, 2022

हे जपायला हवं

साऊ दिड वर्षाची झालीय तिच्या मेंदूवर छापलेली मराठी भाषा आता तोडक्या मोडक्या शब्दात आणि बोबड्या आवाजात उमटू लागली आहे. सांगितलेले सगळं तिला कळायला लागलंय. मोठ्यांच्या कृतीचे अनुकरण करायला तिच्याकडून सुरुवात झाली आहे, त्यामुळेच आज घरच्या अंगणाचा उंबरठा ओलांडून शेती संस्कृतीचा सिलॅबस शिकवण्यासाठी साऊला दुचाकीवर शेतात फिरायला घेऊन गेलो. जाता येता रस्त्याने हजारो गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. शेतात गेल्यावर कुत्र्याचे भौ भौ, गाईचा हंब्या, पक्ष्यांची चिऊ चिऊ, मांजराचे म्याव म्याव, वाऱ्याचा जुई जुई आवाज, फुलांचा सुगंध, विहिरीतले पाणी, हे सगळं तिने लाईव्ह अनुभवलं.

विरा रोज साऊला ज्या गाईचे दूध पाजते, आज तेच दूध नेमकं कुठून येतं आणि कसं काढलं जातं हे तिने प्रत्यक्ष पाहिले. आमचे आबा जेव्हा गाईची धार काढायला बसले तेव्हा तर साऊ एकटक सडातून बादलीत पडणारी दुधाची धार कुतूहलाने पाहत बसली. धारेचा आवाज ऐकण्यात ती तल्लीन झाली. शेतातल्या अनेक जिवंत गोष्टींशी तिचा संवाद आणि सहवास झाला. आपल्या ग्रामीण सांस्कृतीला फार मोठा इतिहास आहे ती शाश्वत आणि पौष्टीक आहे. वाढते शहरीकरण आणि वेस्टर्न लाईफच्या जाळ्यातून आपली सुटका होणे शक्य नसले तरी कधी कधी जमेल तसे आपल्या लेकरांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.

आपल्या लहानपणात बैलगाडी, चाबूक, चिपाडं, खिळ्या, सापट्या, दावी, चंगाळ्या, सायकलची टायर, गाढवन हे खेळण्याची साधने असायची. शेतात चिंचा गोळा करायला जाणे, विहिरीत पोहायला जाणे, मोठमोठ्या झाडांवर चढाणे हा खेळ असायचा. सुर्यफुलाच्या लाकडाची साल काढल्यावर त्यात निघणाऱ्या मऊ गाभ्या पासून नांगर, कुळव तयार करणे, दिवाळीत महानंदी च्या पोकळ लाकडात सायकलची तार आणि रबर लावून टिकल्या वाजवायची बंदूक तयार करणे, चिखलापासून घरं तयार करणे, वाळूच्या ढिगाऱ्यात पाय घालून त्यावर हाताने थोपटून खोपा तयार करणे अशा गोष्टीतून नवनिर्मितीचा आनंद मिळायचा.

हाकलून लावताना कुत्र्याला 'हाड' म्हणायचं, मांजराला 'थेर' म्हणायचं, जनावरांना 'हाईक' म्हणायचं तेच त्यांना बोलावतात कुत्र्याला 'कू कू' म्हणायचं, कोंबड्यांना 'पा पा' मांजराला फिस फिस करायचं आणि जनावरांना टिट्याव टिट्याव करायचं. चालती बैलगाडीत बसल्यावर ती थांबवतात हाताने कासरा  ओढून दोन्ही ओठ घट्ट मिठून हवा आत ओढताना तोंडाने एक विशिष्ठ प्रकारचा आवाज करायचा जो ऐकून बैलं लगेच जाग्यावर थांबायची. आता हे सगळं लुप्त होत चाललं. इंटरनेटच्या जमान्यात आपली लेकरं मोबाईलवरून परदेशात संवाद साधायली पण आपल्या पाळीव प्राण्यांसोबतची भाषा मात्र ते विसरत चालली. ती विसरत चालली असे म्हणण्यापेक्षा आपणच त्यांची ग्रामीण संस्कृतीची नाळ हळू हळू तोडू लागलो आहोत असेच म्हणावे लागेल.

लेकराला शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी लागावी एवढाच उद्देश ठेवून जर आम्ही आपल्या लेकरांना शिकवत असू तर या निसर्गाच्या शाळेत हिंडताना त्याचा जो अभ्यास होणार आहे त्यापासून त्याला दूर ठेवून घरात वन बी एच के किंवा टू बी एच के मध्ये डांबून, शहरात मैदान नसलेल्या शाळेत शिकवून. घर टू शाळा आणि शाळा टू घर बस्स एवढ्यातच त्याच्या सुरुवातीच्या शालेय जीवनातील सुमारे दहा पंधरा वर्षे घालवणार असू तर ही लेकरं भविष्यात डिप्रेशनचे शिकार का नाहीत होणार. निसर्गात वावरताना त्याच्या घटकांसोबत जगताना ताण तणाव हलका होतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे मग चार भिंतीत मिळणाऱ्या शिक्षणव्यतिरिक्त झाडांशी, पक्षांशी, पाळीव प्राण्यांशी संवाद साधण्याचे प्रात्यक्षिक शिक्षण घेण्याचा त्यांना अधिकार नाही का ?

कोणतीही गोष्ट शिकण्याचं, त्या मनावर बिंबवण्याचं एक वय असतं. आपल्या लेकराभोवती एक ठराविक चौकट टाकून आपण त्याला मर्यादित अनुभव देतोय का ? त्याची अभिव्यक्ती संपन्न करण्याची प्रणाली आपण सिमीत करतोय का ? आपलं सभोवताल जाणून घ्यायचा त्यातील घटकांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधायचा त्यांना अधिकार नाही का ? याचा विचार व्हावा. विकासाच्या इमारतीवर तुम्ही कितीही उंच उंच चढत राहा पण अखेर मातीत यावच लागतं तेव्हा त्या मातीची आणि त्या मातीतल्या सगळ्यांची ओळख ठेवायला हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्यासहित आपल्या मागच्या सगळ्या पिढ्या याच शेतीने पोसल्या आहेत आणि पुढेही तीच पोसणार आहे म्हणून आपल्या लेकरांची शेतीसंस्कृतीची नाळ तुटू देऊ नका अन्यथा कालांतराने जागो ग्राहक जागो ऐवजी जागो पालक जागोच्या जाहिराती टिव्हीवर यायल्या तर नवल वाटू नये.

प्रा. विशाल गरड
मु.पो.पांगरी, ता.बार्शी, जि.सोलापूर
पिन : ४१३४०४
ई मेल : vishalgarad.18@gmail.com



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...